‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(शांत ब्रह्माची अनुभूती आल्यानंतर, अरविंद घोष यांना अल्पावधीतच आणखी एका अनुभव आला. त्याविषयी ते सांगत आहेत…)

मी मुंबईमध्ये असताना, मित्राच्या घराच्या बाल्कनीमधून मी तेथील व्यग्र जीवनाच्या हालचाली पाहत होतो, त्या मला चित्रपटातील चित्राप्रमाणे आभासी, छायावत् वाटत होत्या. हा वेदान्ती अनुभव होता. अगदी अडीअडचणींमध्ये असतानासुद्धा कधीच गमावू न देता, मी मनाची ती शांती कायम राखली होती. मुंबई ते कलकत्ता या मार्गावर मी जेवढी भाषणे दिली ती ह्याच स्वरूपाची होती, काही भागांमध्ये मानसिक कार्याचे थोडे मिश्रण झाले होते. निरोप घेण्यापूर्वी मी श्री. लेले यांना म्हटले की, “आता आपण एकत्र राहणार नाही, तेव्हा तुम्ही मला साधनेसंबंधी काही सूचना द्या.” दरम्यानच्या काळात माझ्या अंत:करणात आपोआप प्रकट झालेल्या मंत्राविषयी मी त्यांना सांगितले. सूचना देत असताना ते अचानक मध्येच थांबले आणि त्यांनी मला विचारले की, “ज्याने तुम्हाला हा मंत्र दिला त्या ईश्वरावर तुम्ही पूर्णतया विसंबू शकाल का?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी नेहमीच तसे करतो. तेव्हा श्री. लेले म्हणाले की, “मग तुम्हाला सूचनांची आवश्यकता नाही.’’ आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत मग आमच्यात काहीही संभाषण झाले नाही. काही महिन्यांनंतर ते कलकत्त्याला आले. मी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करतो का असे त्यांनी मला विचारले. मी म्हणालो, “नाही.” तेव्हा त्यांना असे वाटले की, कोणी सैतानाने माझा ताबा घेतला आहे आणि म्हणून त्यांनी मला सूचना द्यायला सुरुवात केली. मी त्यांचा अवमान केला नाही पण त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागलोही नाही. ‘मानवी गुरुची आवश्यकता नाही’ असा आदेश मला अंतरंगातून मिळालेला होता. ध्यानाबाबत सांगावयाचे तर – ‘वास्तविक दिवसभर माझे ध्यानच चालू असते’ हे त्यांना सांगण्याइतपत माझी तयारी झाली नव्हती. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(महाराष्ट्रातील योगगुरूंशी आपली भेट कशी झाली हे अरविंद घोष येथे सांगत आहेत…)

मी सुरत काँग्रेसची परिषद आटोपून जेव्हा बडोद्याला आलो तेव्हा, बारीन्द्रने मला लिहिले की बडोद्यात तो माझी त्याला माहीत असलेल्या एका योग्यांशी गाठ घालून देईल. बारीन्द्रने बडोद्याहून श्री. लेले यांना तार केली आणि ते आले. तेव्हा मी श्री. खासेराव जाधव यांच्या घरी राहत असे. आम्ही सरदार मुजुमदार यांच्या वाड्यात गेलो. तेथे सर्वात वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत आम्ही तीन दिवस खोली बंद करून बसलो होतो. त्यांनी मला सांगितले की, मनात बाहेरून जे विचार येतात ते फेकून द्यावयाचे, दुसरे काहीच करायचे नाही. आणि मला ते तीन दिवसात साध्य झाले. आम्ही एकत्र ध्यानाला बसलो, मला शांत ब्रह्मचेतनेचा (Silent Brahman Consciousness) साक्षात्कार झाला. तेव्हापासून मी मेंदूच्या वर असलेल्या प्रांतात स्थित राहून विचार करू लागलो आणि करत आलो आहे.

