‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

इ. स. १९०३ मध्ये कामाचा भाग म्हणून अरविंद घोष बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत काश्मीर दौऱ्यावर गेले होते. तेव्हा श्री शंकराचार्य मंदिराच्या टेकडीवर अरविंदांना अद्वैताचा साक्षात्कार झाला. त्यांचा तो अनुभव पुढे कवितारूपाने अभिव्यक्त झाला. तो असा –

जिथे शंकराचार्यांचे छोटेसे मंदिर उभे आहे त्या,
तख्त-ए-सुलेमानच्या राजमार्गावरून मी चालत होतो.
पृथ्वीचा व्यर्थ प्रणय संपुष्टात आणणाऱ्या
एका उघड्यावागड्या कड्यावरून,
काळाच्या कड्यावरून, मी एकाकीपणे
अनंततेला सामोरा जात होतो.

माझ्या सभोवताली निराकार एकांत पसरलेला होता.
अपरिमित उत्तुंग आणि अथांग
विश्व-नग्न अजन्मा एकमेव अशी ‘वास्तविकता’
येथे चिर-स्थिर झाली होती.
सारे काही एक अनोखे ‘अनामिक’ बनले होते.

‘मौन’ हाच त्या ‘सद्वस्तु’चा एकमेव शब्द होता,
आरंभ अज्ञात होता आणि अंत निःशब्द होता.
क्षणिक पाहिलेल्या वा ऐकलेल्या साऱ्या गोष्टींचा निरास करत,
‘निसर्ग’ रहस्यांच्या मूक शिखरावर
एकाकी ‘प्रशांत’ आणि शून्य अविकारी ‘शांती’ची
सत्ता पसरलेली होती.

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, मृणालिनीदेवी यांच्याशी झाला. परदेशगमन करून आलेल्या अरविंदांचे, तत्कालीन प्रथेनुसार शुद्धीकरण करण्याचा प्रसंग समोर उभा ठाकला, प्रागतिक विचारसरणीच्या अरविंदांनी त्याला साफ नकार दिला. कलकत्ता येथे संपन्न झालेल्या या विवाहप्रसंगी सर जगदीशचंद्र बोस सपत्निक उपस्थित होते. अरविंद घोष तेव्हा २९ वर्षांचे होते.

अरविंद हे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात कार्यरत होते. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत.

कालांतराने अरविंदांनी सर्व तऱ्हेच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधून स्वत:ला बाजूला केले आणि ते गुप्तपणाने राजकीय कार्यात इ. स. १९०५ पर्यंत कार्यरत राहिले. परंतु क्रांतिकारक पक्षाचा संभाव्य नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल अशा टिळकांशी त्यांनी संपर्क साधला आणि अहमदाबाद काँग्रेस परिषदेमध्ये (इ. स. १९०२) ते लोकमान्य टिळकांना भेटले. टिळकांनी त्यांना मंडपाच्या बाहेर नेले आणि तेथील मैदानावरच त्यांनी, महाराष्ट्रामध्ये त्यांना अभिप्रेत असलेली कार्यपद्धती कोणती त्याविषयी अरविंदांशी एक तासभर चर्चा केली. असे करत असताना, सुधारणावादी वा उदारमतवादी चळवळीविषयीचा तिरस्कारही टिळकांच्या शब्दांमधून अभिव्यक्त होत राहिला. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०८

इंग्लंडमध्ये असतानाच अरविंद घोष यांनी त्यांचे आयुष्य देशसेवेसाठी आणि त्याच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वाहून घेण्याचे ठरविले होते. भारतात आल्याबरोबर, राष्ट्राला भविष्याबद्दलच्या कल्पनांविषयी जागृत करावे या हेतूने केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी लगेचच दैनिकामधून राजकीय विषयांवर निनावी पद्धतीने लिखाण करायला सुरुवात केली.

