‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०४

इंग्लंडमधील वास्तव्याच्या शेवटच्या वर्षी, अरविंद घोष आध्यात्मिक शोधाकडे वळले. ते प्रोटेस्टंट पंथाच्या धर्मोपदेशकाच्या कुटुंबात राहत असत. ते कधीही ख्रिश्चन बनले नाहीत, मात्र ख्रिस्तीधर्म हा असा एकच धर्म होता आणि बायबल हा असा एकच धर्मग्रंथ होता की ज्याच्याशी त्यांची लहानपणीच ओळख झाली होती; पण ज्या पद्धतीने त्यांची या साऱ्यांशी ओळख झाली त्यामुळे त्याकडे आकर्षित होण्याऐवजी त्यापासून ते अधिक दूरच गेले. त्यांचा काही थोडा काळ नास्तिक विचारांमध्ये गेला, पण लवकरच त्यांनी अज्ञेयवादी दृष्टिकोन स्वीकारला. आय.सी.एस.च्या त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून, अगदी त्रोटकपणे भारतातील ‘षड्दर्शने’ त्यांच्या वाचनात आली. त्यावेळी विशेषत: ‘अद्वैता’मधील ‘आत्म्या’च्या संकल्पनेकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. हे जीवन आणि हे विश्व यापलीकडे असणाऱ्या वास्तवासंबंधी काहीएक धागा येथे मिळू शकेल असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी ‘स्व’ काय आहे, ‘आत्मा’ काय आहे हे जाणून घेण्याचा, ती अमूर्त कल्पना स्वत:च्या जाणिवेमध्ये मूर्त स्वरूपात उतरविण्याचा, खूप तीव्र पण प्राथमिक मानसिक प्रयत्न करून पाहिला; ती सद्वस्तु ही ह्या भौतिक जगाच्या मागे आणि पलीकडे आहे अशा समजुतीने केलेला तो प्रयत्न होता – ती सद्वस्तु स्वत:च्या अंतर्यामी आणि सर्वांमध्ये, विश्वाच्या अंतर्यामी आहे असे तेव्हा त्यांच्या लक्षात आले नव्हते.

डिसेंबर १८९२ च्या सुमारास, बडोदानरेश श्री. सयाजीराव गायकवाड हे लंडनमध्ये होते, तेथे त्यांची अरविंदांशी भेट झाली. अरविंदांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली आणि तेथे रुजू होण्यासाठी अरविंदांनी दि. २ जानेवारी १८९३ रोजी इंग्लंडचा निरोप घेतला. (क्रमश: …)

अभीप्सा मराठी मासिक