कर्म आराधना – २७

सहसा माणसं प्राणिक अस्तित्वाच्या सामान्य प्रेरणांनी उद्युक्त होऊन अथवा गरजेपोटी, संपत्ती किंवा यश किंवा पद किंवा सत्ता किंवा प्रसिद्धी यांबद्दलच्या इच्छेने प्रेरित होऊन किंवा कार्यरत राहण्याच्या ओढीने, आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचे आविष्करण करण्याच्या सुखासाठी काम करतात, जीवनव्यवहार करतात. आणि ते त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कार्यशक्तीनुसार आणि त्यांची प्रकृती व त्यांचे कर्म यांच्या फलस्वरूप असलेल्या सुदैवानुसार किंवा दुर्दैवानुसार त्यामध्ये यशस्वी होतात किंवा अपयशी ठरतात.

(परंतु) एखादी व्यक्ती जेव्हा ‘योगमार्ग’ स्वीकारते आणि स्वतःचे जीवन ‘ईश्वरा’र्पण करू इच्छिते तेव्हा प्राणिक अस्तित्वाच्या या सामान्य प्रेरणांना पुरेसा आणि मुक्त वाव मिळेनासा होतो; अशा वेळी त्यांची जागा दुसऱ्या प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे, प्रामुख्याने आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणांनी त्यांची जागा घेतली पाहिजे. त्यामुळे साधकाला पूर्वीच्याच ऊर्जेनिशी कर्म करणे शक्य होऊ शकते, (पण) आता ते कर्म त्याने स्वतःसाठी केलेले नसते, तर ते ‘ईश्वरा’साठी केलेले असते.

सामान्य प्राणिक प्रेरणा किंवा प्राणिक शक्ती ही जर मुक्तपणाने कार्यरत होऊ शकली नाही आणि तरीही इतर कोणत्या गोष्टीने तिची जागा घेतली नाही तर, कदाचित त्यानंतर, कर्मामध्ये ओतण्यात आलेली प्रेरणा वा शक्ती कमी होण्याची शक्यता असते किंवा यशप्राप्तीसाठी लागणारी शक्तीही तेथे शिल्लक न राहण्याची शक्यता असते. प्रामाणिक साधकासाठी ही अडचण तात्कालिकच असण्याची शक्यता असते; परंतु त्याने त्याच्या आत्मनिवेदनातील (consecration) किंवा त्याच्या दृष्टिकोनातील दोष शोधून तो काढून टाकला पाहिजे. तेव्हा मग दिव्य ‘शक्ती’ स्वतःहून अशा साधकाच्या माध्यमातून कार्य करू लागेल आणि तिच्या साध्यासाठी त्या व्यक्तीची क्षमता व प्राणिक शक्ती उपयोगात आणेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 233]

श्रीअरविंद