विचार शलाका – ३८

आपण ज्या ‘योगा’चा (पूर्णयोगाचा) अभ्यास करतो आहोत तो आपण केवळ स्वतःसाठी करत नाही, तर ‘ईश्वरा’साठी करतो; ‘ईश्वरा’ची इच्छा या जगामध्ये कार्यकारी व्हावी; आध्यात्मिक परिवर्तन घडून यावे; आणि मानसिक, प्राणिक व शारीरिक प्रकृतीमध्ये तसेच मानवी जीवनामध्ये दिव्य प्रकृती आणि दिव्य जीवन उतरवावे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘मुक्ती’ ही या योगाची आवश्यक अट असली तरी, वैयक्तिक ‘मुक्ती’ हे त्याचे उद्दिष्ट नाही; तर मानवाची मुक्ती आणि त्याचे रूपांतरण हे या योगाचे उद्दिष्ट आहे. वैयक्तिक ‘आनंद’ नव्हे, तर दिव्य ‘आनंद’ खाली भूतलावर उतरविणे, ‘ख्रिस्ता’चे स्वर्गसाम्राज्य आणि आपले ‘सत्ययुग’ या पृथ्वीवर अवतरविणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. मोक्षाबाबत म्हणाल तर, आपल्याला वैयक्तिकरित्या त्याची आवश्यकता नाही, कारण आत्मा हा नित्यमुक्तच असतो आणि बंधन हा भ्रम आहे. वास्तविक आपण बद्ध नाही परंतु आपण बद्ध असल्याप्रमाणे लीलेमध्ये सहभागी होतो. जेव्हा ‘देवाची’ इच्छा होईल तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो. कारण तो, आपला परम ‘आत्मा’ हाच या खेळाचा स्वामी आहे आणि त्याच्या कृपेविना आणि त्याच्या अनुमतीविना कोणताही जीव हा खेळ सोडून जाऊ शकत नाही. बरेचदा आपल्यातील ‘देवाची’ इच्छाच आपल्या मनाला अज्ञानाच्या भोगामधून, द्वैतामधून, सुख आणि दुःखामधून, मौजमजा आणि वेदना यांतून, पापपुण्यामधून, भोग आणि त्यागामधून घेऊन जात असते. युगानुयुगे, अनेकानेक देशांमध्ये त्याच्या मनाला योगाचा विचार देखील शिवत नाही आणि तो शतकानुशतके हा खेळ अथकपणे खेळत राहतो. यामध्ये गैर असे काही नाही किंवा आपण ज्याचा धिक्कार करावा असेही त्यात काही नाही किंवा आपण स्वतःचा संकोच करावा असेही त्यात काही नाही, कारण ही ‘देवाची’ लीला आहे. खरा ज्ञानी मनुष्य तोच की, जो हे सत्य ओळखतो, स्वतःचे स्वातंत्र्य ज्ञात करून घेतो आणि तरीही ‘देवा’च्या या खेळामध्ये सहभागी होतो आणि या खेळाची पद्धत बदलण्यासाठी म्हणून त्याच्या आज्ञेची वाट पाहात राहतो.

आता ही आज्ञा झाली आहे. सर्व प्रकारच्या संधी आणि संकटांमधून, काही मोजक्या किंवा अनेकांच्याद्वारे, सातत्याने उच्चतर ज्ञान जतन व्हावे म्हणून देव स्वतःसाठी असा एक खास देश निवडतो आणि सद्यस्थितीत, या चतुर्युगामध्ये तरी तो देश भारत आहे. जेव्हा तो देव अज्ञानाचे, द्वैताचे, संघर्षाचे, वेदनेचे आणि अश्रूंचे, दुर्बलतेचे, स्वार्थीपणाचे, तामसिक व राजसिक सुखोपभोगांचे, थोडक्यात म्हणजे कालीच्या लीलेचे पूर्ण सौख्य उपभोगण्याचे ठरवितो तेव्हा, तो भारतातील ज्ञान मंदावतो, भारताला दुर्बलतेमध्ये आणि अवनतीमध्ये लोटतो, जेणेकरून भारताने स्वतःमध्येच विश्राम करावा आणि त्याच्या लीलेच्या गतिविधींमध्ये हस्तक्षेप करू नये. जेव्हा त्याला स्वतःला या दलदलीमधून वर उठण्याची इच्छा होते आणि मानवातील नारायण हा पुन्हा एकदा बलवान, प्रज्ञावान आणि आनंदपूर्ण बनावा असे त्याला वाटते; तेव्हा तो भारतामध्ये ज्ञानवर्षाव करतो आणि भारताची अशा रीतीने उन्नती घडवून आणतो की ज्यामुळे, भारताने ज्ञान व त्याच्या परिणामस्वरूप येणारी बलवत्ता, प्रज्ञा आणि आनंद या गोष्टी अखिल विश्वाला प्रदान कराव्यात. जेव्हा ज्ञानाचे संकोचन झाल्याची प्रवृत्ती आढळून येते, तेव्हा भारतातील योगी हे या विश्वापासून दूर होत, स्वतःच्या मुक्तीसाठी व आनंदासाठी किंवा काही मोजक्या शिष्यांच्या मुक्तीसाठी योगाभ्यास करतात; पण जेव्हा ज्ञानप्रवृत्ती पुन्हा एकदा प्रसरण पावते तेव्हा त्याबरोबर भारताचा आत्माही विस्तार पावतो, तेव्हा ते योगी पुनश्च पुढे येतात आणि या जगामध्ये, जगासाठी कार्य करत राहतात. जनक, अजातशत्रू, कार्तवीर्य यांसारखे योगी मग पुन्हा विश्वसिंहासनावर विराजमान होतात आणि राष्ट्रांवर राज्य करू लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 71-72)

श्रीअरविंद