विचार शलाका – ०८
“अमुक एक विचार मी का केला? मला असे का वाटले? किंवा मी असे का केले?”, असे प्रश्न जर तुम्ही स्वत:लाच विचारलेत तर, १०० पैकी ९९ वेळा उत्तर नेहमी सारखेच येते. ते म्हणजे “काय माहीत? घडले खरं असे!” म्हणजेच असे म्हणता येईल की, बहुतेकदा तुम्ही अजिबात भानावर नसता.
तुम्ही जेव्हा इतरांसोबत वावरत असता, तेव्हा तुमच्यामधून कोणती स्पंदने निर्माण झाली आणि इतरांकडून कोणती स्पंदने निर्माण झाली हे तुम्हाला कळू शकते का? त्यांची जीवनशैली, त्यांची विशिष्ट स्पंदने तुमच्यावर कुठवर परिणाम करतात, हे तुम्हाला कळू शकते का? याविषयी तुम्हाला अजिबात कल्पना नसते. तुम्ही एक प्रकारच्या “अस्फुट” अशा चेतनेत जगत असता, अर्ध जागृत, अर्ध निद्रिस्त, खूपशा धूसर, अस्पष्ट अशा अवस्थेत जगत असता, की ज्यामुळे तुम्हाला गोष्टींचा वेध घेण्यासाठी चाचपडावे लागते. पण तुम्हाला तुमच्या अंतरंगात काय चालू आहे, ते तसे का चालू आहे याची निश्चित, स्पष्ट, अचूक कल्पना असते का? आणि कोणती स्पंदने तुमच्यामध्ये बाहेरून येत आहेत आणि कोणती तुमच्या आतून येत आहेत याची कल्पना असते का? जे बाहेरून येऊ शकते, ते तुमच्यातील सारे काही बदलून, त्यांना भलतेच वळण देऊ शकते, याची तुम्हाला पुसटशी तरी कल्पना असते का? तुम्ही एक प्रकारच्या अनिश्चित अशा अस्थिरतेत जगत असता, आणि अचानकपणे काही छोट्या गोष्टी तुमच्या जाणिवेत स्फटिकवत सुस्पष्ट होतात, एक क्षणभरासाठी तुम्ही त्यांना पकडलेले असते आणि त्या पुरेशा सुस्पष्ट होऊन जातात, जणू काही तिथे एखादा प्रोजेक्टर होता, पडद्यावर एक चित्र सरकून गेले, क्षणभरासाठी ते सुस्पष्ट झाले. आणि पुढच्याच क्षणाला परत सारे काही धूसर, अनिश्चित झाले. पण तुम्ही याविषयी जागृत नसता, कारण तुम्ही स्वत:ला कधी तसा प्रश्नदेखील विचारलेला नसतो, कारण तुम्ही अशाच प्रकारे जगत असता.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 336)
- संन्यासवाद आणि आध्यात्मिकता - December 3, 2023
- इच्छावासना आणि आध्यात्मिकता - November 30, 2023
- आध्यात्मिकता आणि नैतिकता यातील फरक - November 29, 2023