‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

दिनांक २९ मार्च १९१४. सकाळच्या वेळी अरविंदांना पॉल रिचर्ड्स भेटून आले होते. मीरा अरविंदांना दुपारी भेटणार होत्या. वातावरणात एक कुंद गभीरता होती, उत्सुकता होती. हा पुढील सर्व भाग त्यांच्याच शब्दांत जाणून घेणे श्रेयस्कर आहे. “मी काही पायऱ्या चढून वर गेले तर पायऱ्या जिथे संपत होत्या तेथे, सर्वात वर ते माझी वाट पाहत उभे होते अगदी तसेच, हुबेहूब दर्शनातल्यासारखे! ध्यानावस्थेत दिसलेल्या व्यक्तीसारखेच, तोच पेहराव, तीच स्थिती, तीच शरीरयष्टी, माथा काहीसा उन्नत. त्यांनी त्यांची दृष्टी माझ्याकडे वळवली मात्र…. मला त्यांच्या दृष्टीकडे पाहताक्षणीच जाणवले, हेच ते ! क्षणार्धात असे काही घडून आले की, माझे आंतरिक दृश्य व आत्ता समोर असलेले बाह्य दृश्य एकमेकांत बेमालूमपणे मिसळून गेले. माझ्या दृष्टीने हा निर्णायक असा सुखद, अद्भुत धक्का होता.”

पुढे अनेक वर्षानंतर श्रीमाताजी त्यांच्या प्रथम भेटीची आठवण व त्याचे महत्त्व सांगताना म्हणाल्या, ”मी प्रथम पाँडिचेरी येथे अरविंदांना भेटले तेव्हाचा हा प्रसंग आहे. मी गाढ ध्यानावस्थेत होते, अतिमानसातील (Supramental) गोष्टी मी पाहात होते. त्या गोष्टी जशा असावयास हव्यात तशाच होत्या, पण काही कारणाने त्या आविष्कृत होत नव्हत्या. जे काही मी पाहिले, ते मी अरविंदांना सांगितले आणि विचारले त्या गोष्टी आविष्कृत होतील का? ते फक्त एवढेच म्हणाले, “हो.” आणि त्याक्षणी मला असे दिसले की, अतिमानसाने या पृथ्वीला स्पर्श केला आहे आणि ते प्रत्यक्षीभूत होण्यास प्रारंभ झाला आहे. जे सत्य आहे ते वास्तवात उतरविण्याची ताकद काय असते, याचा पहिला अनुभव मला येथे पाहावयास मिळाला.”

दुसऱ्या दिवशी नेहमीच्या पद्धतीने त्या ध्यानाला बसल्या. मनात विचार होता नुकत्याच झालेल्या भेटीचा. दि. ३० मार्च १९१४, मीरा यांच्या दैनंदिनीत पुढील नोंद आढळते – ”हळूहळू क्षितिज अधिकाधिक सुस्पष्ट होत आहे. मार्ग सुनिश्चित होताना दिसत आहे. आणि आम्ही अधिकाधिक विश्वासाने पुढे पुढे पावले टाकीत आहोत. घोर अंधकारात बुडालेले आज हजारो लोक आजूबाजूला दिसत असले तरी, ते तितकेसे चिंतेचे कारण नाही; मी ज्यांना काल पाहिले ते याच भूतलावर अस्तित्वात आहेत. एक ना एक दिवस अंधकार प्रकाशात परिवर्तित होईल आणि त्या ईश्वराचे सार्वभौम साम्राज्य या पृथ्वीवर खरोखरीच प्रस्थापित झालेले असेल, याची हमी देण्यास त्यांचे केवळ अस्तित्वच पुरेसे आहे. हे ईश्वरा, या अद्भुताच्या दिव्य रचनाकारा, मी जेव्हा या साऱ्याचा विचार करते तेव्हा, माझे हृदय अतीव आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून जाते आणि माझ्या आशेला पारावार उरत नाही. माझी भक्ती, अभिव्यक्तीच्या पलीकडील आहे आणि माझी आराधना मौन झाली आहे.”

त्या परमेश्वराला उद्देशून लिहित होत्या, “परमेश्वरा, तू माझी प्रार्थना ऐकलीस. तुझ्याजवळ मी जे मागितले ते तू मला दिले आहेस. माझ्यातील ‘मी’ लुप्त झाला आहे; आता फक्त तुझ्याच सेवेस वाहिलेले एक विनीत साधन शिल्लक राहिले आहे. माझे जीवन हाती घेऊन, ते तू तुझेच केले आहेस; माझी इच्छाशक्ती घेऊन, ती तुझ्या इच्छाशक्तीशी जोडली आहेस; माझे प्रेम घेऊन, ते तू तुझ्या प्रेमाशी एकरूप केले आहेस; माझा विचार हाती घेऊन, त्याच्या जागी तुझी चेतना तू भरली आहेस. हा आश्चर्यमग्न देह आपले मस्तक विनम्र करून, मौनयुक्त विनीत भक्तिभावाने, तुझ्या चरणधुलीस स्पर्श करीत आहे. निर्विकार शांतीमध्ये विलसणाऱ्या तुझ्याखेरीज दुसरे काहीही अस्तित्वात उरलेले नाही.”

अशा रीतीने संपूर्णत: समर्पित झालेल्या मीरा यांच्याविषयी अरविंद म्हणतात, “मी आजवर कधीच कोठेही इतके नि:शेष आणि इतके खुले आत्म-समर्पण पाहिलेले नाही.” (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक