पृथ्वी ही जडभौतिक विश्वाचे केंद्र आहे. ज्या शक्तीद्वारे ‘जडभौतिका’चे रूपांतरण घडून येणार आहे त्या शक्तीच्या एककेंद्रीकरणासाठी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. ‘जडभौतिका’मधील ईश्वरी क्षमतेचे ती प्रतीक आहे. …‘ईश्वरी चेतने’च्या थेट हस्तक्षेपामुळे या पृथ्वीची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे फक्त या पृथ्वीवरच ‘ईश्वरा’शी थेट संपर्क होऊ शकतो आणि तसा तो होतो देखील. पृथ्वी दिव्य प्रकाश शोषून घेते, विकसित करते आणि त्याचा किरणोत्सर्ग करते. हा किरणोत्सर्ग स्थलाच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि जेथे जेथे ‘जडभौतिकता’ आहे तेथे तेथे तो पसरतो. ‘ईश्वरी चेतने’ची सुसंवादिता आणि प्रकाशाची जी देणगी पृथ्वी घेऊन येते ती देणगी, हे जडभौतिक विश्व काही प्रमाणात वाटून घेते. परंतु त्या चेतनेचे परिपूर्ण आणि अंतिम विकसन हे या ‘पृथ्वी’वरच शक्य असते. चैत्य पुरुष (Psychic being) हा फक्त या पृथ्वीवरच आढळून येतो, कारण तो पृथ्वीचीच निर्मिती आहे. तो ‘जडभौतिका’ ला झालेला ‘ईश्वरी’ स्पर्श आहे. चैत्य पुरुष हा ‘पृथ्वी’ चे अपत्य असते; तो या ‘पृथ्वी’वरच जन्माला येतो आणि येथेच विकसित होतो. तो ‘पृथ्वी’खेरीज अन्य कोणत्याच ठिकाणचा रहिवासी नाही.
– श्रीअरविंद
(The Yoga of Sri Aurobindo : Part 06 by Nolini Kant Gupta : 23)
- साधना, योग आणि रूपांतरण – १६३ - November 14, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १६१ - November 12, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १६० - November 11, 2024