साधनेची मुळाक्षरे – ०७
शुद्ध आत्मा (The pure self) हा अजन्मा असतो, तो जन्म वा मृत्युमधून प्रवास करीत नाही, तो जनननिरपेक्ष असतो किंवा तो देह, प्राण वा मन यांपासून वा या आविष्कृत झालेल्या प्रकृतीपासूनदेखील स्वतंत्र असतो. त्या सर्व गोष्टींचा तो अंगीकार करीत असला आणि त्यांना आधार देत असला तरीसुद्धा तो त्या गोष्टींनी बांधला गेलेला नसतो, सीमित झालेला नसतो, प्रभावित झालेला नसतो. याउलट, चैत्य पुरुष (Psychic being) मात्र, जन्माबरोबर खाली अवतरतो आणि मृत्युद्वारे निघून जातो – (तो स्वत: मृत्यू पावत नाही कारण तो अमर्त्य असतो.) तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, भूलोकावरून इतर लोकांमध्ये आणि परत पुन्हा या पृथ्वीवरील जीवनात प्रवास करत असतो. जन्मजन्मांतरी उत्क्रांतीच्या माध्यमातून त्याची मनुष्यदशेकडे वाटचाल होत राहते… हा चैत्य पुरुष उत्क्रांतीला आधार देतो आणि विश्वानुभव घेण्यासाठीची साधने म्हणून शारीरिक, प्राणिक व मानसिक अशी मानवी चेतना विकसित करतो. ही साधने प्रच्छन्न (disguised), अपूर्ण पण चढतीवाढती आत्मअभिव्यक्ती करणारी असतात. हे सारे तो पडद्यामागे राहून करत असतो, आणि साधनभूत अस्तित्वाच्या अपूर्णतेमुळे जितपत शक्य आहे तेवढेच स्वत:मधील दिव्यत्व दाखवून देतो. पण एक वेळ अशी येते, जेव्हा तो चैत्य पुरुष या पडद्यामागून बाहेर येण्यास, साधनभूत प्रकृतीचा ताबा घेऊन तिला दिव्य पूर्णत्वाकडे वळविण्यासाठी सिद्ध होतो; खऱ्या अध्यात्मजीवनाची ही सुरुवात असते. असा चैत्य पुरुष मग आता मानसिक मानवी पातळीवरून आविष्कृत तयार होतो; तो आता मानसिक चेतनेकडून आध्यात्मिक चेतनेकडे आणि आध्यात्मिकतेच्या विविध पातळ्यांमधून हळूहळू अतिमानसिक अवस्थेकडे वाटचाल करू लागतो.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 536-537)
- साधना, योग आणि रूपांतरण – १०६ - September 18, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १०५ - September 17, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १०४ - September 16, 2024