प्रामाणिकपणा – ४३

‘ईश्वरी कृपे’बाबत शंकाच असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो ‘ईश्वरा’पर्यंत पोहोचेलच हे अगदी खरे आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की तो अगदी लगेचच, अगदी सहजपणे, विनाविलंब ‘ईश्वरा’पर्यंत पोहोचेल. तुमची अडचण इथेच आहे, तुम्ही ‘ईश्वरा’साठी पाच वर्षे, सहा वर्षे अशी काहीतरी एक मुदत निश्चित करता, आणि तुम्हाला कोणताच परिणाम दिसून आला नाही तर मग शंका घेता. एखादा मनुष्य मूलतः प्रामाणिक असू शकतो परंतु साक्षात्काराचा आरंभ होण्यापूर्वी त्याच्यामधील अनेक गोष्टी बदलणेच आवश्यक असतात, असे असू शकते. त्याच्या प्रामाणिकपणाने त्याला नेहमीच चिकाटी बाळगण्यासाठी सक्षम बनविले पाहिजे – कारण ही ‘ईश्वरा’बद्दलची जी आस असते तिला कोणतीच गोष्ट विझवू शकत नाही, विलंब, निराशा, कोणती एखादी अडचण किंवा अन्य कोणत्याही गोष्टी ती आस विझवू शकत नाहीत.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 116–117]

श्रीअरविंद