साधनेची मुळाक्षरे – ०४
(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
तुम्हाला तुमच्या कर्मव्यवहारामध्ये सदा सर्वकाळ जरी अजून ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका, त्याने फारसा फरक पडत नाही. कोणतेही कर्म करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे व ते कर्म त्याला अर्पण करणे आणि कर्म संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे हे सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा जर कामाच्या मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही त्याचे स्मरण ठेवणे पुरेसे आहे. तुमची पद्धत मात्र मला काहीशी वेदनादायी आणि अवघड असल्याचे दिसते, – कारण तुम्ही मनाच्या ज्या भागाने कर्म करता, त्याच भागाने, त्याचवेळी स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करता असे दिसते. तसे करणे शक्य आहे किंवा नाही, याची मला कल्पना नाही. जेव्हा लोक कर्म करताना सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते त्यांच्या मनाच्या पार्श्वभागी असते किंवा त्यांच्यामध्ये हळूहळू दुहेरी विचारांची किंवा दुहेरी चेतनेची एक क्षमता निर्माण झालेली असते – एक चेतना पृष्ठभागी कार्यरत असते आणि दुसरी चेतना ही साक्षी असते आणि स्मरण राखत असते.
आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग होता – अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआपपणे घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्या सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही. अभीप्सा आणि कर्म करण्यासाठी महत्तर शक्तीला आवाहन करत, आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की ज्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही जणांना या गोष्टीसाठी जरी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयासांनीच करण्यापेक्षा, पाठीशी असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या शक्तीद्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे, हे साधनेचे महान रहस्य आहे.
मानसिक प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही – एवढेच की साऱ्या गोष्टी एखाद्याने स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला तर अध्यात्मात पारंगत असणाऱ्या व्यक्तींखेरीज (spiritual athletes) इतरांसाठी मात्र त्या गोष्टी कष्टदायक प्रयत्न ठरतात. अन्य पद्धत ही जवळच्या मार्गाचा हव्यास बाळगणारी आहे, असेही मला म्हणायचे नाही. एवढेच की, मी म्हणालो त्याप्रमाणे, त्या पद्धतीचे परिणाम दिसण्यास अधिक वेळ लागतो. धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्ये आवश्यक असतात. बालावानांसाठी सामर्थ्य असणे ठीक आहे पण – अभीप्सा आणि तिला ईश्वरी ‘कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे काही सर्वस्वी आख्यायिका आहेत, असे नाही; या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 214-215)
- अतिमानसिक साक्षात्कार - September 10, 2024
- शून्यावस्था आणि अतिमानस - September 9, 2024
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024