कर्म आराधना – ४८

कर्म करत असताना तुम्ही फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, कर्माच्या आधीही नको किंवा त्यानंतरही त्या कर्माचा विचार करू नका.

जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत वळू देऊ नका. कारण ते भूतकाळाचा भाग झालेले असते आणि ते मनामध्ये पुन्हापुन्हा घोळवत ठेवणे हा शक्तीचा अपव्यय असतो.

जे कर्म करायचे आहे त्याच्या पूर्वकल्पनेने तुमच्या मनाला कष्ट होऊ देऊ नका. तुमच्यामध्ये कार्यरत असणारी ‘शक्ती’ योग्यवेळी त्या कर्माकडे लक्ष पुरवेल.

मनाच्या या दोन सवयी त्याच्या गतकालीन कार्यप्रणालीचा भाग आहेत, या सवयी काढून टाकण्यासाठी रूपांतरकारी ‘शक्ती’ दबाव टाकत आहे; परंतु शारीर-मनाने अजूनही त्या सवयींना चिकटून राहणे हे तुमच्या ताणतणावाचे आणि थकव्याचे कारण आहे. मनाच्या कार्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या मनाला त्याचे कर्म करू द्यायचे हे जर का तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर, ताण हलका होईल आणि (कालांतराने) निघून जाईल. वास्तविक, अतिमानसिक कार्याने शारीर-मनाचा ताबा घेऊन, त्यामध्ये दिव्य ‘प्रकाशा’ची उत्स्फूर्त कृती आणण्यापूर्वीची ही संक्रमणशील अवस्था असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 287]

श्रीअरविंद