जिवाला जगदीश्वराकडे जाण्याच्या मार्गामध्ये जगत् आडवे येते, अशी पूर्वी समजूत असल्याने, जगताचा त्याग करून, दूर कोठेतरी अरण्यात राहून, उपासना करण्याकडे पूर्वीच्या योगाचा कल होता. परंतु आहे त्या जीवनात राहूनच, साधना, उपासना करता येते, नव्हे, तर ती तशीच केली पाहिजे असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी प्रतिपादन केले. जगाला आणि जीवनाला ते आत्ता आहे त्याच स्थितीत सोडून द्यायचे आणि केवळ वैयक्तिक ‘मुक्ती’वर लक्ष केंद्रित करायचे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट नाही. तर या पार्थिव जीवनाचेच ‘दिव्य जीवना’त परिवर्तन करण्याची भूमिका ‘पूर्णयोग’ घेतो.

‘सर्व जीवन हा योगच आहे’, हे श्रीअरविंदांचे योगसूत्र आहे. आणि त्यामुळे वैयक्तिक जीवनातील किरकोळ दैनंदिन गोष्टी म्हणून एरवी ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असे त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो; त्या गोष्टीसुद्धा निरीक्षणाचा, अभ्यासाचा, साधनेचा एक अविभाज्य भाग बनतात. त्या योगयुक्त होऊन कशा करायच्या, त्यासाठी मूळ भूमिकेतच कसा बदल करायचा, ‘बालक’भाव कसा धारण करायचा, कर्म करताना कोणती भूमिका असली पाहिजे, आणि मुळात जीवनच कशासाठी असते? इत्यादी मूलभूत महत्त्वाच्या प्रश्नांवर  ‘सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन’ या मालिकेतून प्रकाश टाकण्यात येणार आहे.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

अभीप्सा मराठी मासिक