‘ईश्वर’ सर्वांमध्ये समानतेने आहे; आपण आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये, ज्ञानी व अज्ञानी यांच्यामध्ये, मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये, मानव आणि पशु यांच्यामध्ये, संत आणि पापी यांच्यामध्ये सारभूत भेद करता कामा नये. आपण कोणाचाही द्वेष करता कामा नये, कोणालाही तुच्छ लेखता कामा नये, कोणाचीही घृणा करता कामा नये; कारण सगळ्यांमध्येच, प्रछन्न स्वरूपात (concealed) असो वा प्रकट स्वरूपात असो, तो एकच ईश्वर त्याच्या आनंदासाठी अभिव्यक्त झाला आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तींमध्ये तो कोणते रूप धारण करू इच्छितो आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये तो कोणते कार्य करू इच्छितो, यासाठी जे सर्वोत्तम असेल त्यानुसार, ईश्वर स्वतःच्या इच्छेने व स्वतःच्या ज्ञानानुसार, एखाद्यामध्ये थोड्या प्रमाणात तर दुसऱ्या एखाद्यामध्ये काहीसा अधिक प्रकट झालेला असतो किंवा एखाद्यामध्ये तो झाकलेला असतो, तर अन्य कोणामध्ये तो अगदी विपरित रूपातही व्यक्त झालेला असतो. सर्व काही म्हणजे आपण स्वतःच आहोत, एकाच आत्म्याने विविध आकार धारण केले आहेत. आपल्यामधील द्वेष आणि नापसंती, तिरस्कार आणि घृणा, अनुरक्ती आणि आसक्ती आणि पसंती या गोष्टी स्वाभाविक असतात, आवश्यक असतात, एका विशिष्ट अवस्थेत अनिवार्यदेखील असतात. ‘प्रकृती’ने आपल्यामध्ये जे निवडलेले असते ते तयार करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी त्या अस्तित्वात असतात आणि त्या गोष्टी प्रकृतीला साहाय्यकारीदेखील होतात.
परंतु कर्मयोग्याच्या दृष्टीने या गोष्टी अवशेषांसारख्या असतात, एखाद्या अडथळ्यासारख्या असतात, त्याच्या दृष्टीने या गोष्टी म्हणजे अज्ञानाची प्रक्रिया असते आणि जसजसा तो प्रगत होत जातो तसतशा या गोष्टी त्याच्या प्रकृतीमधून गळून पडतात. बाल्यावस्थेतील आत्म्याला त्याच्या वाढीसाठी या गोष्टींची आवश्यकता असते; परंतु दिव्य संस्कृतीमधील प्रौढ आत्म्यामधून या गोष्टी गळून पडतात. ज्या ‘ईश्वरी’ प्रकृतीप्रत आपल्याला उन्नती करावयाची आहे त्या प्रकृतीमध्ये वज्रकठोरता असू शकेल, त्यामध्ये अगदी विध्वंसक कठोरतादेखील असू शकेल पण द्वेष असणार नाही; त्या व्यक्तीमध्ये दिव्य उपरोध असेल पण तिरस्कार असणार नाही; एक शांत, सुस्पष्ट आणि जोरदार नकार असू शकतो पण घृणा किंवा नावड असू शकणार नाही. अगदी आपल्याला ज्याचा विनाश करावयाचा आहे, त्याचा सुद्धा आपण तिरस्कार करता कामा नये किंवा त्या ‘शाश्वत ईश्वरा’ने तात्पुरता धारण केलेला हा गुप्तवेष आहे, हे ओळखण्यामध्ये आपण चूक करता कामा नये.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 223-225)
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024
- अतिमानसाची आवश्यकता - September 7, 2024
- अनुभूती आणि साक्षात्कार - September 3, 2024