‘प्रकृती’पाशी पुरेसे द्रष्टेपण असते; ती प्रत्येक वातावरणामध्ये त्या वातावरणाला अनुसरून सुयोग्य अशी गोष्ट निर्माण करत असते. अर्थातच, एखाद्याने माणसाला केंद्रस्थानी ठेवता कामा नये, त्याने असे म्हणता कामा नये की, अमुक अमुक गोष्ट ‘निसर्गा’ने माणसाच्या भल्यासाठी केली आहे. परंतु असे असेल असे काही मला वाटत नाही, कारण या पृथ्वीवर माणसाचा उदय होण्यापूर्वी कितीतरी आधीपासूनच ‘प्रकृती’ने या साऱ्या गोष्टींची निर्मिती केलेली होती.

एखाद्या देशाची पर्यावरणीय परिस्थिती आणि त्या देशामध्ये तयार होणारे उत्पादन यांच्यामध्ये एक प्रकारची सुसंवादिता विकसित झालेली आढळते; जसे की, प्राण्यांचा अधिवास ज्या देशांमध्ये असतो त्या देशाची विशालता आणि तेथील प्राण्यांचा आकार या दोहोंमध्ये एक प्रकारची सुसंवादिता आढळते. उदाहरणार्थ, भारतातील हत्ती हे आफ्रिकेमधील हत्तींपेक्षा आकाराने कितीतरी लहान असतात. आणि असे म्हटले जाते की, आफ्रिकेमध्ये प्रचंड मोकळी जागा आहे आणि त्यामुळे तेथील प्राणीदेखील आकाराने मोठे असतात.

सृष्टीनिर्मितीमध्येच ही एक प्रकारची सुसंवादिता प्रस्थापित झालेली आहे आणि पुढे देश जसजसे आकाराने लहान होत गेले, प्रांत जसजसे आकुंचित होत गेले तसतसे, त्या प्रांतामध्ये राहणारे प्राणीदेखील आकाराने लहानलहान होत गेले. आणि मोकळी जागा आणि त्या प्राण्यांचे आकारमान यांच्यामध्ये सुयोग्य प्रमाण उरले नाही तेव्हा ते प्राणी नष्ट झाले. तुम्ही जर बेसुमार घरं बांधलीत, तर मग तेथे अस्वलं, लांडगे यांसारखे प्राणी शिल्लक राहणार नाहीत, साहजिकच, सर्वात आधी वाघ आणि सिंह नामशेष होतील; आणि मला वाटते यामध्ये माणसांचा हात आहे…

भीती माणसांना अत्यंत विघातक बनवते. पण जसजसे माणसांचे जथेच्या जथे संख्येने वाढत जातील आणि रिकाम्या जागा कमी कमी होत जातील तसतसे प्राणिमात्रांचे आकार कमीकमी होत जातील. मग आपण या सगळ्यांसाठी नियम तरी कसे बनवणार?

– श्रीमाताजी
(CWM 07 : 53-54)

श्रीमाताजी