कृतज्ञता – ०२

कोणे एके काळी एक भव्य राजवाडा होता, त्याच्या गाभ्यामध्ये एक गुप्त असे देवालय होते. त्याचा उंबरठा आजवर कोणीच ओलांडलेला नव्हता. एवढेच नव्हे तर, त्या देवालयाचा अगदी बाह्य भागसुद्धा मर्त्य जिवांसाठी जवळजवळ अप्राप्य असाच होता, कारण तो राजवाडा एका अतिशय उंच ढगावर उभारलेला होता आणि कोणत्याही युगातील अगदी मोजकीच मंडळी त्याच्याप्रत पोहोचण्याचा मार्ग शोधू शकत असत.

हा ‘सत्या’चा राजवाडा होता.

एके दिवशी तेथे एक उत्सव आयोजित करण्यात आला होता, तो माणसांसाठी नव्हता, तर तो अत्यंत वेगळ्या जीवयोनींसाठी होता. ज्या देवदेवतांना पृथ्वीवर त्यांच्या ‘गुणवैशिष्ट्यां’नुसार पूजले जाते, अशा लहानमोठ्या देवदेवतांसाठी तो उत्सव होता.

त्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक भलेमोठे सभागृह होते. त्याच्या भिंती, त्याची जमीन, त्याचे छत, सारे काही प्रकाशमान होते. ते असंख्य लखलखणाऱ्या अग्नींनी उजळून निघालेले होते. ते ‘बुद्धिमत्ते’चे सभागृह होते. जमिनीजवळ अतिशय सौम्य प्रकाश होता आणि त्याला एक सुंदरशी नीलवर्णी छटा होती, पण छताकडे मात्र ती क्रमाक्रमाने अधिकाधिक सुस्पष्ट होत गेली होती, तेथे हिऱ्यांचे झुबके छताला झुंबरासारखे लटकलेले होते आणि त्यातून असंख्य किरण झगमगत होते.

तेथे प्रत्येक ‘सद्गुणा’ने स्वतंत्रपणे प्रवेश केला होता, पण लवकरच त्यांचे समविचारी असे छोटेछोटे समूह तयार झाले. एकदा का होईना, पण सारे एकत्र जमल्यामुळे ते आनंदात होते, कारण अन्यवेळी ते सारे या विश्वामध्ये आणि अन्य लोकांमध्येही दूरदूर पसरलेले असतात, भिन्न भिन्न जिवांमध्ये विखुरलेले असतात.

त्या उत्सवावर ‘प्रामाणिकते’ची (Sincerity) सत्ता होती. तिने नितळ पाण्यासारखा, पारदर्शक असा एक पोषाख परिधान केलेला होता, तिच्या हातामध्ये एक अतिशय शुद्ध असे घनाकार स्फटिक होते आणि त्यामधून साऱ्या गोष्टी एरवी जशा दिसतात त्यापेक्षा भिन्न अशा म्हणजे वास्तविक त्या जशा आहेत तशा दिसत होत्या, कारण तेथे त्यांची प्रतिमा कोणत्याही विकृतीविना प्रतिबिंबित होत होती.

तिच्या जवळच, जणू तिच्या विश्वासू रक्षकांप्रमाणे वाटावेत असे ‘विनम्रता’ आणि ‘धैर्य’ हे दोन गुण उभे होते. विनम्रता ही आदरणीय होती आणि त्याच वेळी ती स्वाभिमानी होती. तर धैर्य हा उन्नत-माथा असलेला, स्वच्छ डोळ्यांचा होता, त्याचे ओठ दृढ आणि हसणारे होते, त्याच्या अवतीभोवतीचे वातावरण शांत आणि निर्णायक होते.

‘धैर्या’च्या जवळच, त्याच्या हातात हात घालून एक स्त्री उभी होती, तिने स्वतःला पूर्णपणे झाकून घेतलेले होते, तिने परिधान केलेल्या त्या अंगरख्यामधून तिच्या शोधक नजरेव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते; अंगरख्याआडून फक्त तिचे डोळे चमकताना दिसत होते, ती ‘विवेकबुद्धी’ होती.

