कर्म आराधना – ३१
तुम्हाला ईश्वरी कार्याचे खरे कार्यकर्ते व्हायचे असेल तर, इच्छा-वासनांपासून आणि स्व-संबंधित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. ‘दिव्य शक्ती’ची सेवा करणे, ती ग्रहण करणे, तिने भरून जाणे आणि तिच्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक साधन बनणे हेच कर्म करण्यामागचे तुमचे एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे. तुमची इच्छा आणि तिची इच्छा यांच्यामध्ये कोणतेही अंतर शिल्लक राहणार नाही तोपर्यंत तुम्ही दिव्य चेतनेमध्ये विकसित होत राहिले पाहिजे, तुमच्यामध्ये तिच्या आवेगाखेरीज अन्य कोणताही उद्देश असता कामा नये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून घडणाऱ्या तिच्या सचेत कार्याशिवाय अन्य कोणतेही कर्म तुमच्यामध्ये शिल्लक राहता कामा नये.
तुमच्यामध्ये अशा प्रकारचे गतिमान एकत्व साधण्याची क्षमता जोवर येत नाही तोपर्यंत, तुम्ही स्वत: म्हणजे दिव्य शक्तीच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला असा एक देह आणि आत्मा आहात, की जो सारी कर्मे तिच्यासाठीच करत आहे, असा विचार तुम्ही स्वतःबद्दल केला पाहिजे. स्वतंत्र कर्तेपणाची भावना तुमच्यामध्ये अजूनही खूप प्रभावी असली आणि कर्म करणारा मीच आहे, अशी तुमची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते कर्म त्या ईश्वरी शक्तीसाठीच केले पाहिजे. अहंकारी निवडीचा सर्व ताणतणाव, वैयक्तिक लाभासाठीची सर्व लालसा, स्वार्थी इच्छांच्या सर्व अटी या प्रकृतीमधून काढून टाकल्या पाहिजेत. तेथे फळाची कोणतीही मागणी असता कामा नये, तसेच काहीतरी बक्षीस मिळावे म्हणून धडपड करता कामा नये; ‘दिव्य माते’चा आनंद आणि तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमचे एकमेव फळ आणि दिव्य चेतनेमध्ये सातत्यपूर्ण प्रगती आणि स्थिरता, सामर्थ्य, आणि आनंद हेच तुमचे पारितोषिक! सेवेचा आनंद आणि कर्मामधून आंतरिक विकासाचा आनंद हा निःस्वार्थी कार्यकर्त्यासाठी पुरेसा मोबदला असतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद
[CWSA 32 : 12-13]
- निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार - September 12, 2024
- साक्षात्कार आणि रूपांतरण - September 11, 2024
- अतिमानसिक साक्षात्कार - September 10, 2024