विचार शलाका – ३३
“खरोखर, ‘ईश्वर’च साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत राहिला नाहीत तर, तुमच्या साऱ्या चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराचा मार्ग खुला करणारा ‘ईश्वर’च असतो.”
श्रीमाताजींचे हे विधान इ. स. १९६१ मध्ये जेव्हा प्रथम प्रकाशित झाले तेव्हा, या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणाल्या की, ”व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचे तिच्या जीवनात काही परिणाम होतातच, ते ‘कर्म’ संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’ कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची शक्ती असते; पण यासाठी व्यक्तीने त्याच त्या चुकीची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनंत काळ करत राहील आणि ‘ईश्वरी कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनंत काळ करत राहील, असे व्यक्तीने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नसते.
भूतकाळ पूर्णपणे स्वच्छ केला जाऊ शकतो; त्याचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही इतका तो विशुद्ध केला जाऊ शकतो; परंतु व्यक्तीने तिची भूतकालीन अवस्था पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढता कामा नये, या एकाच अटीवर हे होऊ शकते; तुम्ही स्वत: तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनंत काळ निर्माण करत राहता कामा नये.”
– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024