(पौर्वात्य देशांचा पाश्चिमात्य आणि पाश्चिमात्य देशांचा पौर्वात्य देशांवर प्रभाव पडत आहे, आणि या साऱ्या घडामोडींच्या माध्यमातून नवीनच काही आकाराला येऊ घातले आहे, ‘प्रकृती’ हे सारे काही घडवून आणत आहे, या विषयी श्रीमाताजी पुढे सांगतात -)

‘प्रकृती’चे मार्ग संथ, अंधकारमय आणि जटिल असतात. आत्म्याच्या माध्यमातून जी गोष्ट अगदी त्वरेने, सुकरतेने आणि काहीही व्यर्थ जाऊ न देता झाली असती, तीच गोष्ट करण्यास ‘प्रकृती’ला मात्र खूप दीर्घ कालावधी लागतो. सध्या या जगामध्ये प्रचंड अपव्यय होताना दिसतो. परंतु या गोष्टी अशाच घडत आहेत. लोकांना परस्परांमध्ये मिसळविण्याचे ‘प्रकृती’चे तिचे तिचे स्वतःचे असे काही मार्ग आहेत.

साधक : हे सारे हेतुपूर्वक केले जात आहे का?

श्रीमाताजी : माणसं ज्याला ‘हेतुपूर्वक’ असे समजतात, तशा तऱ्हेने नाही. परंतु त्या पाठीमागे निश्चितपणे काही ‘प्रयोजन’ आहे, एक ‘उद्दिष्ट’ आहे की ज्या दिशेने ही वाटचाल चालू आहे. इतकेच, की सारे काही चेतनेच्या प्रमाणावर अवलंबून असते. एखाद्या माणसाला हे सारे काही गोंधळाचे वाटू शकते, कारण तो फक्त तपशीलाचा भाग पाहू शकतो, आणि मग त्याला तो काळाचा प्रचंड अपव्यय आहे असे वाटते, कारण त्याची काळाची संकल्पना ही त्याच्या स्वतःच्या व्यक्ती म्हणून असलेल्या कालावधीइतकीच मर्यादित असते.

परंतु ‘प्रकृती’ समोर मात्र शाश्वतता पसरलेली असते. आणि तिच्या दृष्टीने हे वाया घालविणे नसते, कारण ती म्हणजे जणू काही अशा एखाद्या व्यक्तीसारखी आहे की, जिच्यापाशी एक भली मोठी कढई आहे, त्यामध्ये ती साऱ्या गोष्टी ओतत असते, त्याचे मिश्रण बनवीत असते आणि जर ते मिश्रण यशस्वी झाले नाही तर ती ते सारे मिश्रण बाहेर काढून टाकते कारण तिला हे माहीत असते की, त्याच गोष्टींचा वापर करून ती पुन्हा एक नवीन मिश्रण तयार करणार आहे. असे असते हे सारे. येथे काहीही व्यर्थ जात नाही, कारण ते पुन्हा केव्हातरी उपयोगात येणार असते. आकार नष्ट होतात आणि त्यातील द्रव्य पुन्हा हाती घेतले जाते आणि हे सारे असेच सातत्याने चालू राहते. काही घडविले जाते, काही बिघडविले जाते, होत्याचे नव्हते केले जाते – ‘प्रकृती’ला वाटले तर ती हे सारे शेकडो, हजारो वेळा करू शकते, त्याचे तिला काहीच वाटत नाही. कारण यामध्ये काहीच वाया जात नाही, कारण ते सारे तिचेच कार्य असते. कार्य हेच तिचे सुख असते, कार्याशिवाय ती अस्तित्वातच राहू शकली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 342-343)

श्रीमाताजी