‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

दि. ०७ डिसेंबरला श्रीमाताजींनी लिहिले आहे – “हे प्रभू, तुमचे कार्य जोवर साध्य होत नाही तोवर तुम्ही आमच्या सोबत असाल, मार्गदर्शन आणि प्रबोधन करणारी केवळ चेतना म्हणूनच नव्हे तर, कृतीमधील गतिशील ‘उपस्थिती’ म्हणूनदेखील तुम्ही आमच्या सोबत असाल, असा विश्वास तुम्ही मला आज सकाळी दिला आहे. जोवर पृथ्वीचे रूपांतरण होत नाही तोवर तुमच्यामधील सारे सारेकाही येथेच राहील; तोवर तुम्ही पृथ्वीचे वातावरण सोडून जाणार नाही, असे अगदी निःसंशय पद्धतीने तुम्ही वचन दिले आहे. या अद्भुत ‘उपस्थिती’ ला आम्ही सुपात्र ठरू आणि आमच्यामधील प्रत्येक गोष्ट यापुढे, तुमच्या उदात्त कार्याच्या परिपूर्तीसाठी अधिकाधिक परिपूर्णपणे समर्पित व्हावी या एकाच इच्छेवर केंद्रित होवो, असे आम्हास वरदान द्या.”

“श्रीअरविंदांनी देह ठेवण्याचा जो निर्णय घेतला त्याला पृथ्वीच्या आणि माणसांच्या ग्रहणशीलतेचा अभाव कारणीभूत ठरला. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, शारीरिक स्तरावर हे जे काही घडले त्याचा त्यांच्या शिकवणुकीच्या सत्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांनी जे सांगितले आहे ते पूर्णतया सत्य आहे आणि ते तसेच राहणार आहे. येणारा काळ आणि घटनाक्रम ते सत्य असल्याचे सिद्ध करतील.

देह ठेवल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे दि. ०९ डिसेंबर १९५० श्रीअरविंदांचा देह आश्रमातील प्रांगणामध्ये समाधिस्थ करण्यात आला. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक