साधनेची मुळाक्षरे – ३०

श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील मजकूर –

‘योगसाधने’मध्ये प्रार्थना किंवा ध्यान या दोन्हीचे खूप महत्त्व असते, अगदी खोल अंत:करणातून उदित झालेली प्रार्थना ही भावनांच्या किंवा अभीप्सेच्या शीर्षस्थानी असायला हवी; ईश्वरविषयक आनंद किंवा प्रकाश यांच्या समवेत आतून जिवंतपणे उमलून येणारी बाब म्हणून ‘जप’ किंवा ध्यान व्हायला हवे. जर ह्या गोष्टी केवळ यांत्रिकपणे केल्या आणि केवळ कर्तव्य म्हणून केल्या तर त्या रूक्षपणा आणि निरसता यांच्याकडे झुकतात आणि त्यामुळे त्या प्रभावहीन ठरण्याची शक्यता असते.

तुम्ही अमुक एखादा परिणाम घडून येण्यासाठी, एक साधन म्हणून जरुरीपेक्षा जरा जास्तच प्रमाणात ‘जप’ करत आहात असे मला वाटते, असे जेव्हा मी म्हणालो, तेव्हा मला असे म्हणावयाचे होते की, – तुम्ही विशिष्ट गोष्टी घडून येण्यासाठी एक प्रक्रिया म्हणून, एक साधन म्हणून जपाचा अधिक उपयोग करत आहात आणि म्हणूनच मला तुमच्यामध्ये मानसिक, आत्मिक अशी अवस्था विकसित व्हावी असे वाटत होते, कारण जेव्हा चैत्य पुरुष पुढे आलेला असतो तेव्हा प्रार्थनेमध्ये आनंद आणि जिवंतपणा यांचा अभाव नसतो; तेव्हा त्यामध्ये अभीप्सा असते, एक धडपड, एक आस असते; अशा वेळी भक्तीचा अखंड पाझर चालू राहण्यामध्ये कोणतीही अडचण नसते. मन जेव्हा शांत, स्थिर असते, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख असते तेव्हा ध्यानामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्यामध्ये रस वाटत नाही असेही होत नाही. ध्यान ही ज्ञानाभिमुख अशी एक प्रक्रिया आहे आणि ती ज्ञानाच्या माध्यमातूनच प्रगत होते; ती मस्तकाशी संबंधित बाब आहे, हृदयाशी नाही; तेव्हा तुम्हाला जर ध्यान हवे असेल तर, तुम्ही ज्ञानाकडे पाठ फिरविता कामा नये.

हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे ध्यान नव्हे; तर ती आपल्या ‘प्रियकरा’ला, ‘ईश्वरा’ला दिलेली हाक आहे. ‘पूर्णयोग’ म्हणजे केवळ ‘ज्ञानयोग’ नव्हे – ज्ञानयोग हा एक मार्ग झाला; परंतु आत्मदान, समर्पण, भक्ती हा पूर्णयोगाचा पाया आहे आणि अंतिमत: हा पाया नसेल तर काहीच होऊ शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226-227)

साधनेची मुळाक्षरे – २९

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा तत्सम नैतिक वा आदर्शवादी अशा ज्या ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी असल्याचे मानवी मन मानते, त्या गोष्टीसुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाही.

जी कृती ‘ईश्वरा’ साठी केली जाते, जी ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट प्रारंभी तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि प्रदीप्त ज्ञान यांच्यापेक्षा ते काही कमी सोपे नसते, किंबहुना खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. पण इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची सुरुवातदेखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य इच्छेनिशी ही गोष्ट करण्यास तुम्ही प्रारंभ केला पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील.

या वृत्तीने केलेले कर्म हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये शब्दातीत ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी इच्छे’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’ पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; व्यक्तीचे कार्य ‘विश्वशक्ती’च करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहत असल्याची किंवा तो साक्षीदार असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्वमाता किंवा परम-‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने ‘ईश्वरा’प्रत सतत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदित केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत खुले होत असल्याची जाणीव आपल्याला होऊ शकते. अंतिमतः कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते – त्यालाच आपण ‘प्रकृतीचे रूपांतरण’ (Transformation of the nature) असे संबोधतो.

अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात. ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही राजमार्ग नाही.

सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीही निश्चितच वगळण्यात आलेली नाही, कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, त्याच गोष्टी म्हणजे अनिवार्यपणे भक्तीचीही एक प्रक्रिया आहे…

एवढेच की, जीवनापासून पलायनवादी एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र योगाची संपूर्ण प्रक्रिया म्हणून येथे स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती विशुद्ध ध्यानमग्न अशा रीतीने तासन् तास बसत असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र ‘पूर्णयोग’ नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 216-218)

साधनेची मुळाक्षरे – २८

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही – पण ती अधिकाधिक सजग करणे आवश्यक असते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधी अवस्थेमध्येच असले पाहिजे, असे काही आवश्यक नसते.

