साधनेची मुळाक्षरे – ०२

मनुष्य हा बहुतांशी त्याच्या पृष्ठवर्ती (surface) मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्या पातळीवर जीवन जगत असतो पण त्याच्या अंतरंगामध्ये महत्तर शक्यता सामावलेला एक आंतरिक पुरुष असतो, त्या पुरुषाविषयी मनुष्याने जागे झाले पाहिजे; कारण आज त्याला या पुरुषाकडून अगदी मर्यादित, थोडासाच प्रभाव प्राप्त होत असतो आणि तो प्रभावच त्याला महान सौंदर्य, सुसंवाद, शक्ती आणि ज्ञान यांच्या नित्य शोधासाठी प्रवृत्त करत असतो. त्यामुळे, या आंतरिक पुरुषाच्या श्रेणींप्रत खुले होणे आणि तेथून बाह्य जीवन जगणे, तसेच या आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने बाह्यवर्ती जीवनाचे शासन करणे, ही योगाची पहिली प्रक्रिया असते. हे करत असताना त्याला स्वतःमध्येच त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो; तो आत्मा म्हणजे त्याच्या मन, प्राण आणि शारीरिक घटकांचे बाह्यवर्ती मिश्रण नसते तर, त्या सर्वांच्या पाठीशी असणारी ती सद्वस्तू (Reality) असते, ‘दिव्य अग्नी’ची ती ठिणगी असते. मनुष्याने स्वतःच्या आत्म्यामध्ये जगण्यास, शुद्धिकरण करण्यास तसेच उर्वरित प्रकृती ‘सत्या’भिमुख करण्यास शिकले पाहिजे. त्यानंतर, त्यापाठोपाठ ऊर्ध्वमुखी खुलेपण (opening) येईल आणि अस्तित्वामध्ये उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548)

श्रीअरविंद