प्रामाणिकपणा – २१

व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या दोषांची जाणीव नसणे, हे कोठेतरी अप्रामाणिकपणा असल्याची खूण आहे. आणि सामान्यतः तो अप्रामाणिकपणा हा प्राणात (vital) लपून राहिलेला असतो. जेव्हा प्राण सहकार्य करण्यास संमती देतो – जी मुळातच खूप मोठी पायरी आहे – जेव्हा तो ठरवितो की तो सुद्धा काम करणार आहे, त्याचे सारे प्रयत्न आणि ऊर्जा, तो काम पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे, तेव्हादेखील कोठेतरी काहीतरी दडून राहिलेले असते – आपण त्याला काय म्हणू या? अशी एक अपेक्षा असते की, सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि त्याचे परिणाम अनुकूल असतील. आणि ही अपेक्षाच प्रामाणिकपणाला पूर्णपणे झाकून टाकते. कारण ही अपेक्षा अहंजन्य, वैयक्तिक बाब असते आणि ती प्रामाणिकपणाला संपूर्णपणे झाकून टाकते. त्यावेळी तुम्हाला स्वत:चे दोष दिसत नाहीत.

परंतु, एखादी व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक असेल तर, ती जेव्हा एखादे अयोग्य काम करू लागते त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी, अगदी स्पष्टपणे – आक्रमकपणे नव्हे तर, अगदी स्पष्टपणे, अगदी नेमकेपणाने तिला जाणवते की, “नाही, हे काम करता कामा नये.” आणि व्यक्तीमध्ये अजिबात आसक्ती नसेल तर व्यक्ती ती गोष्ट करणे लगेचच थांबविते, अगदी त्वरित ती ते काम थांबविते.

पण व्यक्तीला आसक्ती असते, अगदी निरपेक्ष कामाच्या बाबतीतसुद्धा आसक्ती असते, हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. तुम्ही तुमचे जीवन अहंभावात्मक नसलेल्या अशा एका कार्यासाठी वाहून घेतलेले असते, परंतु तेथेही अहंकार असतोच असतो. आणि ते कार्य करण्याची तुमची स्वतःची एक खास, वैयक्तिक अशी पद्धत असते; आणि तुमच्या मनात एक आशा असते की, याचा परिणाम अमुक असा असा होईल, तुम्हाला त्यातून अमुक अमुक मिळेल, आणि मग ती गोष्ट अमुक प्रकारे पार पडेल. (मी इच्छा आकांक्षाबद्दल येथे बोलत नाहीये.) अमुक एखादे कार्य तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत नसता, पण जे कार्य तुम्ही हाती घेतलेले असते, तेव्हा तुम्ही अशी अपेक्षा बाळगत असता की, ते कार्य यशस्वी होईल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, तुम्हाला व्यक्तिगत स्वतःला नव्हे, तर तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे, तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये तुम्हाला यश लाभेल, अशी अपेक्षा तुम्ही बाळगत असता. त्यामुळे एखादी अगदी छोटीशी गोष्ट, खोलवर, तळाशी दडून बसते… परंतु तशी अपेक्षाच तुम्ही बाळगली नसती तर, जे करणे आवश्यक होते ते करण्यात कुचराई करताक्षणीच, आपण चूक करत आहोत हे तुमच्या लक्षात आले असते. तुम्हाला अगदी नेमकेपणाने त्याची जाणीव झाली असती. एका मिलिमिटरचा एक हजारांश भाग असावा इतके ते स्पंदन सूक्ष्म असते. हो, ते तिथे असते, आणि तेवढे पुरेसे असते, तुम्हाला जाणवते की, “माझी चूक झाली आहे.” आपल्याकडून कोणताही प्रमाद घडता कामा नये असे वाटण्यासाठी, तुमच्याकडे परिपूर्ण प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्याही प्रकारच्या भ्रमात जीवन जगण्यापेक्षा, असा प्रामाणिकपणा काहीही करू शकतो, अगदी काहीही सोडून देण्यास तयार असतो. परंतु हे अतिशय अवघड असते; त्यासाठी वेळ लागतो, पुष्कळ परिश्रम करावे लागतात.

तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असता, तेव्हा नेहमीच तेथे मन आणि प्राण या दोन गोष्टी असतात, आणि त्या गोष्टी, तुम्ही जे जे काही करत असता त्यापासून काही ना काहीतरी लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असतात : वैयक्तिक समाधानाचा लाभ, आनंदीपणाचा लाभ, स्वतःबद्दलची जी चांगली प्रतिमा तुमच्या मनात असते तिच्या लाभासाठी, मन किंवा प्राण प्रयत्न करत असतात. स्वतःला न फसविणे हे खूप अवघड असते.

– श्रीमाताजी [CWM 05 : 54-55]

श्रीमाताजी