‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
‘प्रकृती’ ही उत्क्रांतीच्या माध्यमातून एक प्रकारे योगच करत आहे. या योगप्रवासामध्ये जडसृष्टी, प्राण, मन यांच्या विकसनानंतर, आता एका नवीन उत्क्रांती-टप्प्याकडे तिच्या विकसनाची वाटचाल चालू आहे. अधिमानस, अतिमानव, आणि अतिमानसिक जीव या मार्गाने ती वाटचाल करत आहे, असे श्रीअरविंद यांनी स्पष्ट केले आहे.
आजवरच्या वाटचालीमध्ये प्रकृती एकाकी रीतीने हे कार्य करत होती. परंतु मानव – हा तिचा अधिक विकसित जीव आता या कार्यामध्ये तिचा सहभागीदार होऊ शकतो, ही शक्यता प्रथमतः श्रीअरविंद यांच्या दृष्टिक्षेपात आली. आणि प्रकृतीच्या या कार्यामध्ये, तिला त्वरेने पुढच्या टप्प्याकडे जाण्याच्या प्रक्रियेमध्ये साहाय्य करण्याच्या दृष्टीने श्रीअरविंद यांच्या समवेत श्रीमाताजीदेखील सहभागी झाल्या.
अधिमानसाचे अवतरण (Descent of Over-mind) दि. २४ नोव्हेंबर १९२६ रोजी घडून आल्याचे आपण विचारात घेतले. त्यानंतर अतिमानसाकडे (Supramental) वाटचाल सुरू झाली. आणि याच अधिक उच्चतर कार्यासाठी, अधिक गहनतर कार्यासाठी, अधिक एकाग्रतेने, एकदिश होत कार्य करण्याची आवश्यकता होती. ती आवश्यकता लक्षात घेऊन, दैनंदिन जीवनामधून स्वतःला बाजूला करून, श्रीअरविंदांनी एकांतवास स्वीकारला. पुढे चोवीस वर्षे ते आश्रमातील त्यांच्या खोलीमधून एकदाही बाहेर आले नाहीत. श्रीअरविंदआश्रम आणि साधकांच्या साधनेची सर्व जबाबदारी त्यांनी श्रीमाताजींवर सोपवली होती.
‘अतिमानसिक जीव’ (Supramental Being) ही नवीनच श्रेणी प्रकृतीच्या विकासक्रमामध्ये उदयाला यायची असेल तर, पृथ्वी-चेतनेमध्ये अतिमानसाची प्रस्थापना करणे आवश्यक आहे, हे मानवी बुद्धीच्या आकलनापलीकडचे असे कार्य श्रीअरविंद आणि श्रीमाताजी करू पाहत होते. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी या ‘अवतारद्वया’ची सारी योगसाधना त्या दिशेने उत्क्रांत होत होती. त्या साधनेच्या दरम्यान एका विवक्षित क्षणी श्रीअरविंद यांच्या लक्षात आले की, दोघांपैकी कोणा एकाच्या देहामध्ये अतिमानसिक चेतनेची रूजवण करून, तो देह पृथ्वी-चेतनेमध्ये समरस करणे आवश्यक आहे, म्हणजे मग अतिमानसाची प्रस्थापना पृथ्वी-चेतनेमध्ये होईल. श्रीअरविंदांनी हे जेव्हा श्रीमाताजींना सांगितले तेव्हा, श्रीमाताजींनी आपला देह या कार्यासाठी देण्याची तयारी दाखविली. मात्र श्रीअरविंदांनी त्यांना सांगितले की, “त्यासाठी तुम्ही देहत्याग करता कामा नये, कारण माझ्या देहापेक्षा तुमचा देह ‘रूपांतरणा’च्या कार्यासाठी अधिक सुयोग्य आहे. तेव्हा तुम्हाला देहामध्ये राहूनच कार्य पुढे न्यावे लागेल.” याचा अर्थ असा की, देहत्यागाची जेव्हा आवश्यकता निर्माण होईल तेव्हा ‘मी देहत्याग करीन’, असे श्रीअरविंदांनी सूचित केले होते. हा संवाद होता सन १९३८ मधील!
