प्रामाणिकपणा – २०
तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य-असत्य यातील भेद जाणवेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांनाच तो सत्य मानू लागतो. जो दुष्ट प्रवृत्तीचा आहे तो त्याची अभीप्सा गमावून बसतो, साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. आकलन, संवेदना आणि साक्षात अनुभूतीच्या सर्व शक्यता तो गमावून बसतो. हीच शिक्षा असते.
असा माणूस स्वत:हून, स्वत: आणि ‘ईश्वर’ यांच्या दरम्यान अडथळे, आवरणे निर्माण करतो आणि अशा प्रकारे तो स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतो. ‘ईश्वर’ मागे सरत नाही तर, तो माणूसच स्वतःला ‘ईश्वरा’चा स्वीकार करण्यास अक्षम बनवितो. अशाप्रकारे, ‘ईश्वर’ हा काही कोणाला बक्षिसाचे वितरण करत बसत नाही किंवा शिक्षाही देत नाही; शिक्षा, बक्षिस असे हे अजिबात काही नसते.
एखादी व्यक्ती जेव्हा अप्रामाणिक असते, जेव्हा व्यक्ती दुरिच्छा बाळगते, जेव्हा ती कृतघ्न असते तेव्हा अशी व्यक्ती तत्काळ स्वत:लाच शिक्षा करून घेत असते. अशी जी अप्रामाणिक माणसं असतात, त्यांच्याकडे जी काही थोडीफार चेतना शिल्लक असते, ती चेतनादेखील ते गमावून बसतात. वास्तविक त्या चेतनेमुळेच आपण स्वत: दुष्ट आहोत हे त्यांना कळू शकले असते, पण आता ते ती चेतनाच गमावून बसलेले असतात. इतके की जणुकाही ते निश्चेतन (unconscious) असल्यासारखेच होऊन जातात. शेवटी, त्यांना काहीच समजेनासे होते.
– श्रीमाताजी [CWM 05 : 21-22]
- शारीर-चेतनेचे वैशिष्ट्य - March 17, 2025
- दु:खाचे प्रयोजन व उपाय - March 16, 2025
- अविचल चिकाटी आवश्यक - March 6, 2025