कृतज्ञता – ०४

करुणा आणि कृतज्ञता हे मूलत: चैत्य गुण आहेत. चैत्य पुरुष जेव्हा सक्रिय जीवनामध्ये भाग घेऊ लागतो तेव्हाच चेतनेमध्ये हे गुण प्रकट होऊ लागतात. वास्तविक हे गुण सामर्थ्यशक्तीवर आधारित असतात परंतु, मन व प्राणाला हे गुण म्हणजे दुबळेपणा आहे असे वाटते. कारण ते मनाच्या आणि प्राणाच्या आवेगांना स्वैरपणे प्रकट होण्यापासून रोखतात.

पुरेसे शिक्षित नसलेले मन, हे बहुधा नेहमीच प्राणाचे साथीदार असते आणि शारीर प्रकृतीचे गुलाम असते आणि अशा मनाचे कायदे प्राणाच्या व शरीराच्या अर्धजागृत यंत्रणेमध्ये इतके काही बळकट असतात की, त्यांना करुणा आणि कृतज्ञता या गुणांचा अर्थच नेमकेपणाने समजत नाही. जेव्हा मन प्रथमत: चैत्य हालचालींविषयी जागृत होऊ लागते तेव्हा स्वत:च्या अज्ञानामुळे त्या हालचालींचा ते पार विपर्यास करून टाकते आणि करुणेचे रूपांतर दया किंवा कणव यांमध्ये करून टाकते किंवा फार फार तर त्याचे रूपांतर भूतदयेमध्ये करते. कृतज्ञतेचे रूपांतर परतफेडीच्या इच्छेमध्ये करते…

जेव्हा व्यक्तीमध्ये चैत्य जाणीव ही पूर्णपणे प्रभावी झालेली असते तेव्हाच फक्त ज्या ज्या कोणाला मदतीची गरज भासते, त्या व्यक्तींविषयी तिला करुणा वाटते; मग ती मदत कोणत्याही क्षेत्रातली का असेना. तसेच ज्या कोणत्या गोष्टीमधून ईश्वरी अस्तित्वाची आणि कृपेची अभिव्यक्ती होते अशा सर्व गोष्टींविषयी, मग त्या गोष्टी कोणत्याही रूपामध्ये असू देत, त्या जर त्यांच्या अगदी मूळरूपात आणि तेजोमय शुद्धतेने अभिव्यक्त होत असतील तर, कोणत्याही मेहेरबानीचा लवलेशही नसलेली अमिश्रित अशी करुणा किंवा न्यूनगंडाची कोणतीही भावना नसलेली अशी कृतज्ञता, (चैत्य जाणीव प्रभावी झालेल्या व्यक्तीमध्ये) आढळून येते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 277)

श्रीमाताजी