कर्म आराधना – १६

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा तत्सम अनेकानेक गोष्टी – नैतिक किंवा आदर्शवादी अशा इतर सर्व गोष्टी – ज्या गोष्टी या कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, ते सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाही.

जी कृती ‘ईश्वरा’ साठी केली जाते, जी ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच, ही गोष्ट प्रारंभी तितकीशी सोपी नसते; गहन चिंतन आणि प्रदीप्त ज्ञान यांच्यापेक्षा ते काही कमी सोपे नसते, किंबहुना खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. पण त्या इतर गोष्टींप्रमाणेच (कर्म) या गोष्टीची सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य इच्छेनिशी ही गोष्ट करण्यास तुम्ही प्रारंभ केला पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील.

अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 216-217)

श्रीअरविंद