विचार शलाका – १२

‘पूर्णयोगा’मध्ये केवळ ‘देवा’चा साक्षात्कारच अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे. तसेच, जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते. हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची तयारी असल्याची खात्री पटल्याशिवाय, व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ११

‘योगा’च्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण ‘पूर्णयोग’ इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे केवळ अशांसाठीच ‘पूर्णयोग’ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – १०

‘पूर्णयोग’ अत्यंत उन्नत आणि अत्यंत अवघड अशा आध्यात्मिक साध्याकडे घेऊन जाणारा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे.

व्यक्तीकडे या योगासाठी आवश्यक अशी क्षमता असल्याचा पुरेसा आधार असेल किंवा त्या व्यक्तीला दुर्दम्य अशी हाक आली असेल तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो.

केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर ती केवळ या योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक अटींपैकी एक अट आहे

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ०७

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे, असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये ‘प्रकृती’ने मनुष्यजात घडवली. मनुष्यसुद्धा तशीच एक प्रयोगशाळा असू शकतो. त्या प्रयोगशाळेत दिव्य जीव म्हणून आत्म्याला प्रकट करण्याची, तसेच एक दिव्य प्रकृती विकसित करण्याची आणि अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याची प्रकृतीची इच्छा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 502)

विचार शलाका – ०६

निर्व्यक्तिक, ‘केवल’, ‘अनंत’ अशी ईश्वराची कल्पना करून, त्याचा अनुभव घ्यावयाचा की विश्वातीत, विश्वात्मक नित्य पुरुषाचा वेध घेऊन, त्याला जाणून घ्यावयाचे, त्याचा अनुभव घ्यावयाचा; हे ठरवण्याची आपल्याला मोकळीक आहे; आपला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणताही असू देत, परंतु आध्यात्मिक अनुभूतीचे एक महत्त्वाचे सत्य हे आहे की, तो ईश्वर आपल्या हृदयांतच आहे; तो सर्व जीवनाच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व जीवन त्याच्यामध्ये सामावलेले आहे आणि त्याचा शोध घेणे म्हणजेच महान आत्मशोध होय.

सांप्रदायिक श्रद्धांचे भिन्न भिन्न प्रकार हे, भारतीय मनाला, सर्वत्र असलेल्या एकमेव ‘परमात्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या दर्शनाचे भिन्न प्रकार म्हणून प्रतीत होतात. ‘आत्मसाक्षात्कार’ ही एकच आवश्यक गोष्ट आहे. ‘अंतरात्म्या’प्रत खुले होणे, ‘अनंता’त वसति, ‘शाश्वता’ची साधना व सिद्धी, ‘ईश्वरा’शी ऐक्य, हे भारतीय धर्माचे एकमेव साध्य आहे. आध्यात्मिक मोक्षाचा अर्थ हाच आहे, हेच ते जिवंत ‘सत्य’ आहे, जे मानवाला पूर्णत्व देते व मुक्त करते.

सर्वोच्च आध्यात्मिक सत्याचे केलेले गतिमान अनुसरण आणि सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय हे भारतीय धर्माला एकत्र आणणारे बंध आहेत; त्याच्या हजारो रूपांच्या पाठीमागे, जर कोणते सामाईक सार असेल तर ते हेच होय.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 183-184)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

विचार शलाका – ०४

प्रश्न : चैत्य अग्नी (psychic fire) प्रज्वलित कसा करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे.

प्रगतीसाठीच्या संकल्पाद्वारे आणि आत्मशुद्धीकरणाने हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

जेव्हा प्रगतीची इच्छा तीव्र असते, व ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळविली जाते तेव्हा आपोआप त्या व्यक्तीमधील हा अग्नी प्रदिप्त होतो.

एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, त्याची जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये आहुती दिला तर तो अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे. कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

विचार शलाका – ०३

माणूस त्याच्यावरच विजय प्राप्त करून घेऊ शकतो, ज्याला तो घाबरत नाही. आणि जो मरणाला घाबरतो त्याला मृत्युने आधीच पराभूत केलेले असते.

*

मृत्युवर मात करण्यासाठी आणि अमरत्व जिंकून घेण्यासाठी, व्यक्तीने मृत्युला घाबरता कामा नये तसेच त्याची आसही बाळगता कामा नये.

*

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो ते आपले साध्य आहे ‘अमरत्व’ ! आणि सर्व सवयींपैकी मृत्यू ही निश्चितपणे सर्वाधिक हटवादी सवय आहे.

*

तू संपूर्ण परित्यागाविषयी बोलत आहेस, पण देहाचा त्याग हा काही संपूर्ण परित्याग नव्हे. ‘अहं’चा त्याग हाच खरा आणि संपूर्ण परित्याग असतो की जो देहत्यागापेक्षा देखील अधिक दुःसाध्य असा प्रयत्न असतो. जर तुम्ही अहंचा परित्याग केला नसेल तर नुसत्या देहत्यागामुळे तुम्हाला मुक्तता मिळणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 119)

विचार शलाका – ०२

तुम्हाला जर खरोखर या योगमार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करावयाचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणत्याही कौतुकासाठी वा सन्मानासाठी करता कामा नये. योगसाधना ही तुमच्या जीवाची अनिवार्य निकड असल्यामुळे तुम्ही ती केली पाहिजे, कारण तुम्ही त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने आनंदीच होऊ शकणार नाही यासाठी तुम्ही योगसाधना केलीच पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही अगोदरच स्वत:ला समजावले पाहिजे की जसजसे तुम्ही सामान्य माणसापासून वर उठाल, माणसाच्या सामान्य जीवनपद्धतीला परके व्हाल, तसतसे लोकं तुमची प्रशंसा कमी प्रमाणात करू लागतील, हे साहजिकच आहे कारण की, ती लोकं तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकवार सांगते की, या गोष्टीला अजिबात महत्त्व नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये खरी प्रामाणिकता सामावलेली आहे. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही, तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.

जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 282-284)