कधीकधी रात्रीच्या वेळी ‘ती शक्ती’ अवतरत असे आणि मी ‘ती शक्ती’ आणि तिच्याबरोबर आलले विचारदेखील ग्रहण करत असे आणि सकाळी प्रत्येक गोष्ट मी शब्दन् शब्द उतरवून काढत असे. त्याच शांतीमध्ये, विचाररहित स्थितीमध्ये आम्ही मुंबईला गेलो. नॅशनल युनियन येथे मला एक व्याख्यान द्यावयाचे होते. म्हणून, श्री. लेले यांना ‘मी काय करावे’ असे विचारले. त्यांनी मला प्रार्थना करायला सांगितली. पण मी शांत ब्रह्मामध्ये गढून गेलो होतो. त्यामुळे मी प्रार्थना करण्याच्या मनस्थितीत नाही असे त्यांना सांगितले. तेव्हा, “मी आणि इतर जणं प्रार्थना करू; तुम्ही फक्त त्या सभेला जा आणि श्रोत्यांना सर्वव्यापी ईश्वर, नारायण समजून, त्यांना वाकून नमस्कार करा; तेव्हा एक आवाज तुमच्या माध्यमातून बोलेल,” असे ते म्हणाले. त्यांनी जसे सांगितले अगदी तसेच मी केले. मी त्या सभेला जात असताना वाटेत मला कोणीतरी एक वर्तमानपत्र वाचायला दिले. त्यातील एका शीर्षकाने माझे लक्ष वेधले गेले आणि माझ्या मनावर त्याचा ठसा उमटला. मी जेव्हा बोलायला उभा राहिलो तेव्हा माझ्या मनात कल्पना चमकून गेली आणि एकदम अचानक बोलायला सुरुवात झाली. श्री. लेले यांच्याकडून मिळालेला हा दुसरा अनुभव होता. दुसऱ्यांना योगिक अनुभव देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती हे यावरून लक्षात आले. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष यांना काही आध्यात्मिक अनुभव आलेले होते, पण योग म्हणजे काय? किंवा त्यासंबंधी काहीही माहीत नसताना आलेले ते अनुभव होते. उदाहरणार्थ, दीर्घ काळानंतर परत भारताच्या भूमीवर, मुंबई येथील अपोलो बंदरावर पहिले पाऊल ठेवताना आलेला शांतीच्या अवतरणाचा अनुभव; श्री शंकराचार्यांच्या टेकडीवरून (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगेवरून) फिरत असताना त्यांना झालेला शून्य अनंताचा साक्षात्कार; नर्मदाकाठी चांदोद येथील देवळात, कालीच्या जिवंत उपस्थितीचा आलेला अनुभव; ….पण हे सारे आंतरिक अनुभव आपणहून, अनपेक्षितपणे आले होते; तो साधनेचा भाग नव्हता.

अरविंदांनी स्वत:हून गुरुविना, कोणाच्याशी मार्गदर्शनाविना साधनेला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र हा स्वामी ब्रह्मानंदांचा शिष्य होता, अरविंदांनी त्याच्याकडून काही नियम समजावून घेतले. सुरुवातीला ही साधना प्राणायामाच्या अभ्यासापुरतीच सीमित होती. अरविंदांनी जेव्हा योगसाधनेला सुरुवात केली तेव्हा योगसाधना व राजकारण यामध्ये कोणताही विरोध वा द्वंद्व नव्हते. या दोहोंमध्ये काही विरोध आहे अशी कल्पनाही त्यांच्या मनाला न शिवता त्यांची साधना चालू होती. पण ते गुरुच्या शोधात होते. त्या त्यांच्या शोधाच्या दरम्यान त्यांची एका नागा संन्यासाशी गाठभेट झाली. या नागा संन्याशाने काही मंत्र पुटपुटत, ग्लासमधील पाण्यामध्ये सुरीने छेद देत, जे पाणी अभिमंत्रित केले होते त्या पाण्यामुळे बारीन्द्र घोष यांचा (श्रीअरविंदांचे धाकटे बंधू) गंभीर ताप क्षणार्धात बरा झालेला पाहून योगशक्तीवरचा अरविंद घोष यांचा विश्वास वाढीस लागला तथापि अरविंदांनी त्या नागा संन्याशाला गुरु मानले नाही. स्वामी ब्रह्मानंदांनादेखील अरविंद भेटले आणि त्यांच्यामुळे ते खूप प्रभावितही झाले पण पुढे महाराष्ट्रातील एक योगी श्री. विष्णु भास्कर लेले यांची भेट होईपर्यंत अरविंदांना गुरु म्हणून किंवा साहाय्यक म्हणून कोणीही भेटले नव्हते. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

