‘निसर्गा’मध्ये वनस्पती ज्याप्रमाणे वाढतात त्याप्रमाणे, व्यक्तीने गोष्टींना सहजस्वाभाविकपणे विकसित होऊ द्यावे. त्यांच्या त्यांच्या वेळेपूर्वीच आपण जर त्यांच्यावर अत्यंत काटेकोर आकार किंवा मर्यादा लादण्याचा प्रयत्न केला तर, त्या गोष्टी त्यांचा नैसर्गिक विकास गमावून बसतील आणि आज ना उद्या त्या नष्ट कराव्याच लागतील.
‘निसर्गां’तर्गत ‘ईश्वर’ अंतिम असे काहीच निर्माण करत नाही, प्रत्येक गोष्टच तात्पुरती असते आणि त्याच वेळी ती त्या कालमान-परिस्थितीला अनुसरून जितकी शक्य आहे तितकी परिपूर्ण देखील असते.
*
आपल्या कार्यप्रणालीमध्ये आपण ‘प्रकृती’चे गुलाम असता कामा नये : प्रयत्न करण्याच्या, बदलण्याच्या, काहीतरी करण्याच्या, नाहीसे करण्याच्या, पुन्हापुन्हा करत राहण्याच्या सवयी तसेच, ऊर्जा, श्रम, साधनसंपदा आणि संपत्तीचा अपव्यय करण्याच्या साऱ्या सवयी हा ‘प्रकृती’च्या कार्याचा मार्ग आहे, हा ‘ईश्वरा’चा मार्ग नव्हे. ‘दिव्य-चेतना’ आधी त्या कार्याचे सत्य काय आहे हे पाहते, दिलेल्या परिस्थितीत ते कार्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता तेही ती ‘चेतना’ पाहते. आणि जेव्हा ती कार्य करते तेव्हा ते अंतिम असते; एकदा केलेल्या गोष्टीकडे ती कधीच पुन्हा परतून येत नाही, ती पुढे पुढे वाटचाल करते, यश असो की अपयश त्यास ती आपल्या ध्येयाप्रत जाण्याच्या दिशेने प्रगत होण्याचे एक पाऊल म्हणून उपयोगात आणते.
‘प्रकृती’ प्रगती करण्यासाठी विनाश घडविते, तर ‘दिव्य-चेतना’ विकासाला उत्तेजन देते आणि सरतेशेवटी रूपांतरण घडविते.
*
तुम्हाला तुमची जबाबदारी उमगली नाही आणि तुम्ही सदैव सतर्क आणि उद्यमी राहिला नाहीत तर, ‘प्रकृती’ तुमची थट्टा करेल. तुम्हाला ‘प्रकृती’ करते ती थट्टा थांबवायची असेल तर, तुम्ही अगदी अचूकतेने आणि जबाबदारीने तुमचे कर्म केले पाहिजे. काहीतरी करायचेच राहून गेले आहे, असे होता कामा नये. तुम्ही नेहमीच सावधानता बाळगली पाहिजे, सतर्क राहिला पाहिजेत म्हणजे मग तुम्ही सुरक्षित असाल.
– श्रीमाताजी
(CWM 15 : 12)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024