आपल्या कर्मांचा ‘अधिपती’ असणारा ईश्वर, हा आपल्या प्रकृतीचे रूपांतरण करत असतानादेखील आपल्या प्रकृतीचा आदर करत असतो; कोणत्याही स्वैर लहरीनुसार नव्हे तर, तो नेहमीच प्रकृतीच्या माध्यमातून कार्य करत असतो. आपल्या या अपूर्ण प्रकृतीमध्येच आपल्या पूर्णत्वाची सामग्री सामावलेली असते. पण ती अपरिपक्व दशेत असते, ती विरूप झालेली, अस्थानी, कशीही अव्यवस्थितपणे फेकून दिलेली किंवा अगदीच बापुडवाण्या अयोग्य अशा क्रमाने मांडलेली असते.

ही सर्व सामग्री धीराने पूर्णत्वाला नेली पाहिजे, ती शुद्ध केली पाहिजे, तिची पुनर्रचना केली पाहिजे, तिची पुनर्घडण केली पाहिजे, तिचे रूपांतरण केले पाहिजे. तिला कशाही तऱ्हेने छिन्नविछिन्न करता कामा नये वा तिचे भंजनही करता कामा नये, तिला मारून टाकता कामा नये किंवा विकृत करता कामा नये, जोरजबरदस्तीने किंवा नकाराने तिचा नाशही करता कामा नये.

हे जग आणि या जगात राहणारे आपण सर्व म्हणजे ‘त्याची’ निर्मिती आहोत, त्याचे आविष्करण आहोत. आपल्या संकुचित आणि अज्ञानी मनाला समजू शकणार नाही अशा रीतीने तो आपल्याला आणि या विश्वाला हाताळत असतो. जोपर्यंत मन शांत होऊन दिव्य ज्ञानाप्रत खुले होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला ते समजू शकणार नाही. आपल्या दोषांमध्ये सत्याचे असे एक द्रव्य असते की जे, आपल्या चाचपडणाऱ्या बुद्धीला, त्याचा अर्थ उलगडवून दाखवावा म्हणून परिश्रम करत असते. मानवी बुद्धी दोष काढून टाकते पण त्याचबरोबर त्यामध्ये अंतर्भूत असणारे सत्यही काढून टाकते आणि ती आधीच्या दोषाच्या जागी तितक्याच एका अर्ध-सत्याची, अर्ध-दोषाची स्थापना करते.

परंतु जोपर्यंत आपण त्यामध्ये दडलेल्या आणि प्रत्येक मिथ्या आवरणाच्या खाली सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सत्याप्रत पोहोचण्याइतपत सक्षम होत नाही तोपर्यंत ‘दिव्य प्रज्ञा’ आपल्या चुका सहन करते. पापाचरणाकडे नव्हे तर पूर्णत्वाकडे जाणे, तसेच ज्याला आपण ‘ईश्वरी गुण’ असे संबोधू शकतो त्याप्रत जाणे हेच ज्या धडपडणाऱ्या ‘शक्ती’चे उद्दिष्ट असते; अशा ‘शक्ती’ची चुकीच्या दिशेने पडलेली पावले म्हणजे आपली पापं असतात. बरेचदा ही पापं म्हणजे जो गुण रूपांतरित केला जाणे आवश्यक असतो अशा एखाद्या गुणावरील आवरणं असतात, त्या ओंगळवाण्या आवरणांपासून तो गुण मुक्त करावा लागतो…

– श्रीअरविंद [CWSA 23 : 245-246]

अभीप्सा मराठी मासिक