साधनेची मुळाक्षरे – ०३
दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत : हृदय-चक्राने (heart centre) त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी (mind centres) त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे. हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते. ईश्वराने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिलीवहिली उन्मुखता (opening) घडून येते. ‘साधने’च्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे ‘अभीप्सा’, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण ह्या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते. सुरुवातीला मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, जाणिवेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. ईश्वरी शांती, (आधी केवळ ‘शांती’, किंवा ‘शांती व सामर्थ्य’ एकत्रितपणे) ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केल्याने, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने ही दुसरी उन्मुखता घडून येते.
– श्रीअरविंद
(CWSA 32 : 204-205)
- शून्यावस्था आणि अतिमानस - September 9, 2024
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024
- अतिमानसाची आवश्यकता - September 7, 2024