*

वाचत असताना किंवा विचार करत असताना, मस्तकाच्या शीर्षस्थानी किंवा मस्तकाच्या वर असणारे स्थान, ‘योगिक’ एकाग्रता करण्यासाठी योग्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 250), (CWSA 30 : 250), (CWSA 29: 311)

साधनेची मुळाक्षरे – २७

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे.

सत्यचेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे एक केवळ साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 300)

साधनेची मुळाक्षरे – २६

प्रश्न : ध्यानाची उद्दिष्टे काय असायला हवीत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?

श्रीअरविंद : जी तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असतील ती! परंतु जर का तुम्ही मला निरपवाद उत्तर विचारत असाल, तर मला असे म्हटले पाहिजे की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनांवर मनाने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो ‘देव’ ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘एकमेव आत्मा’ आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, त्या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)

साधनेची मुळाक्षरे – २५

प्रश्न : ध्यानासाठी अगदी आवश्यक असणारी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नाही, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गलक्यामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे.

मनाचे सैरावैरा भरकटणे, विस्मरण, झोप, शारीरिक आणि स्नायुगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार व भावनांचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक आणि नैतिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

साधनेची मुळाक्षरे – २४

प्रश्न : ध्यान म्हणजे नक्की काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये Meditation आणि Contemplation हे दोन शब्द वापरले जातात.

मनन –
एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘मनन’ (Meditation).

चिंतन –
एकाग्रतेच्या बळावर, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर मन एकाग्र करणे म्हणजे ‘चिंतन’ (Contemplation). हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मानसिक एकाग्रता हे ध्यानाचे तत्त्व आहे.

आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता –
ध्यानाचे इतरही काही प्रकार आहेत. एके ठिकाणी सामी विवेकानंदांनी तुम्हाला तुमच्या विचारांपासून अलग होऊन मागे उभे राहायला सांगितले आहे. मनात विचार जसे येत आहेत तसे येत राहू देत, तुम्ही नुसते त्यांचे निरीक्षण करत राहायचे आणि ते काय आहेत हे जाणून घ्यायचे. याला ‘आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता’ असे म्हणता येईल.

मुक्तिप्रद ध्यान –
आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता ही दुसऱ्या एका प्रकाराकडे घेऊन जाते. मनामधून सर्व विचार काढून टाकणे; जेणेकरून, ते मन एक प्रकारची विशुद्ध सावध अशी पोकळी बनले पाहिजे म्हणजे त्यामध्ये दिव्य ज्ञान अवतरू शकेल आणि त्याचा ठसा उमटवू शकेल; त्यामध्ये सामान्य मानवी मनाच्या कनिष्ठ विचारांची लुडबुड असणार नाही आणि काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहावे तितकी स्पष्टता त्यामध्ये असेल. अशा प्रकारे, सर्व मानसिक विचारांचा त्याग ही योगाची एक पद्धत असल्याचे ‘गीते’मध्ये सांगितले आहे, असे तुम्हाला आढळून येईल आणि या पद्धतीला गीतेने पसंती दिलेली दिसते. ह्याला ‘मुक्तिप्रद ध्यान’ असे म्हणता येईल. कारण या ध्यानामुळे विचारांच्या यांत्रिक पद्धतीच्या गुलामीमधून मनाची मुक्तता होते. वाटले तर विचार करायचा किंवा नाही वाटले तर विचार करायचा नाही, असे करण्यास मनाला या ध्यानामुळे, मुभा मिळते. तसेच, स्वतःच्या विचारांच्या निवडीला मुभा मिळते किंवा वाटले तर, विचारांच्या अतीत होऊन, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ज्याला ‘विज्ञान’ असे म्हटले जाते त्या सत्याच्या शुद्ध बोधाप्रत जाण्याची मनाला मुभा मिळते.