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी हा जो उत्क्रांतियोग करत होते, त्यामध्ये आता तो क्षण जवळ येत चालला होता. जणू अनंत काळ आपल्या हाती आहे, अशी कार्यपद्धती असणारे श्रीअरविंद नोव्हेंबर १९५० च्या सुमारास ‘सावित्री’चे लेखनकार्य त्वरेने पूर्ण करण्यामागे लागले होते, अशी माहिती सावित्रीचे लेखकु झालेले निरोदबरन देतात. Book of Death and the Epilogue हे सावित्रीमधील शेवटचे दोन अध्याय वगळता, श्रीअरविंद यांनी सावित्रीच्या पुनर्लेखनाचे सर्व कार्य पूर्ण केले होते. हे दोन अध्याय बाकी आहेत, असे निरोदबरन यांनी सांगताच “ते नंतर पाहू,” असे म्हणत श्रीअरविंदांनी आपल्या निर्गमनाचा सूचक संकेत दिला होता.
एरवी साधकांच्या तब्येतीवर आपल्या योगसामर्थ्याने उपचार करणारे श्रीअरविंद, स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र त्या योगशक्तीचा वापर करत नव्हते. ते पाहून, ‘आपण आपली योगशक्ती का वापरत नाही’, असे निकटवर्तीयांनी विचारले तेव्हा, “त्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही, तुम्हाला ते कळणार नाही,” असे श्रीअरविंद यांनी सांगितले होते. या साऱ्याच गोष्टी त्यांच्या हेतुपूर्वक चाललेल्या निर्गमनाकडे निर्देश करणाऱ्या होत्या. श्रीमाताजींना याची जाणीव होत होती, त्यांनीही डॉ. संन्याल (अखेरच्या काळात श्रीअरविंदांवर उपचार करणारे डॉक्टर) यांना सांगितले होते, “…he is withdrawing.”
आणि अखेर तो दिवस उजाडला, दि. ०५ डिसेंबर १९५०, पहाटे ०१ वाजून २० मिनिटांनी अगदी शांतपणे श्रीअरविंदांनी निर्गमन केले. रूढ अर्थाने ज्याला ‘मृत्यू’ म्हणता येईल असा हा मृत्यू नव्हता. याची ग्वाही, निर्गमनानंतरही पाच दिवसपर्यंत त्यांचा पार्थिव देह तसाच टिकून राहिला होता, यामधून मिळते. या अद्भुत घटनेची वार्ता कळल्यानंतर, यामध्ये काही रासायनिक पदार्थांचा वापर करून देह टिकवून ठेवला असावा, अशी शंका घेऊन फ्रेंच डॉक्टर येऊन तपासणी करून गेले होते. उष्णकटिबंधीय प्रांतामध्ये देहावर अंतिम संस्कार न करता, तो देह जास्तीत जास्त ४८ तास ठेवता येतो, असे कायदा सांगत होता. आणि इथे १०० तास, कोणत्याही रसायनांचा वापर न करता, श्रीअरविंदांचा देह विघटन न होता, तसाच शाबूत होता, याची निःसंशय ग्वाही त्या फ्रेंच डॉक्टरांनी दिली. हा एक ‘चमत्कार’ असल्याचा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला.
श्रीअरविंदांचे निर्गमन होऊनही देह तसाच कायम आहे, हे लक्षात आल्यावर श्रीमाताजींनी अध्यात्ममार्गाने, उच्च पातळीवरून त्यांची भेट घेतली आणि ‘आपण पुन्हा या देहात परतणार आहात काय?’ असे विचारले. तेव्हा श्रीअरविंदांनी उत्तर दिले, “I have left this body purposely. I will not take it back. I shall manifest again in the first Supramental body built in the Supramental way.” मी या देहाचा हेतुपूर्वक त्याग केला आहे, तेव्हा मी या देहामध्ये आता परतणार नाही. अतिमानसिक पद्धतीने घडण होऊन जेव्हा पहिला अतिमानसिक देह तयार होईल तेव्हा मी त्या माध्यमातून आविष्कृत होईन, असे श्रीअरविंदांनी उत्तर दिले होते.