भारतात आल्यानंतर अरविंदांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. काही काळातच त्यांनी मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘इंदुप्रकाश’ या वृत्तपत्रामध्ये ‘New lamps for old’ ही लेखमाला चालविली. त्या लेखमालेमधून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. त्यामध्ये तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या विनंती, अर्जविनवण्या आणि विरोध या धोरणावर कडाडून टिका करण्यात आली होती आणि स्वयंसहाय्यतेवर आणि निर्भयतेवर आधारित कृतिशील नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे…

याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी तत्कालीन संपादक श्री. के. जी. देशपांडे यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप अरविंदाना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका न्या. रानडे यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, अरविंदांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०७

बडोद्यामध्ये आल्यानंतरही अरविंद घोषांवर काही काळ पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. मुंबई व कलकत्त्याहून मागविलेल्या पेट्यांमधील पुस्तके ते वाचत असत. अरविंदांना बंगाली शिकविणारे शिक्षक सांगतात, “अरविंद त्यांच्या टेबलाजवळ बसून तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, डासांचे असह्य दंश रात्रभर सोसत, अगदी सकाळ होईपर्यंत वाचत बसत असत. ध्यानावस्थेत मग्न असलेल्या योग्याला जसे आजूबाजूच्या घटनांचे काही भान नसते त्याप्रमाणे, पुस्तकावर डोळे खिळलेल्या अशा स्थितीत तास न् तास बसून त्यांचे वाचन चालत असे. आगीने घर वेढले गेले असते तरीही त्यांची एकाग्रता भंग पावली नसती.”

इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच भाषेतील कादंबऱ्या ते वाचत असत. त्याचबरोबर ते भारतातील धर्मग्रंथांचे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करत असत.

अरविंदांच्या निकटवर्तीयांपैकी एकाने सांगितलेली अजून एक आठवण –

मी अरविंद घोषांची अजून एक गोष्ट पाहिली ती म्हणजे, त्यांना पैशाबद्दल आसक्ती नव्हती. त्यांना एका पिशवीमध्ये तीन महिन्यांचा पगार एकत्रितपणे मिळत असे, तो पगार टेबलावर असलेल्या एका ट्रे मध्ये ते रिकामा करत असत. पैसे कडीकुलुपामध्ये, तिजोरीमध्ये बंदिस्त करून ठेवणे त्यांना मानवत नसे. होणाऱ्या खर्चाचा ते कधीही हिशोब मांडत नसत. एकदा असेच मी सहज त्यांना विचारले की “तुम्ही पैसे असे का ठेवता?” ते हसले आणि म्हणाले, “आपण चांगल्या आणि प्रामाणिक लोकांमध्ये राहत आहोत याची ही खूणच नाही का?’ त्यावर मी त्यांना विचारले, “पण तुमच्या भोवतीच्या या लोकांचा प्रामाणिकपणा पारखण्यासाठी तरी तुम्ही त्या पैशाचा हिशोब कुठे ठेवता?” तेव्हा गंभीर चेहऱ्याने ते म्हणाले, “तो ईश्वरच माझा जमाखर्च सांभाळतो. मला जेवढे आवश्यक आहे तेवढे तो मला देतो आणि उरलेले स्वत:कडेच ठेवतो. तो मला काही कमी पडू देत नाही, मग मी कशाला काळजी करू?” (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०६

अरविंद घोष इ. स. १८९३ ते १९०६ या तेरा वर्षांच्या कालखंडामध्ये बडोदा संस्थानच्या सेवेत होते. सुरुवातीला ते महसूल खात्यात व महाराजांच्या सचिवालयात काम करत असत. नंतर ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि शेवटी बडोदा कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते.

अरविंदांच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल एका विद्यार्थ्याने सांगितलेली एक आठवण –

“इंटरमिजिएटच्या वर्गामध्ये श्री. घोष सरांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. पुस्तकातील आशयाशी विद्यार्थ्यांची ओळख व्हावी म्हणून सुरुवातीला ते त्या विषयासंबंधी प्रास्ताविकपर व्याख्याने देत. आणि नंतर पुस्तक वाचत, मध्येच थांबून जिथे आवश्यक आहे तेथे अवघड शब्दांचे, वाक्यांचे अर्थ सांगून स्पष्टीकरण देत असत. आणि परत शेवटी त्या पुस्तकातील आशयासंबंधी साररूपाने काही व्याख्याने देत असत.