इ. स. १९०७ मध्ये राजद्रोहाचे संशयित म्हणून अरविंद घोष यांच्यावर कारवाई करण्यात आली पण पुढे त्यांची निर्दोष सुटकादेखील झाली. आत्तापर्यंत ते केवळ एक संघटक किंवा लेखक म्हणूनच राहिले होते, परंतु या घटनेमुळे म्हणा किंवा त्यांच्या तुरुंगवासामुळे म्हणा वा इतर नेते लुप्त झाल्यामुळे म्हणा, अरविंदांना बंगालमधील पक्षाचे अधिकृत प्रमुख म्हणून पुढे येणेच भाग पडले आणि तेव्हा प्रथमच ते व्यासपीठावरून जाहीररित्या वक्ते म्हणून बोलले. इ. स. १९०७ मध्ये ज्या सुरत काँग्रेस परिषदेमध्ये दोन तुल्यबळ मतप्रवाहांमध्ये तीव्र मतभेद होऊन काँग्रेसची दोन छकले झाली; त्या सुरत काँग्रेस परिषदेचे अध्यक्षस्थान अरविंदांनी भूषविले होते. लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला होता आणि परिणामतः काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली होती.

अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी ‘A GREAT MIND, A GREAT WILL’ या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता.

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. के. ब. हेडगेवार आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. बा. शि. मुंजे हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हटले, ”मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

ब्रिटिश शासनाची अरविंद घोष यांच्यावर कायमच वक्र दृष्टी राहिली. त्यांच्याबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये ‘भारतातील सर्वात भयानक माणूस म्हणजे अरविंद घोष’ अशी चर्चा असे. ‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये अरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. अरविंदांच्या नावाने अटक वॉरंट निघाले. या घटनेने आजवर गुप्तपणे कार्यरत असलेले अरविंद एका रात्रीत नेते म्हणून प्रसिद्धीस आले. तेव्हा भारतभरातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. ‘मराठा’ वृत्तपत्रात लोकमान्य टिळकांनी लिहिले, “कोणी सांगावे जे कृत्य आज राजद्रोह म्हणून गणले जात आहे ते उद्या दैवी सत्य म्हणून गणले जाईल.”

दि. ०८ सप्टेंबर १९०७ च्या अंकात गुरूदेव रवीन्द्रनाथ टागोरांनी अरविंदांना अभिवादन करणारी कविता बंगालीतून लिहिली. ‘Salutation’ या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.

