कृतज्ञता – १०
काही जण असे असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे एक आश्चर्यकारक गोष्ट दडलेली आहे अशी त्यांची समजूत असते, आणि त्या गोष्टीप्रत, आत्मीयतेने, भक्तीने, आनंदाने प्रतिक्रिया देण्याची, प्रतिसाद देण्याची एक उत्कट गरज त्यांना भासते. अगदी छोट्यात छोट्या अशा गोष्टीमागे, जीवनातील अगदी लहानशा घटनेमागे, ज्यांना त्या ईश्वराची अनंत ‘कृपा’ किंवा सार्वभौम सौंदर्य जाणवते अशा लोकांमध्ये त्या ईश्वराप्रत एक प्रकारची कृतज्ञतेची भावना असते.
मला अशी काही माणसं माहीत आहेत की, ज्यांना फारसे काही ज्ञान नव्हते, म्हणजे ते फार शिकलेले होते असे नाही, त्यांची मने अगदीच सर्वसाधारण म्हणता येतील अशी होती परंतु त्यांच्याकडे ही आत्मीयतेची, कृतज्ञतेची क्षमता होती; ज्यामुळे ते सर्व काही देऊ करण्यास तयार असत, ज्यामुळे त्यांना समज येत असे आणि ते कृतज्ञ असत.
अशा व्यक्तींचा, त्यांच्या अंतरात्म्याशी वारंवार संपर्क (Psychic contact) होत असे, तो जवळजवळ नेहमीचाच झाल्यासारखा असे. त्या व्यक्ती जेवढ्या प्रमाणात सक्षम असत, जेवढ्या प्रमाणात सजग असत (अगदी खूप सजग असेसुद्धा नाही, थोड्याशा सजग असल्या तरीसुद्धा) तेवढ्या प्रमाणात त्यांचे उन्नयन झाल्यासारखे, त्यांना कोणीतरी उचलून घेतल्याचे, काहीतरी साहाय्य मिळाल्याचे अशा व्यक्तींना जाणवत असे.
कृतज्ञतेची ही भावना तुम्हाला तुमच्या क्षुद्र आणि त्रासदायक अशा अहंकारातून बाहेर काढत असते. …स्वत:च्या चैत्य पुरुषामध्ये वसलेल्या ‘ईश्वरा’च्या संपर्कात येण्यासाठीची ही अतिशय शक्तिशाली तरफ (lever) आहे. चैत्य पुरुषाशी जोडणारा एक खात्रीशीर धागा म्हणून ती कार्य करते.
– श्रीमाताजी
(CWM 07 : 418-419)
- संतमंडळींचे कृतज्ञ स्मरण - March 26, 2023
- प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद - March 25, 2023
- उच्च अपरिमित ईश्वरी कृपा - March 24, 2023