पण वर्गातील या व्याख्यानांपेक्षा, त्यांची व्यासपीठावरील भाषणे ही आम्हासाठी एक पर्वणी असायची. कॉलेजच्या वादविवाद मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते कधीकधी सभांना उपस्थित राहत असत. जेव्हा ते स्वत: भाषण करायचे तेव्हा कॉलेजमधील सेंट्रल हॉल श्रोत्यांनी भरून जात असे. ते भाषणपटू नसले तरी उच्च दर्जाचे वक्ते होते, लोक खूप लक्षपूर्वक त्यांचे भाषण ऐकत असत. विद्यार्थ्यांसमोर सर कोणतेही हावभाव, हालचाली न करता उभे राहत. त्यांच्या वाणीतून शब्द एखाद्या झऱ्याप्रमाणे माधुर्याने, सहजतेने बाहेर पडत असत; लोक त्यांचे भाषण ऐकून मंत्रमुग्ध होत असत… पन्नास वर्ष उलटून गेली तरी आजही माझ्या कानांमध्ये त्यांची ती मंजुळ वाणी रुंजी घालत आहे.” (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०५

(पाँडिचेरीला एकदा श्रीअरविंद स्वत:विषयी, आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी पत्रातून एका साधकाला सांगत आहेत.)

भारतात परतल्यापासूनच, लौकिक किंवा पारलौकिक असा कोणताही भेद माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या योगामध्ये मी कधी केला नाही. मला वाटते, माणसांना ज्या गोष्टींमध्ये रस असतो, त्या साऱ्या गोष्टी बहुधा भौतिकातील असतात. आणि त्यातील बहुतेक गोष्टींचा माझ्या मानसिक क्षेत्रात प्रवेश झाला होता. उदाहरणार्थ, राजकारण. त्याचा तर माझ्या जीवनातच प्रवेश झाला होता. पण त्याच वेळी, मी मुंबईतील अपोलो बंदरावर, या भारताच्या भूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून मला आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली; पण त्या अनुभवांची लौकिक जीवनाशी फारकत नव्हती तर त्यांचा या लौकिक जीवनाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला ‘अनंत’ व्यापून आहे आणि ‘अंतर्यामी’ असणारा ‘तो’ भौतिक वस्तुंमध्ये, देहांमध्ये वास्तव्यास आहे असे मला जाणवत असे. अगदी त्याच वेळी, ज्यांचा प्रभाव व परिणाम या भौतिक जगतावर घडून येतो अशा पातळ्यांवर, अशा पारलौकिक विश्वांमध्ये माझा स्वत:चा प्रवेश झालेला मला दिसत होता. त्यामुळे ‘अस्तित्वाची दोन टोकं आणि त्यामधील सर्व काही’ असे ज्याला मी संबोधतो त्यामध्ये मी कधीच परस्परविसंगत विरोध वा फारकत करू शकलो नाही. माझ्यासाठी सर्व काही ‘ब्रह्म’च होते आणि मला सर्वत्र ‘ईश्वर’च दिसत असे. पण जर कोणाला या लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, असे करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले. हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. वास्तव आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा माझातरी हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुसरण करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०४