अरविंद यांना जेव्हा अटक झाली तेव्हा देशबंधू चित्तरंजन दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना त्यांनी अरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, “हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झालेली असतील, भविष्यात जेव्हाकेव्हा अरविंद या जगाचा निरोप घेतील तेव्हा ते ‘देशभक्त कवी’, ‘राष्ट्रवादाचे प्रणेते’ आणि ‘मानवतेचे प्रेमी’ म्हणून ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.” आणि कालौघात आज हे शब्द अक्षरश: खरे ठरत आहेत. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने इ. स. १९०२ ते इ. स. १९१० या कालावधीत सामावलेली आहे. मवाळ सुधारणावाद हा त्याकाळातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा धर्म होता पण त्यापेक्षाही अधिक थेटपणे भिडून, राजकीय चळवळ लोकांमध्ये पुढे नेण्यासाठीची एक संधी बंगालमधील जनक्षोभामुळे त्यांना मिळाली. परंतु तोपर्यंत सुरुवातीचा जवळपास निम्मा कालावधी ते पडद्यामागे राहून, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वदेशी चळवळीच्या (भारतातील सिन-फेन चळवळ) प्रारंभाची पूर्वतयारी करण्याचे कार्य करत होते. इ. स. १९०६ मध्ये अरविंद बंगालमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘नवा पक्ष’ या एका अधिक प्रगत, पण संख्येने मर्यादित आणि तोपर्यंत फारशा प्रभावशाली नसलेल्या पक्षामध्ये सहभागी झाले. या पक्षाचा राजकीय सिद्धान्त म्हणायचा झाला तर तो काहीसा ‘असहकाराचा सिद्धान्त’ म्हणता येईल; पण प्रत्यक्षात ‘सब्जेक्ट्स कमिटी’च्या गुप्त पडद्याआडून वार्षिक सभेमध्ये झालेल्या काही किरकोळ चकमकी यांपेक्षा तेव्हा त्याला काही निराळे असे रूप नव्हते. आपण आता, महाराष्ट्रातील नेते लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली, अखिल भारतीय पक्ष म्हणून एक निश्चित आणि आव्हानात्मक कार्यक्रम घेऊन, जाहीररित्या लोकांसमोर यायला हवे, आणि तेव्हा प्रभावी असलेल्या, मवाळ राज्यधुरंधरांच्या अल्पतंत्राच्या, हातून काँग्रेस व देश हाती घ्यावा यासाठी अरविंदांनी आपल्या प्रमुखांचे मन राजी केले. मवाळ आणि राष्ट्रवादी (ज्याला विरोधक ‘जहाल मतवादी’ असे म्हणत) यांच्यातील ऐतिहासिक संघर्षाची बीजे प्रथम येथे पेरली गेली होती; त्या संघर्षाने केवळ दोन वर्षात भारतीय राजकारणाचा चेहरामोहराच बदलून गेला. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

बिपिनचंद्र पाल हे त्याकाळी त्यांच्या ‘न्यू इंडिया’ या साप्ताहिकामधून स्वयंसाहाय्यता आणि असहकार धोरणाचा प्रचार प्रसार करत असत, त्यांनी आता ‘वंदे मातरम्’ नावाचे दैनिक काढले, पण अर्थातच हे साहस अल्पकालीनच ठरणार होते कारण स्वत:च्या खिशातल्या ५०० रू. च्या आधारे त्यांनी हे साहस आरंभले होते आणि भविष्यामध्येही आर्थिक साहाय्य मिळण्याची कोणतीही शाश्वती नव्हती. आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती त्यांनी अरविंद घोष यांना केली आणि त्यांनीही त्याला तात्काळ संमती दिली कारण आपल्या क्रांतिकारक हेतुंचा सार्वजनिकरित्या प्रचार प्रसार करण्यास आरंभ करण्याची हीच संधी आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काँग्रेसमधील पुरोगामी विचारसणीच्या युवकांच्या समूहाची एक बैठक बोलाविली आणि त्या सर्वांनी एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करून, उघडपणे समोर यायचे असे ठरविले. त्यासाठी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या, महाराष्ट्रातील समानधर्मा गटाबरोबर हातमिळवणी करायची आणि कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये आधीच नामोहरम झालेल्या मवाळ पक्षाशी दोन हात करायचे असे त्यांनी ठरविले. नव्याने स्थापन झालेल्या या पक्षाचे प्रयोजन आणि कृतिकार्यक्रम यांचा प्रचार करण्यासाठी बिपिनचंद्र पाल गावोगावी जात असत तेव्हा, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अरविंदांचे मार्गदर्शन या दैनिकाला लाभत असे. अल्पावधीतच हा नवा पक्ष एकदम यशस्वी झाला आणि ‘वंदे मातरम्’ हे वृत्तपत्र भारतभर वितरित होऊ लागले. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

