‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांमध्ये १९४८ ते १९४९ च्या दरम्यान आजारपणाची काही लक्षणं दिसून आली. मध्यंतरीच्या काळात ती दिसेनाशी झाली होती पण कालांतराने म्हणजे १९५० च्या मध्यावर ती पुन्हा एकदा दिसू लागली. आणि दि. ०५ डिसेंबर १९५० रोजी पहाटे ०१ वाजून २६ मिनिटांनी श्रीअरविंदांनी देह ठेवला.

श्रीअरविंद यांचा देह समाधि-स्थानी ठेवण्याची सारी व्यवस्था करण्यात आली होती पण सहा डिसेंबरला संध्याकाळी श्रीमाताजींनी पुढील संदेश प्रसृत केला की, “श्रीअरविंदांचा अंतिमसंस्कार आज करण्यात आलेला नाही. त्यांच्या देहामध्ये ‘अतिमानसिक प्रकाशा’चे (Supramental Light) संघनीकरण झालेले असल्यामुळे, त्या देहावर विघटनाची कोणतेही चिन्ह दिसत नाही आणि जोवर तो देह जसाच्या तसा आहे तोवर त्यांचा देह तसाच ठेवण्यात येईल.’’

श्रीअरविंदांच्या देहाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

श्रीअरविंद यांच्या महासमाधीनंतर ५ दिवसपर्यंत देह विघटन न होता तसाच कायम राहणे, या अद्भुत घटनेची नोंद The Hindu यासारख्या तत्कालीन प्रसिद्ध वृत्तपत्रांनी देखील घेतली होती. पुढे त्या घटनेचे स्पष्टीकरण करताना ज्येष्ठ साधक श्री. अमल किरण (श्री. के. डी. सेठना) यांनी असे म्हटले होते की, “श्रीअरविंद यांच्या देहाभोवती अनेकांनी पाहिलेला अद्भुत सोनेरी प्रकाश पाच दिवस, त्यावरील तजेला निघून न जाता किंवा त्याला विघटनाचा किंचितसाही स्पर्श न होता, तसाच टिकून राहणे, ही गोष्ट म्हणजे, त्यांनी स्वत:च्या भौतिक देहरूपी-रचनेचा त्याग करून, पृथ्वीसाठी जो विजय संपादन केला होता, त्या विजयाचे द्योतक आहे.”(क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक