विचार शलाका – १८
चक्रांमधून उन्नत होत होत, कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया आणि चक्रांचे शुद्धीकरण या गोष्टी ‘तंत्रयोगा’तील ज्ञानाचा भाग आहेत. आपल्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोगामध्ये) चक्रांच्या हेतूपूर्वक शुद्धीकरणाची आणि उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत नसते, तसेच विशिष्ट अशा ठरावीक प्रक्रियेद्वारा कुंडलिनीचे उत्थापन देखील अभिप्रेत नसते. …परंतु तरीही तेथे विविध स्तरांकडून आणि विविध स्तरांद्वारे चेतनेचे आरोहण होऊन, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेशी ऐक्य घडून येते. तेथे चक्रांचे खुले होणे आणि त्या चक्रांचे ज्यांच्यावर नियंत्रण असते त्या (मानसिक, प्राणिक आणि शारीरिक) स्तरांचे खुले होणे देखील घडून येते; त्यामुळे, मी म्हटले त्याप्रमाणे या पूर्णयोगामध्ये रूपांतरणाच्या प्रक्रियेमागे ‘तंत्रयोगा’चे ज्ञान आहे.
*
‘पूर्णयोगा’मध्ये चक्रांचे प्रयत्नपूर्वक उन्मीलन केले जात नाही तर शक्तीच्या अवतरणामुळे ती चक्रे आपोआप खुली होतात. तंत्रयोगाच्या साधनेमध्ये ती ‘मूलाधारा’पासून सुरुवात करून ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात तर, पूर्णयोगामध्ये ती वरून खाली या दिशेने खुली होत जातात. परंतु ‘मूलाधारा’तून शक्ती वर चढत जाणे हे घडून येतेच.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024