बडोदा संस्थानामध्ये असलेल्या अरविंद घोष यांच्या विशेष हुद्द्यामुळे त्यांना जाहीररित्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणे शक्य नव्हते त्यामुळे, शेवटचा काही काळ ते सुट्टीवर राहून, पडद्याआडून राजकीय हालचालींमध्ये सक्रिय राहिले. इ. स. १९०५ साली मात्र वंगभंगामुळे उसळलेल्या जनक्षोभ आंदोलनामुळे त्यांना बडोदा येथील सेवेतून मुक्त होण्याची संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. याच वर्षी बंगालची फाळणी झाली आणि त्यानंतर जी एक बंडाची धुमाळी उडाली त्यामध्ये, जहाल पक्षाच्या उदयाला आणि महान राष्ट्रीय चळवळीला चालना मिळाली. तेव्हा अरविंद घोषांचे सर्व कृतिकार्यक्रम अधिकाधिकपणे त्या दिशेने वळू लागले.

बारीन्द्र यांच्या (अरविंदांचे धाकटे बंधू) सूचनेनुसार, अरविंदांनी ‘युगांतर’ नावाचे एक वृत्तपत्र प्रकाशित करावयास संमती दिली; ह्या वृत्तपत्रातून ब्रिटिश सत्तेचा पूर्ण निषेध आणि उघड विद्रोह याची शिकवण दिली जात असे. त्या वृत्तपत्रामध्ये ‘गनिमी कावा’ या युद्धपद्धतीविषयी पद्धतशीर प्रशिक्षण देणारी लेखमालिका चालविली जात होती. या वृत्तपत्राच्या प्रारंभिक अंकांमधून अरविंदांनी स्वत: सुरुवातीचे काही लेख लिहिले होते आणि कायमच त्या वृत्तपत्रावर त्यांचे सर्वसाधारणपणे नियंत्रण असे. स्वत: सादर केलेल्या प्रस्तावासाठी, संपादकीय विभागातील एक सदस्य, स्वामी विवेकानंदांचे बंधू, वृत्तपत्राच्या मुख्य संपादकांच्या शोधात आलेल्या पोलिसांना आपणहून शरण गेले होते आणि जेव्हा त्यांच्यावर खटला चालविण्यात आला होता तेव्हा, अरविंदांच्या आदेशानुसार ‘युगांतर’ने, ‘आम्ही विदेशी शासन ओळखत नाही’ या कारणास्तव, ब्रिटिश न्यायासनासमोर स्वत:ची बाजू मांडण्यास नकार दिला होता. आणि त्यामुळे या वृत्तपत्राची प्रतिष्ठा आणि प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढीस लागला. बंगालमधील तीन युवा लेखक या वृत्तपत्राचे मुख्य लेखक व संचालक होते; एकाएकी या वृत्तपत्राचा बंगाल प्रांतामध्ये प्रभाव वाढला. इ. स. १९०६ मध्ये अरविंद घोष यांनी बडोदा सोडले आणि नव्याने स्थापन झालेल्या ‘बंगाल नॅशनल कॉलेज’च्या प्राचार्यपदी रूजू होण्यासाठी ते कलकत्त्याला गेले.

बंगाल नॅशनल कॉलेजच्या स्थापनेमुळे अरविंदांना आवश्यक असलेली संधी चालून आली आणि त्यामुळे बडोदा संस्थानमधील नोकरीचा राजीनामा देऊन ते या नवीन कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू होऊ शकले. अरविंदांच्या गुप्त कार्यामधील त्यांचे सहकारी आणि नंतरच्या काळातदेखील काँग्रेसप्रणीत राजकारणामध्ये त्यांचे सहकारी असणारे श्री. सुबोध मलिक; यांनी या कॉलेजच्या स्थापनेसाठी एक लाख रूपये देऊ केले आणि अरविंदांना या कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर दरमहा १५० रू. पगारावर नेमण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; अशा प्रकारे देशकार्याच्या सेवेमध्ये पूर्ण वेळ देण्यासाठी अरविंद घोष आता पूर्णपणे मोकळे झाले. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(अरविंद घोष यांनी पत्नी मृणालिनीदेवी यांना लिहिलेले पत्र – दि. ३० ऑगस्ट १९०५)

