सद्भावना – १७
मी दोन अटी नेमून देत आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे – ही खरोखरच अगदी साधीशी अट आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे, तसेच अजून प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायची आहे, प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे, हे ज्ञात असणे, ही पहिली अट. दुसरी अट अशी की, दररोज कोणतीतरी एखादी अशी कृती, असे एखादे काम, अशी एखादी गोष्ट की जी स्वतःसाठी केलेली नसेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, जी सर्वांविषयीच्या सद्भावनेची अभिव्यक्ती असेल …तुम्ही जणू विश्वाच्या केंद्रस्थानी असल्यासारखे आणि सारे विश्व तुमच्या भोवती फिरत असल्यासारखे तुम्ही फक्त स्वतःपुरते जगत नाही, हे ज्यामधून दिसून येईल अशी एखादी कृती केली पाहिजे. आपण विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत आणि सारे विश्व आपल्याभोवतीच फिरत आहे, अशीच बहुसंख्य लोकांची कल्पना असते आणि इतकेच काय, पण ते त्यांच्या गावीदेखील नसते. प्रत्येकाला याची जाणीव असली पाहिजे. अगदी सहजपणे, व्यक्ती स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवते आणि सारे काही या ना त्या मार्गाने आपल्याकडेच आले पाहिजे अशी तिची इच्छा असते. परंतु प्रत्येक व्यक्तीने समग्रतेचे अस्तित्व ओळखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, इतकेच. म्हणजे व्यक्तीने स्वतःची चेतना विशाल करण्याचा म्हणजेच स्वतःचा संकुचितपणा कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 315-316)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025