साधनेची मुळाक्षरे – ०८
आपल्यामधील चैत्य घटक (psychic part) हा असा भाग असतो की, जो थेट ‘ईश्वरा’कडून आलेला असतो आणि ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन, प्राण व शरीर या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते; ते प्रथमत: विकसित झालेले नसते… मन, प्राण व शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढ्यामध्येच आणि, त्यांच्या माध्यमातूनच व त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते. ‘ईश्वरानुगामी’ अनुभूतींच्या योगे, या तत्त्वाची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा उच्चतर अशी क्रिया घडते त्या प्रत्येक वेळी या तत्त्वाला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) असे संबोधतो. माणूस आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच त्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारण अनभिज्ञच राहते. आणि म्हणूनच आपल्याला ‘पूर्णयोगा’मध्ये त्या चैत्यपुरुषाला अग्रभागी आणावे लागते.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103)
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024
- अतिमानसाची आवश्यकता - September 7, 2024
- अनुभूती आणि साक्षात्कार - September 3, 2024