कर्म आराधना – ०७

‘ईश्वरी इच्छा’ आपल्याकडून कार्य करवून घेत आहे, हे आम्हाला कसे आणि केव्हा कळेल, असा प्रश्न तुम्ही विचाराल. ‘ईश्वरी इच्छा’ ओळखणे अवघड नसते. ती सुस्पष्ट असते. तुम्ही योगमार्गावर फारसे प्रगत झालेला नसलात तरीही ती तुम्हाला ओळखता येते. तुम्हाला केवळ त्या इच्छेचा आवाज ऐकता आला पाहिजे, एक सूक्ष्मसा आवाज, जो इथे हृदयामध्ये असतो. एकदा का तुम्हाला हा आवाज ऐकण्याची सवय लागली की, ‘ईश्वरी इच्छे’च्या विरोधी असे जे काही तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला लगेचच अस्वस्थ वाटू लागेल. तुम्ही अयोग्य मार्गावरून तसेच चालत राहिलात तर तुम्हाला अधिकच अस्वस्थ वाटू लागेल. तरीसुद्धा तुमच्या अस्वस्थतेचे कारण म्हणून तुम्ही काही भौतिक समर्थन करू पाहाल आणि त्या वाटेवरून तुम्ही तसेच चालत राहाल तर, मग ही अंत:संवेदन-क्षमता तुम्ही हळूहळू गमावून बसता आणि अंतिमतः सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करूनही, तुम्हाला अस्वस्थता जाणवत नाही. परंतु तुम्हाला किंचितशी जरी अस्वस्थता जाणवली आणि थोडेसे थांबून, तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला विचारलेत की, ”याचे कारण काय असेल?” तर तेव्हा तुम्हाला खरेखुरे उत्तर मिळते आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वच्छपणे कळून येतात. जेव्हा तुम्हाला काहीसे नैराश्य किंवा थोडीशी अस्वस्थता जाणवते तेव्हा तुम्ही त्याला भौतिक समर्थन देण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही थांबून त्या अस्वस्थतेचे कारण शोधू पाहता, तेव्हा तुम्ही अगदी सरळ आणि प्रामाणिक असले पाहिजे. सुरुवातीला तुमचे मन एक अगदी समर्थनीय आणि चांगलेसे स्पष्टीकरण रचेल. ते स्वीकारू नका, तर त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा आणि विचारा की, “हे जे काही चालले आहे, त्यापाठीमागे नेमके काय आहे? मी हे का करत आहे?” शेवटी, मनाच्या एका कोपऱ्यात, एक छोटासा तरंग दडून बसलेला आहे असे तुम्हाला आढळेल – तुमच्या दृष्टिकोनामध्ये असलेले एखादे छोटेसे चुकीचे वळण किंवा तिढा, जो या साऱ्या अडचणींचे किंवा अस्वस्थतेचे कारण असतो, असा शोध अंतिमत: तुम्हाला लागेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 08-09)

श्रीमाताजी