वेडेपणाच्या वाटतील अशा तीन गोष्टी माझ्या मनात आहेत. त्यापैकी पहिले वेड म्हणजे, माझा असा दृढ विश्वास आहे की जे गुण, जी प्रतिभा, जे उच्च शिक्षण, जी विद्या व जे धन देवाने मला दिले आहे, ते सगळे त्याचे आहे. कुटुंब पोषणासाठी जेवढे लागेल व अत्यंत जरुर असेल, तेवढेच स्वत:साठी खर्चण्याचा मला अधिकार आहे. बाकी उरेल ते सगळे ईश्वराला परत करणे उचित आहे. मी जर सगळे काही माझ्या स्वत:करता, माझ्या सुखाकरता व चैनीखातर खर्च केले तर मी चोर ठरेन.

…ईश्वराला धन अर्पण करणे म्हणजे तरी काय? तर त्याचा अर्थ चांगल्या कामासाठी खर्च करणे. ह्या कठीण काळात सबंध देश माझ्या दाराशी आश्रय मागत आहे. माझे तीस कोटी बहिणभाऊ ह्या देशात आहेत. त्यांच्यातले बरेचसे भुकेने मरत आहेत. त्याहून अधिक लोक दुःख, कष्ट यांनी जर्जर होऊन कसेतरी प्राण धरून आहेत. त्यांनासुद्धा मदत करायला पाहिजे. याबाबतीत, तू माझी सहधर्मिणी होशील का?

माझ्या दुसऱ्या वेडाने मला नुकतेच पछाडले आहे. ते म्हणजे, मला देवाची साक्षात अनुभूती आली पाहिजे. …ईश्वर जर असेल तर त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याचा, त्याचे साक्षात दर्शन घेण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे. मग तो कितीही कठीण असला तरी त्या मार्गाने जाण्याचे मी ठरवून टाकले आहे. हिंदुधर्म सांगतो की तो मार्ग आपल्याच शरीरामध्ये आहे. आपल्याच मनामध्ये आहे. त्या मार्गाने जाण्याचे नियमही धर्माने घालून दिले आहेत. त्या नियमाचे पालन करण्याचा आरंभ मी केला आहे. एका महिन्याच्या अनुभवावरून मला असे दिसून आले आहे की, हिंदुधर्म सांगतो ते काही खोटे नाही. त्याने सांगितलेल्या सगळ्या खाणाखुणा माझ्या अनुभवास आल्या आहेत. आता तुलाही मी त्या मार्गाने घेऊन जाऊ इच्छितो….

माझे तिसरे वेड असे आहे की, काही लोक स्वदेशाला कुरणे, शेते, जंगले, डोंगर, नद्या असलेला एक जड भू-भाग समजतात. पण मी स्वदेशाला माता समजतो, तिची भक्ती करतो, पूजा करतो. आईच्या छातीवर बसून एखादा राक्षस तिचे रक्त पिण्यास उद्युक्त झाला तर तिचा मुलगा काय करेल? आरामात खातपीत बसेल, आपल्या बायकामुलांमध्ये रमेल, की आपल्या आईस सोडविण्यासाठी धावून जाईल?

या पतित राष्ट्राचा उद्धार करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे मी जाणून आहे. पण ते सामर्थ्य म्हणजे शारीरिक बळ नव्हे (तलवार वा बंदुकीने मी युद्ध करणार नाही.) माझे बळ आहे ज्ञानबळ. क्षात्रतेज हेच एक तेज असते असे नाही, तर ब्राह्मतेजही आहे व ते ज्ञानतेजावर अधिष्ठित आहे. ही माझी भावना काही नवीन किंवा आजकालची नाही. ती घेऊनच मी जन्माला आलो आहे. ती माझ्या हाडीमासी भिनलेली आहे. हे महान कार्य करायला देवाने मला पृथ्वीवर पाठविले आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी या भावनेचे बीज माझ्यामध्ये अंकुरित होऊ लागले. वयाच्या अठराव्या वर्षी त्या बीजाची मूळं घट्ट आणि पक्की झाली…

आता मी तुला विचारतो की, तू या बाबतीत काय करणार आहेस? ….एक सोपा उपाय आहे. ईश्वराला शरण जा. ईश्वर-साक्षात्काराच्या मार्गामध्ये प्रवेश कर. देव तुझ्यातील उणिवा भरून काढील. जी व्यक्ती ईश्वराचा आसरा घेते त्या व्यक्तीपासून भीती हळूहळू दूर जाते.

