कर्म आराधना – ०६
प्रश्न : ईश्वराची ‘इच्छा’ काय आहे, हे आम्हाला कसे कळू शकेल?
श्रीमाताजी : व्यक्तीला ईश्वराची ‘इच्छा’ काय आहे हे कळत नाही, तर तिला ती जाणवते. आणि ती जाणवण्यासाठी व्यक्तीने तेवढ्याच उत्कटतेने, अगदी प्रामाणिकपणे तशी इच्छा बाळगली पाहिजे म्हणजे मग प्रत्येक अडथळा नाहीसा होऊन जातो. जोपर्यंत तुम्हाला पसंती-नापसंती आहे, इच्छा आहेत, आकर्षणं आहेत, आवडी-निवडी आहेत तोवर या गोष्टी तुमच्यापासून ‘सत्य’ दडवून ठेवतात. त्यामुळे, पहिली गोष्ट करायची ती अशी की, तुमच्या चेतनेच्या सर्व गतिविधी सुधारण्याचा, त्यांच्यावर शासन करण्याचा, प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करायचा आणि सर्व गतिविधी या जोवर ‘सत्या’ची परिपूर्ण आणि चिरस्थायी अभिव्यक्ती बनत नाहीत तोपर्यंत तरी ज्यांच्यात परिवर्तन घडविणे शक्यच नाही अशा सर्व गोष्टी काढून टाकायच्या.
आणि नुसती इच्छा बाळगणेही पुरेसे नसते कारण व्यक्ती बरेचदा तशी इच्छा बाळगण्याचेच विसरून जाते.
आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अभीप्सा, जी व्यक्तित्वामध्ये एखाद्या अग्निहोत्राप्रमाणे तेवत असते. ज्या ज्या वेळी तुमच्यामध्ये एखादी इच्छा, पसंती-नापसंती, एखादे आकर्षण डोके वर काढते तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचे या अग्नीमध्ये तुम्ही हवन केले पाहिजे. तुम्ही हे चिकाटीने करत राहिलात तर, तुमच्या सामान्य चेतनेमध्ये सत्य-चेतनेचा एक छोटासा किरण उदय पावू लागला असल्याचे तुमचे तुम्हाला दिसून येईल. सुरुवातीला तो किरण अगदी अस्पष्ट असेल; तो इच्छावासना, पसंतीनापसंती, आकर्षण-प्रतिकर्षण, आवड-निवड या साऱ्या कोलाहलापासून खूप मागे, दूर असेल. परंतु तुम्ही या साऱ्याच्या पलीकडे गेलेच पाहिजे आणि मग तेथे तुम्हाला अगदी स्थिर, निश्चल, जवळजवळ शांत अशी सत्य चेतना आढळून येईल.
सत्य चेतनेच्या संपर्कात जे कोणी असतात त्यांना, एकाच वेळी सर्व शक्यता दृष्टिक्षेपात येतात आणि आवश्यकता असेल तर ते सर्वात जास्त प्रतिकूल शक्यतासुद्धा जाणीवपूर्वक निवडतात. परंतु या टप्प्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला बराच मोठा पल्ला गाठावाच लागतो
– श्रीमाताजी
(CWM 04 : 02-03)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024