इंग्लंडमधील वास्तव्याच्या शेवटच्या वर्षी, अरविंद घोष आध्यात्मिक शोधाकडे वळले. ते प्रोटेस्टंट पंथाच्या धर्मोपदेशकाच्या कुटुंबात राहत असत. ते कधीही ख्रिश्चन बनले नाहीत, मात्र ख्रिस्तीधर्म हा असा एकच धर्म होता आणि बायबल हा असा एकच धर्मग्रंथ होता की ज्याच्याशी त्यांची लहानपणीच ओळख झाली होती; पण ज्या पद्धतीने त्यांची या साऱ्यांशी ओळख झाली त्यामुळे त्याकडे आकर्षित होण्याऐवजी त्यापासून ते अधिक दूरच गेले. त्यांचा काही थोडा काळ नास्तिक विचारांमध्ये गेला, पण लवकरच त्यांनी अज्ञेयवादी दृष्टिकोन स्वीकारला. आय.सी.एस.च्या त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून, अगदी त्रोटकपणे भारतातील ‘षड्दर्शने’ त्यांच्या वाचनात आली. त्यावेळी विशेषत: ‘अद्वैता’मधील ‘आत्म्या’च्या संकल्पनेकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. हे जीवन आणि हे विश्व यापलीकडे असणाऱ्या वास्तवासंबंधी काहीएक धागा येथे मिळू शकेल असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी ‘स्व’ काय आहे, ‘आत्मा’ काय आहे हे जाणून घेण्याचा, ती अमूर्त कल्पना स्वत:च्या जाणिवेमध्ये मूर्त स्वरूपात उतरविण्याचा, खूप तीव्र पण प्राथमिक मानसिक प्रयत्न करून पाहिला; ती सद्वस्तु ही ह्या भौतिक जगाच्या मागे आणि पलीकडे आहे अशा समजुतीने केलेला तो प्रयत्न होता – ती सद्वस्तु स्वत:च्या अंतर्यामी आणि सर्वांमध्ये, विश्वाच्या अंतर्यामी आहे असे तेव्हा त्यांच्या लक्षात आले नव्हते.

डिसेंबर १८९२ च्या सुमारास, बडोदानरेश श्री. सयाजीराव गायकवाड हे लंडनमध्ये होते, तेथे त्यांची अरविंदांशी भेट झाली. अरविंदांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली आणि तेथे रुजू होण्यासाठी अरविंदांनी दि. २ जानेवारी १८९३ रोजी इंग्लंडचा निरोप घेतला. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०३

शिष्यवृत्ती मिळवून अरविंद घोष इ. स. १८९० मध्ये केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले. तेथे त्यांनी दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यांचे वडील त्यांना भारतामधून वर्तमानपत्रे पाठवत असत. इंग्रजांनी भारतीयांना दिलेल्या वाईट वागणुकीची उदाहरणे असलेली कात्रणे खुणा करून ते पाठवून देत आणि भारतातील ब्रिटिश शासन हे कसे निर्दयी व हृदयशून्य शासन आहे असे दोषारोप करणारी पत्रेदेखील ते पाठवत असत. काही खळबळजनक आणि महान क्रांतिकारी बदल घडून येतील असा काळ जगाच्या इतिहासात येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही भूमिका पार पाडावी लागणार आहे अशी स्पष्ट जाणीव अरविंदांना वयाच्या अकराव्या वर्षीच झाली होती. आता त्यांचे लक्ष भारताकडे ओढले गेले आणि त्यांची ती संवेदना मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवाहित झाली. पण हा ‘ठाम निश्चय’ पूर्णत्वाला जाण्यासाठी मात्र पुढची चार वर्षे जावी लागली. ते केंब्रिजला गेले आणि तिथे ‘इंडियन मजलिस’ या संघटनेचे सदस्य आणि काही काळ सचिव झाले. तेव्हा त्यांनी क्रांतिकारक स्वरूपाची भाषणे दिली होती.

लंडनमधील काही भारतीय विद्यार्थ्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली होती, त्या संघटनेचे नाव ‘Lotus and Dagger’ असे होते. त्या संघटनेमध्ये प्रत्येक सदस्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याची आणि त्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काहीतरी विशेष काम पुढे नेण्याची शपथ घेत असे. अरविंदांनी या संघटनेची स्थापना केली नव्हती पण त्यांच्या भावंडांसहित ते या संघटनेचे सदस्य मात्र झाले होते. पण ती संघटना जन्मत:च मृतवत् झाली. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता.

इ. स. १८९० मध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या खुल्या स्पर्धेत अरविंद घोष उत्तीर्ण झाले पण पुढील दोन वर्षांच्या कालावधीत घोडेस्वारीच्या परीक्षेस ते बसले नाहीत आणि त्यामुळे त्या सेवेसाठी ते बाद ठरले.