….पत्नी ही पतीची शक्ती असते. याचा अर्थ हा की, पत्नीच्या ठायी पती स्वत:चे प्रतिबिंब पाहतो व स्वत:च्याच उच्च आकांक्षांचा प्रतिध्वनी तिच्यापासून निघालेला ऐकून दुप्पट शक्ती प्राप्त करून घेतो.

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(बडोद्यात राहत असताना आपल्याला आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी व त्यांनी केलेल्या साधनेविषयी उत्तरायुष्यात एके ठिकाणी श्रीअरविंद सांगत आहेत…)

मी बडोद्यात राहत असताना, दिवसभरात सकाळी तीन तास आणि संध्याकाळी दोन तास असा साधारणपणे पाच तास प्राणायामाचा अभ्यास करीत असे. माझे मन महान अशा प्रकाश आणि शक्तीने कार्य करू लागले आहे असे मला आढळून आले. त्या काळात मी काव्यलेखन करीत असे. प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी, मी दिवसाकाठी साधारणपणे पाच ते आठ ओळी, म्हणजे महिन्याभरात साधारण दोनशे ओळी लिहित असे; प्राणायामाच्या अभ्यासानंतर मात्र मी अर्ध्या तासात दोनशे ओळी लिहू शकत असे. केवळ हा एकच परिणाम झाला असे नाही. आधी माझी स्मरणशक्ती कमी होती. पण या अभ्यासानंतर मला असे आढळून आले की, जेव्हा मला स्फूर्ती येत असे तेव्हा मला सर्व ओळी क्रमाने आठवत असत आणि मी त्या कधीही क्रमाने लिहून काढू शकत असे. या प्रगत अशा कार्यांबरोबरच मी माझ्या मेंदूच्या सभोवार चालणाऱ्या विद्युतप्रभावित हालचाली पाहू शकत असे, आणि त्या सर्व गोष्टी सूक्ष्म द्रव्याने बनलेल्या आहेत व हे सर्व सूक्ष्म द्रव्याचेच कार्य आहे हे मला जाणवत असे.

याच काळात अरविंदांचा भारतीय संस्कृती, साहित्य यांचा अभ्यास सुरु होता, त्या काळात ते प्रचंड वाचन करत असत. त्यासंबंधीची एक हकिकत त्यांच्या एका मित्राने सांगितली आहे – “एकदा अरविंद कॉलेजमधून परतले आणि आल्या आल्या लगेच तेथे पडलेले एक पुस्तक उघडून त्यांनी ते वाचायला सुरुवात केली. तेव्हा तेथे आम्ही सर्व मित्र बुद्धिबळाचा डाव मांडून जोरजोराने हसतखिदळत बसलो होतो. सुमारे अर्ध्या तासाने अरविंदांनी पुस्तक वाचून संपविले. आम्ही त्यांना असे करताना बरेचदा बघितले होते. ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात की केवळ वरवर चाळतात हे आम्हाला बरेच दिवसांपासून जाणून घ्यायचे होते. आता ती कसोटी घेण्याची वेळ आली. आमच्यातील एकाने पुस्तकातील एक ओळ वाचून दाखविली आणि नंतर त्यापुढची ओळ कोणती असे अरविंदांना विचारले. त्यांनी क्षणभर मन एकाग्र केले आणि नंतर ती ओळ ज्या पानावर होती त्या पानावरील संपूर्ण मजकूर, एकही चूक न करता जसाच्या तसा म्हणून दाखविला. जर ते अशा प्रकारे अर्ध्या तासात शंभरेक पाने वाचू शकत असतील तर त्यांनी अल्पावधीतच त्या पेटाऱ्यातील सगळी पुस्तके वाचून संपवली यात नवल ते काय?”