‘मनन’ ही मानवी मनाला सर्वाधिक सोपी असणारी प्रक्रिया आहे पण त्याचे परिणाम अल्प असतात. ‘चिंतन’ ही अधिक कठीण पण परिणामांच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आत्म-निरीक्षण आणि विचारमालिकांपासून मुक्ती (मुक्तिप्रद ध्यान) या गोष्टी सर्वाधिक कठीण आहेत परंतु त्याचे फळ मात्र विशाल आणि महान असे असते. व्यक्ती स्वतःच्या कलानुसार आणि क्षमतेनुसार यापैकी कोणत्याही प्रकाराची निवड करू शकते. योग्य पद्धती म्हणायची झाली तर, ध्यानाच्या या सर्वच प्रकारांचा वापर करावा, प्रत्येक पद्धत तिच्या तिच्या स्थानी आणि तिच्या तिच्या उद्दिष्टांसाठीच वापरण्यात यावी. परंतु यासाठी एका दृढ श्रद्धेची, स्थिर धैर्याची आणि ‘योगा’चे आत्म-उपयोजन (self-application) करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंद The Mother या ग्रंथामध्ये श्रीमाताजींचे स्वरूप उलगडवून दाखवीत आहेत, त्या ग्रंथातील हा अंशभाग…)

त्या एकमेवाद्वितीय आद्य विश्वातीत ‘शक्ती’चे – ‘श्रीमाताजीं’चे स्थान सर्व विश्वांच्या वर असते आणि त्या स्वतःमध्ये ‘परम ईश्वरा’ची शाश्वत चेतना बाळगून असतात. त्या एकट्या, परम ‘शक्ती’ आणि अनिर्वचनीय अशी ‘उपस्थिती’ स्वतःमध्ये साठवून असतात; जी ‘सत्यं’ आविष्कृत होणे आवश्यकच आहेत अशा ‘सत्यां’ना त्यांनी साद घातलेली असते; अशी सत्यं त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतलेली असतात; श्रीमाताजींच्या अनंत चेतनेच्या प्रकाशामध्ये गुप्त असणारी अशी जी सत्यं असतात, ती ‘सत्यं’ ‘परमरहस्या’मधून त्या खाली आणतात आणि श्रीमाताजी स्वत:च्या सर्वसामर्थ्यवान शक्तीमध्ये व असीम जीवनामध्ये आणि विश्वगत शरीरामध्ये, त्या सत्यांना शक्तिरूप प्रदान करतात. ‘परमेश्वर’ श्रीमाताजींमध्ये शाश्वत ‘सच्चिदानंद’ म्हणून कायमस्वरूपी आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे तो विश्वांमध्ये ‘ईश्वर-शक्ती’ या एका आणि दुहेरी चेतनेमध्ये आणि ‘पुरुष-प्रकृती’ या दुहेरी ‘तत्त्वां’द्वारे आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे त्याने ‘विश्वां’मध्ये आणि विविध ‘स्तरां’वर, ‘देवदेवता’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ यांच्या माध्यमातून मूर्तरूप धारण केले आहे; आणि ज्ञात तसेच अज्ञात विश्वांमधील सर्वकाही त्यांच्याचमुळे साकार झाले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14-15)

साधनेची मुळाक्षरे – २२

एकमेव ‘ईश्वर’च सत्य आहे – उर्वरित सर्व मिथ्या आहे. आणि असे असूनसुद्धा ‘ईश्वर’च सर्वत्र आहे – संतांमध्ये आणि पापी व्यक्तीमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे.

*

एकमेव ‘ईश्वर’च सत्य आहे – उर्वरित सर्व भ्रम आहे. आणि असे असूनसुद्धा ‘ईश्वर’च सर्वत्र व्यापलेला आहे – ऋषीमुनींमध्ये आणि अज्ञानी व्यक्तीमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे.

*

एकमेव ‘ईश्वर’च प्रेम आहे – उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे स्वार्थी भावुकता आहे. परंतु ‘ईश्वरी’ प्रेम हे सर्वत्र आणि सर्व वस्तुमात्रांमध्ये विद्यमान आहे.

– श्रीमाताजी
(White Roses : 37-38)

साधनेची मुळाक्षरे – २१

एक गोष्ट अगदी एक क्षणभरसुद्धा विसरू नका की, हे सारे त्या परमेश्वराने निर्माण केले आहे, ‘त्या’ने ते स्वतःमधूनच निर्माण केलेले आहे. ‘तो’ या साऱ्यांमध्ये फक्त उपस्थितच आहे असे नाही तर, ‘तो’ स्वतःच हे सारेकाही आहे. केवळ अभिव्यक्ती आणि आविष्करण यामध्ये एवढाच काय तो फरक आहे.

तुम्ही ही गोष्ट विसरलात तर, सर्वकाही गमावून बसाल.

*

साधक : ‘ईश्वर’ सर्व वस्तुमात्रांमध्येच, म्हणजे अगदी कचरापेटीमध्ये देखील असतो का?

श्रीमाताजी : हे संपूर्ण विश्व ‘ईश्वरा’चे आविष्करण आहे, परंतु या आविष्करणाचा प्रारंभ उगमाशी असलेल्या अगदी अचेतनतेपासून होतो आणि तेथून ते या चेतनेप्रत हळूहळू उन्नत होत राहते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 05)