‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
श्रीअरविंद एकांतवासात गेले तेव्हापासून, म्हणजे सन १९२६ पासून ते १९५० पर्यंतच्या कालावधीतील त्यांचे एकही छायाचित्र उपलब्ध नाही. कारण जेव्हा त्यांचे छायाचित्र काढण्याची परवानगी मागण्यात आली होती तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला होता आणि टिप्पणी केली होती : “बऱ्याच लोकांनी यापूर्वी देखील असा प्रस्ताव मांडला होता.”
छायाचित्रांची ही प्रतीक्षा एप्रिल १९५० मध्ये संपली, जेव्हा हेन्री कार्टियर-ब्रेसाँ (फ्रेंच छायाचित्रकार) यांना श्रीअरविंद यांच्या खोलीत त्यांच्या छायाचित्रांची मालिका घेण्याची परवानगी मिळाली. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांपैकी एक छायाचित्र दि. २४ एप्रिल १९५० या दर्शनदिनी काढण्यात आलेले आहे. (हे छायाचित्र आजच्या post सोबत जोडत आहोत.) पुढे सात महिन्यांनंतर, ५ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद यांनी देह ठेवला. अशाप्रकारे कार्टियर-ब्रेसाँ यांनी काढलेली छायाचित्रे ही श्रीअरविंद यांच्या हयातीत काढली गेलेली शेवटची छायाचित्रे ठरली.
हेन्री कार्टियर-ब्रेसाँ १९५० मध्ये पाँडिचेरीला आले तेव्हा ते जगातील आघाडीच्या छायाचित्रकारांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. रमण महर्षी, महात्मा गांधी यांची त्यांनी काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध होती.
श्रीअरविंद यांच्या दहा मिनिटांच्या दर्शनाने कार्टियर-ब्रेसाँ प्रभावित झाले. बाहेर ब्रेसाँ यांची वाट पाहत असलेल्या मंडळींनी उत्सुकतेने विचारले, “छायाचित्रण कसे झाले?” कार्टियर-ब्रेसाँ यांनी उत्तर दिले, “त्यांच्यासारखी व्यक्ती मी आजवर पाहिलेली नाही. ते तिथे अगदी अविचल बसले होते.” (क्रमश:)
- प्रस्तावना - November 17, 2023
- प्रत्येक धर्माचे योगदान - November 6, 2023
- सुखी होण्याचा मार्ग - November 2, 2023