सद्भावना – २४

प्रश्न : आजारपण येणे म्हणजे योगमार्गातील परीक्षा असते का?

श्रीमाताजी : परीक्षा? अजिबातच नाही. प्रगती करावी म्हणून व्यक्तीला हेतुपुरस्सर आजारपण देण्यात येते का? नाही, नक्कीच ते तसे नाही. वास्तविक, तुम्ही हीच गोष्ट दुसऱ्या बाजूने विचारात घेतली पाहिजे आणि मग तुम्ही असे म्हणू शकता की, काही माणसं अशीही असतात की, ज्यांची अभीप्सा इतकी सातत्यपूर्ण असते आणि त्यांची सद्भावना इतकी समग्र असते की त्यांच्याबाबतीत जे जे काही घडते त्या साऱ्या गोष्टींकडे ते प्रगती करण्यास उद्युक्त करणारी अशी मार्गावरील कसोटी म्हणून पाहतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत की जी आजारी पडतात तेव्हा, आजारपण म्हणजे प्रगती करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या ‘ईश्वरी कृपे’चा पुरावा आहे, असे मानत असत. ती स्वतःला असे सांगत असत की, ही चांगली खूण आहे, आता मी माझ्या आजारपणाचे कारण शोधीन आणि मग आवश्यक ती प्रगती मी करून घेईन. मला अशा प्रकारची जी काही मोजकी माणसं माहीत आहेत, ती अगदी वेगाने प्रगती करतात. आणि काही जण याउलट असतात. ते या गोष्टीचा प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याऐवजी, कोलमडून पडतात. हे त्यांच्यासाठी अतिशय वाईट असते. पण व्यक्ती आजारी पडली तर, तिने योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे तो असा की, ”असे काहीतरी आहे की जे बरोबर चाललेले नाही, ते काय आहे त्याचा मी शोध घेईन.” ‘ईश्वरा’ने तुमच्यावर मुद्दामहून आजारपण धाडले आहे, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 168-169)

श्रीमाताजी