प्रस्तावना

‘प्रकृती’ म्हणजे जणू एखादी यांत्रिक अचेतन शक्ती असावी आणि ती या सृष्टीरचनेतील सर्व गोष्टींचे संचालन करत असावी, असे सहसा मानले जाते. ‘प्रकृती’चा सखोल अभ्यास केला, तिचे आकलन करून घेतले तर आपल्याला सारे काही उमगेल, सारे काही ज्ञात होईल आणि सर्व गोष्टींवर प्रभुत्व मिळविता येईल अशी माणसाची समजूत असते. परंतु आपण ‘प्रकृती’च्या विविध पद्धतींकडे थोडे जरी सखोलपणाने पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खात्री पटते की, ‘प्रकृती’ ही यांत्रिक आणि अचेतन नसून, तिच्या अंतरंगामध्ये आणि तिच्या कार्यप्रणालीच्या पाठीमागे एक परिपूर्ण ‘चित्शक्ती’ आहे आणि ती पूर्वनिर्धारित उद्दिष्टाच्या दिशेने सुयोग्य अशा साधनांचा स्वीकार करत असते.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या विशाल आध्यात्मिक ज्ञानाच्या साहाय्याने, आपण या मालिकेमध्ये प्रकृतीची गहन, निगूढ अशी कार्यप्रणाली समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

अभीप्सा मराठी मासिक