साधनेची मुळाक्षरे – २६
प्रश्न : ध्यानाची उद्दिष्टे काय असायला हवीत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?
श्रीअरविंद : जी तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असतील ती! परंतु जर का तुम्ही मला निरपवाद उत्तर विचारत असाल, तर मला असे म्हटले पाहिजे की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनांवर मनाने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो ‘देव’ ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘एकमेव आत्मा’ आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, त्या सर्व सत्यांचा समावेश होतो.
– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)
- आध्यात्मिकतेचा गाभा - November 28, 2023
- धार्मिकता, चमत्कार आणि आध्यात्मिकता - November 27, 2023
- मानवतेची सेवा आणि आध्यात्मिकता - November 26, 2023