त्या सगळ्यांमध्ये वावरणारी, इकडून तिकडे ये-जा करणारी आणि तरीही सतत प्रत्येकाजवळच आहे असे वाटावी अशी एक व्यक्ती होती, तिचे नाव ‘उदारता’ असे होते. ती एकाच वेळी सतर्क आणि शांत होती, ती सक्रिय होती आणि तरीदेखील सर्वांपासून स्वतंत्र होती.

ती त्या समूहामधून बाहेर पडताना, तिच्या मागे एक सौम्य पांढऱ्या रंगाची प्रकाशरेषा सोडून जात होती. ‘उदारता’ जो प्रकाश प्रस्फुरित करत असते, जो ती सौम्यपणे पसरवित जात असते, त्या प्रकाशाची प्रभा इतकी सूक्ष्म असते की, बहुसंख्य डोळ्यांना ती अदृश्यच असते. ती प्रभा उदारतेला तिच्या अगदी घनिष्ठ मैत्रिणीपासून, कधीही विलग होऊ न शकणाऱ्या अशा सहचारिणीपासून, तिच्या जुळ्या बहिणीपासून म्हणजे ‘न्यायबुद्धी’कडून प्राप्त होत असते.

‘उदारते’च्या आजूबाजूला ‘दयाळूपणा’, ‘सहनशीलता’, ‘मृदुता’, ‘उत्कंठा’ आणि तत्सम इतरांनी दिमाखदार घोळका केला होता. सारे जण तेथे उपस्थित होते. पण एकाएकी, त्या सुवर्णमय उंबरठ्यावर एका नवागत स्त्रीचे आगमन झाले.

दरवाज्यापाशी राखण करणाऱ्या द्वारपालांनी मोठ्या नाखुषीने तिला आत प्रवेश करण्यास संमती दिली. त्यांनी तिला यापूर्वी कधी पाहिले नव्हते किंवा त्यांच्यावर प्रभाव पडावा असे तिचे रंगरूपही नव्हते. ती खरोखरच अगदी लहानशा चणीची आणि सडपातळ होती आणि तिने जो पोशाख परिधान केलेला होता तोही अगदी साधासा, गरिबासारखा होता. ती काहीशी संकोचून, अवघडल्यासारखी काही पावले टाकत पुढे आली. त्या एवढ्या मोठ्या ऐश्वर्यसंपन्न आणि तेजःपुंज लोकांमध्ये, नक्की कोणाकडे जावे हे न कळल्याने, गोंधळून गेलेली ती तिथेच थबकली.

सख्यासोबत्यांबरोबर झालेल्या काही जुजबी संभाषणानंतर, त्यांच्याच विनंतीवरून ‘विवेकबुद्धी’ पुढे झाली आणि त्या नवख्या व्यक्तीच्या दिशेने गेली. त्या नवख्या स्त्रीला विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विवेकबुद्धीने दोन क्षण जाऊ दिले आणि मग त्या स्त्रीकडे बघून ती म्हणाली, ”आत्ता इथे जमलेल्यांपैकी आम्ही सर्व जण नावानिशी आणि प्रत्येकाच्या गुणांनुसार एकमेकांना ओळखतो. आम्ही सारे तुझ्या येण्याने आश्चर्यचकित झालो आहोत कारण तू आमच्यासाठी नवखी आहेस, किंवा किमान आम्ही तुला याआधी कधी पाहिले असल्याचे स्मरत नाही. तू कोण आहेस, ते कृपा करून आम्हाला सांगशील का?”

एक निःश्वास टाकत ती नवखी व्यक्ती उद्गारली, ”या राजवाड्यामध्ये सर्वांना मी अनोळखी असल्याचे वाटत आहे, यामध्ये मला काहीच आश्चर्य वाटत नाहीये, कारण मला क्वचितच कोठे आमंत्रित केले जाते. माझे नाव ‘कृतज्ञता’!”

(तात्पर्य : कृतज्ञता हा एक अत्यंत दुर्मिळ गुण आहे.)

– श्रीमाताजी
(CWM 02 : 05-07)

श्रीमाताजी