अरविंद घोष स्वत:च्या विद्यार्थी-जीवनाविषयीची आठवण सांगताना म्हणतात की, ”मी कादंबऱ्या व कविता वाचत असे. मी फक्त परीक्षेच्या आधी काही काळ थोडा अभ्यास करीत असे. कधीही वेळ मिळाला की मी ग्रीक आणि लॅटिन पद्य लिहीत असे. पुढे जेव्हा मी शिष्यवृत्तीसाठी, केंब्रिजला किंग्ज कॉलेजमध्ये गेलो तेव्हा तेथे मि. ऑस्कर ब्राऊनिंग ह्यांनी माझे पेपर्स पाहिले आणि ‘असे इतके चांगले पेपर्स यापूर्वी मी कधीच पाहिले नव्हते’ असा शेरा त्यांनी दिला.” (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०२

इंग्लंड येथे चौदा वर्षे अरविंद घोष यांचे वास्तव्य होते. इ. स. १८८४ मध्ये लंडन येथील सेंट पॉल शाळेमध्ये ते शिकू लागले. अरविंदांनी मँचेस्टर आणि सेंट पॉल येथे असताना अभिजात साहित्य अभ्यासण्याकडे लक्ष पुरविले. अभ्यासाव्यतिरिक्तचा उरलेला सगळा वेळ ते अवांतर वाचन, विशेषत: इंग्लिश काव्य, साहित्य आणि कथाकादंबरी, फ्रेंच साहित्य आणि युरोपातील प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास अशा वाचनात व्यतीत करत असत. काही थोडा वेळ ते इटालियन, जर्मन आणि थोडेफार स्पॅनिश शिकण्यासाठी देत असत. ते बराचसा वेळ काव्यलेखनामध्ये व्यतीत करत असत. शाळेच्या अभ्यासामध्ये त्यांना गती असल्याने, त्यावर फार कष्ट करायला हवेत असे अरविंदांना वाटत नसे, त्यामुळे शालेय अभ्यासासाठी त्यांना फारच थोडा वेळ खर्च करावा लागत असे. किंग्ज कॉलेजमध्ये असताना तर त्यांनी ग्रीक आणि लॅटिन काव्यासाठी असलेली सर्व पारितोषिके पटकाविली होती. त्यांचे ग्रीक, लॅटिन आणि इंग्लिश व फ्रेंच भाषांवर प्रभुत्व होते तसेच जर्मन आणि इटालियन या भाषांसारख्या इतर युरोपीय भाषादेखील त्यांना अवगत होत्या. (क्रमश: …)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०१

अरविंद घोष यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रचंड क्षमता असलेले अरविंद घोष यांचे वडील श्री. कृष्णधन घोष हे, शिक्षणासाठी सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये जाणाऱ्या काही लोकांपैकी एक होते. श्री. कृष्णधन घोष भारतात परतले तेव्हा सवयी, कल्पना आणि आदर्श यांबाबत ते पूर्णपणे इंग्रजाळलेले होते. त्यांच्यावर इंग्रजांचा एवढा प्रभाव पडला होता की, आपल्या मुलांना पूर्णपणे युरोपियन पद्धतीनेच वाढवायचे हा जणू श्री. कृष्णधन घोष यांनी पणच केला होता.

घोष कुटुंबीय भारतात रहात होते तेव्हा अरविंदांना दार्जिलिंगमधील आयरीश ननच्या शाळेत शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. १८७९ साली श्री. कृष्णधन घोष यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना इंग्लंडला नेले आणि तेथे एका इंग्लिश धर्मोपदेशकाकडे व त्याच्या पत्नीकडे त्यांना सोपविले. त्या तिघांवर कोणतेही भारतीय संस्कार होऊ नयेत वा त्यांचा भारतीयांशी कोणताही परिचय होऊ नये अशी खबरदारी त्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना त्या पती-पत्नीला देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. त्यामुळे अरविंद लहान असताना भारत, भारतातील लोक, भारतीयांचा धर्म, भारतीयांची संस्कृती या साऱ्यांविषयी पूर्णपणे अनभिज्ञच राहिले होते. (क्रमश: …)