‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(अरविंद घोष यांनी पत्नी मृणालिनीदेवी यांना लिहिलेले पत्र – दि. ३० ऑगस्ट १९०५)

वेडेपणाच्या वाटतील अशा तीन गोष्टी माझ्या मनात आहेत. त्यापैकी पहिले वेड म्हणजे, माझा असा दृढ विश्वास आहे की जे गुण, जी प्रतिभा, जे उच्च शिक्षण, जी विद्या व जे धन देवाने मला दिले आहे, ते सगळे त्याचे आहे. कुटुंब पोषणासाठी जेवढे लागेल व अत्यंत जरुर असेल, तेवढेच स्वत:साठी खर्चण्याचा मला अधिकार आहे. बाकी उरेल ते सगळे ईश्वराला परत करणे उचित आहे. मी जर सगळे काही माझ्या स्वत:करता, माझ्या सुखाकरता व चैनीखातर खर्च केले तर मी चोर ठरेन.

…ईश्वराला धन अर्पण करणे म्हणजे तरी काय? तर त्याचा अर्थ चांगल्या कामासाठी खर्च करणे. ह्या कठीण काळात सबंध देश माझ्या दाराशी आश्रय मागत आहे. माझे तीस कोटी बहिणभाऊ ह्या देशात आहेत. त्यांच्यातले बरेचसे भुकेने मरत आहेत. त्याहून अधिक लोक दुःख, कष्ट यांनी जर्जर होऊन कसेतरी प्राण धरून आहेत. त्यांनासुद्धा मदत करायला पाहिजे. याबाबतीत, तू माझी सहधर्मिणी होशील का?

माझ्या दुसऱ्या वेडाने मला नुकतेच पछाडले आहे. ते म्हणजे, मला देवाची साक्षात अनुभूती आली पाहिजे. …ईश्वर जर असेल तर त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याचा, त्याचे साक्षात दर्शन घेण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे. मग तो कितीही कठीण असला तरी त्या मार्गाने जाण्याचे मी ठरवून टाकले आहे. हिंदुधर्म सांगतो की तो मार्ग आपल्याच शरीरामध्ये आहे. आपल्याच मनामध्ये आहे. त्या मार्गाने जाण्याचे नियमही धर्माने घालून दिले आहेत. त्या नियमाचे पालन करण्याचा आरंभ मी केला आहे. एका महिन्याच्या अनुभवावरून मला असे दिसून आले आहे की, हिंदुधर्म सांगतो ते काही खोटे नाही. त्याने सांगितलेल्या सगळ्या खाणाखुणा माझ्या अनुभवास आल्या आहेत. आता तुलाही मी त्या मार्गाने घेऊन जाऊ इच्छितो….

माझे तिसरे वेड असे आहे की, काही लोक स्वदेशाला कुरणे, शेते, जंगले, डोंगर, नद्या असलेला एक जड भू-भाग समजतात. पण मी स्वदेशाला माता समजतो, तिची भक्ती करतो, पूजा करतो. आईच्या छातीवर बसून एखादा राक्षस तिचे रक्त पिण्यास उद्युक्त झाला तर तिचा मुलगा काय करेल? आरामात खातपीत बसेल, आपल्या बायकामुलांमध्ये रमेल, की आपल्या आईस सोडविण्यासाठी धावून जाईल?

या पतित राष्ट्राचा उद्धार करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे मी जाणून आहे. पण ते सामर्थ्य म्हणजे शारीरिक बळ नव्हे (तलवार वा बंदुकीने मी युद्ध करणार नाही.) माझे बळ आहे ज्ञानबळ. क्षात्रतेज हेच एक तेज असते असे नाही, तर ब्राह्मतेजही आहे व ते ज्ञानतेजावर अधिष्ठित आहे. ही माझी भावना काही नवीन किंवा आजकालची नाही. ती घेऊनच मी जन्माला आलो आहे. ती माझ्या हाडीमासी भिनलेली आहे. हे महान कार्य करायला देवाने मला पृथ्वीवर पाठविले आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी या भावनेचे बीज माझ्यामध्ये अंकुरित होऊ लागले. वयाच्या अठराव्या वर्षी त्या बीजाची मूळं घट्ट आणि पक्की झाली…

आता मी तुला विचारतो की, तू या बाबतीत काय करणार आहेस? ….एक सोपा उपाय आहे. ईश्वराला शरण जा. ईश्वर-साक्षात्काराच्या मार्गामध्ये प्रवेश कर. देव तुझ्यातील उणिवा भरून काढील. जी व्यक्ती ईश्वराचा आसरा घेते त्या व्यक्तीपासून भीती हळूहळू दूर जाते.

….पत्नी ही पतीची शक्ती असते. याचा अर्थ हा की, पत्नीच्या ठायी पती स्वत:चे प्रतिबिंब पाहतो व स्वत:च्याच उच्च आकांक्षांचा प्रतिध्वनी तिच्यापासून निघालेला ऐकून दुप्पट शक्ती प्राप्त करून घेतो.

अभीप्सा मराठी मासिक