श्रीमाताजींनी डिसेंबर १९५० मध्ये सांगितले, “He was not compelled to leave his body, he choose to do so for reasons so sublime that they are beyond the reach of human mentality.” (“त्यांना देहत्याग करणे भाग पडले नव्हते, तर त्यांनी तो स्वतःहून घेतलेला निर्णय होता. त्याची कारणे इतकी उदात्त आहेत की, कोणत्याही मानवी मानसिकतेच्या आकलनशक्तीच्या ती पलीकडची आहेत,’ असे श्रीमाताजींनी सांगितले होते.)
‘सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा’ या भूमिकेतून श्रीअरविंदांनी हे बलिदान केले होते. पृथ्वी-चेतनेमध्ये अतिमानसिक चेतना स्थापित करण्यासाठी केलेली ही सर्वोच्च कृती होती. श्रीअरविंद पृथ्वीच्या गर्भात शिरून पुढील कार्य अदृश्यरूपाने करू पाहात होते. आणि त्यांच्यानंतर, तेच कार्य या पृथ्वीतलावर करण्यासाठी परमेश्वराने श्रीमाताजींची योजना केली होती. श्रीअरविंदांच्या निर्गमनानंतर, श्रीअरविंदांच्या देहामध्ये साठविलेली योगशक्ती त्यांनी श्रीमाताजींमध्ये संक्रमित केली. श्रीअरविंदांच्या देहावर विघटनाचे पहिले लक्षण दिसून येताच डॉ. संन्याल यांनी श्रीअरविंदांचे ‘निधन’ झाल्याचे घोषित केले. त्यानंतर लगेचच या शक्ती-संक्रमणाचा सघन अनुभव श्रीमाताजींना आला. “हा अनुभव इतका सघन होता, की आपल्या देहाच्या रंध्रांमधून ती शक्ती संक्रमित होत असताना, जणू काही घर्षण होत आहे,’ अशी जाणीव श्रीमाताजींना होत होती.
अतिमानसिक चेतनेसंदर्भातील, पृथ्वी-चेतनेच्या रूपांतरणाच्या संदर्भातील हे कार्य श्रीअरविंदांच्या निर्गमनानंतर, सन १९७३ पर्यंत श्रीमाताजींनी पुढे चालू ठेवले. महायोगी श्रीअरविंद यांच्या जीवनातील साऱ्याच घटना इतक्या अगम्य आहेत, मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडील आहेत की, त्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने वेध घेणे अवघड आहे, एक प्रकारे अशक्यप्राय आहे. त्यांचे चरित्रलेखन करू पाहणाऱ्या लेखकांना श्रीअरविंदांचे सांगणे होते की, “माझे चरित्र लिहिण्याच्या फंदात पडू नका. तुमचा तो प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही. कारण तुम्हाला काय किंवा अन्य कोणालाही काय माझ्या जीवनाबाबतीत तीळमात्र माहिती नाही, कारण माझे जीवन, माणसाच्या दृष्टीला दिसू शकेल अशा पद्धतीने पृष्ठभागावर जगण्यात आलेले नाही.”
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ ही मालिका म्हणजे, श्रीअरविंदांचे पृष्ठस्तरीय जीवन समजावून घेण्याचा एक तोकडा प्रयत्न होता, याची जाणीव मनात बाळगत, येथे या चरित्रपर मालिकेची परिसमाप्ती करत आहोत. या प्रवासामध्ये सारे वाचक आमच्या सोबत होते, याबद्दलची कृतज्ञता येथे व्यक्त करावीशी वाटते. मनापासून धन्यवाद!!
– संपादक, अभीप्सा मराठी मासिक
- सौख्य आणि शांती यांचा अनुभव - August 23, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – प्रस्तावना - May 26, 2024
- पूर्णयोग ‘ईश्वरा’साठी - May 6, 2024