‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष पाँडिचेरीला गेल्यानंतर चार वर्षे पूर्णपणे योगसाधनेमध्ये निमग्न होते. ते म्हणतात – ”मला ईश्वरी साहाय्य सातत्याने उपलब्ध होते, तरी खरा मार्ग सापडण्यासाठी मला चार वर्षे आंतरिक धडपड करावी लागली, आणि त्यानंतर सुद्धा मला तो मार्ग योगायोगानेच सापडला असे म्हणावे लागेल. आणि पुढेही खरा मार्ग सापडण्यासाठी त्या परमोच्च आंतरिक मार्गदर्शनानुसार तीव्रतेने केलेली आणखी दहा वर्षाची साधना मला आवश्यक ठरली.”

त्याच सुमारास पॅरिसमधील बॅरिस्टर पॉल रिचर्ड्स निवडणुकीसाठी फ्रान्सवरून पाँडिचेरीस आले होते. भारतातील योगी, ऋषी, मुनी यांना भेटणे हा देखील त्यांच्या भारतभेटीचा एक प्रधान हेतू होता. पॉल यांचा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांतील धर्म व तत्त्वज्ञान यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांना अरविंद घोषांविषयी व त्यांच्या योगाविषयी काही माहिती मिळाली होती. पॉल व अरविंद यांच्यात झालेल्या दोन भेटींमध्ये राजकारणापासून मानवतेच्या भवितव्यापर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या. या भेटीच्या शेवटी निघताना पॉल म्हणाले, “माझी पत्नी माझ्यापेक्षाही अध्यात्मात अधिक प्रगत आहे. पुढच्या वेळी भारतात येईन तेव्हा तिला बरोबर घेऊन येईन.” याच भेटीत अरविंदांना पॉल यांच्या पत्नीबद्दल म्हणजे मीरा अल्फासा (ज्यांना आज श्रीमाताजी म्हणून ओळखले जाते) यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या गूढविद्येच्या अभ्यासाबद्दल माहिती मिळाली.

अरविंद घोष यांच्याशी झालेल्या या भेटीचा पॉल रिचर्ड्स यांच्या मनावर खूप परिणाम झाला. पुढे जपानमध्ये श्रोत्यांसमोर पॉल रिचर्ड्स जे बोलले त्यातून अरविंद यांच्या प्रभावाविषयी काहीएक अंदाज आपल्याला बांधता येतो. ते म्हणतात, “महान गोष्टींची, महान घटनांची, महान व्यक्तींची, आशिया खंडातील दैवी व्यक्तींची सुवर्णघटिका आता आली आहे. आयुष्यभर मी अशा व्यक्तींचा शोध घेत होतो. मला वाटत होते, अशी माणसे या जगात नसतील तर जग नष्ट होईल. कारण अशा व्यक्ती म्हणजे या जगाचा प्रकाश आहे, उर्जा आहे, जीवन आहे. मला आशिया खंडात अशा प्रकारचे महनीय व्यक्तिमत्त्व भेटले आहे, त्यांचे नाव अरविंद घोष आहे.” हा प्रभाव मनात बाळगतच पॉल रिचर्ड्स जपान येथून फ्रान्सला परतले. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक