विचार शलाका – ३२

प्रश्न : ध्यान म्हणजे नेमके काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात. एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’. एकाग्रतेच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर, एकाग्रता करणे म्हणजे ‘चिंतन’. हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ध्यानाचे तत्त्व आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

विचार शलाका – ३१

जेव्हा एखाद्या व्यक्तीची ‘पूर्णयोगा’साठी निवड निश्चित झालेली असते तेव्हा सर्व परिस्थिती, मनाचे आणि जीवनाचे सारे चढउतार हे त्या व्यक्तीला, या ना त्या प्रकारे योगाकडेच घेऊन जाण्यासाठी साहाय्यकारी ठरतात. त्याच्या स्वतःच्या चैत्यपुरुषाकडून आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’कडून, अशा व्यक्तीच्या बाह्यवर्ती परिस्थितीचे चढउतार आणि मनाचे चढउतार या दोन्हींचा वापर त्या ध्येयाप्रत घेऊन जाण्यासाठी करून घेतला जातो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 30-31)

विचार शलाका – ३०

चेतना ही एखाद्या शिडीसारखी असते. प्रत्येक युगामध्ये असा एखादा महान जीव असतो की, जो या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्यासाठी आणि आजवर सामान्य चेतना जेथवर जाऊन पोहोचू शकली नाही तेथवर जाण्यासाठी समर्थ असतो. उच्च अवस्था प्राप्त करून घेऊन, जडभौतिक चेतनेपासून पूर्णतः विलग होऊन जायचे असेही शक्य असते. पण मग तेव्हा व्यक्ती या शिडीचा भाग राहात नाही. परंतु, जडभौतिकाशी संपर्क न गमावता, या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्याची क्षमता हीच, विश्वातल्या महान युगामधील महान उपलब्धी राहिलेली आहे. म्हणजे, ‘सर्वोच्च’ अवस्थेपर्यंत जायचे आणि त्याच वेळी, विविध पातळ्यांवरील, परस्परांमधील संबंध एक प्रकारच्या रिक्तपणाने तोडून न टाकता, सर्वोच्चाचा धागा तळागाळाशीदेखील जोडून ठेवायचा.

अशा रीतीने वर आणि खाली जाणे आणि तळाचे सर्वोच्चाशी ऐक्य घडवून आणणे हेच साक्षात्काराचे पूर्ण रहस्य आहे आणि हेच ‘अवतारा’चे कार्य असते. प्रत्येक वेळी जेव्हा तो अशा रीतीने शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालतो तेव्हा या पृथ्वीवर एक नवीन निर्मिती घडून येते.

श्रीअरविंदांनी ज्याला ‘अतिमानस’ (Supramental) असे संबोधले आहे त्या नवीन पायरीची भर त्यांनी घातली आहे. त्याचा परिणाम म्हणून, चेतना ही अतिमानसिक जगामध्ये प्रवेश करू शकेल आणि तरीही ती स्वतःचे वैयक्तिक रूप, तिची पृथगात्मकता (individualization) टिकवून ठेवू शकेल आणि एका नवीन निर्मितीच्या प्रस्थापनेसाठी खाली अवतरू शकेल. अर्थातच ही काही अंतिम निर्मिती असणार नाही, कारण जीवाच्या या पुढच्याही अधिक श्रेणी असतात. परंतु सध्या तरी आम्ही ही अतिमानसिक चेतना अवतरीत व्हावी म्हणून कार्यरत आहोत. त्याचा परिणाम म्हणून या जगाची पुनर्रचना होईल, या विश्वामध्ये सत्य दिव्य व्यवस्था पुन्हा एकवार परतेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 178-179)

विचार शलाका – २९

…‘अवतार’ कोणत्या कारणासाठी जन्म घेतात? तर मानवाला पुन्हा पुन्हा अधिकाधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी; त्याच्यामध्ये उच्च, उच्चतर, अधिकाधिक उच्चतर अशी मानवता विकसित व्हावी यासाठी; दिव्य जीवाचा अधिकाधिक महान विकास व्हावा यासाठी; जोवर आपले परिश्रम पूर्णत्वाला जात नाहीत, आपले कार्य सिद्धीस जात नाही आणि या जडभौतिक विश्वामध्येसुद्धा ‘सच्चिदानंद’ परिपूर्णतेने भरून जात नाही, तोवर या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अधिकाधिक स्वर्गलोकाचे अवतरण घडविण्यासाठी, अवतार जन्माला येत असतात. केवळ स्वतःच्या किंवा काही मोजक्या लोकांच्या मुक्तीसाठी जर एखादा परिश्रम करत असेल आणि जरी तो त्यात यशस्वी झाला तरी त्याचे कार्य हे लहानच असते. परंतु जो अखिल मानवजातीच्या पूर्णत्वासाठी, शुद्धतेसाठी, आनंदासाठी, जिवाच्या शांतीसाठी प्रयत्नशील राहतो आणि त्यासाठीच जीवन जगतो, तो जरी अयशस्वी झाला किंवा जरी त्याला त्यामध्ये आंशिकच यश मिळाले किंवा काही काळापुरतेच यश मिळाले तरी, त्याचे ते कार्य अनंतपटीने महान असते.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)

विचार शलाका – २८

आपण ‘देवा’ची प्रतिमूर्तीच बनावे, त्याच्यामध्येच आपण निवास करावा, त्याच्या सन्निध राहावे आणि त्याच्या आनंदाचे व शक्तीचे आपण एक माध्यम बनावे, त्याच्या कार्याचे आपण एक साधन बनावे यासाठीची हाक आपल्याला आलेली आहे. सर्व अशुभापासून शुद्धीकरण करतकरत, ईश्वराच्या स्पर्शाने जीवाचे रूपांतरण होत, आपल्याला दिव्य विद्युत-जनित्राप्रमाणे (dynamos) या जगामध्ये कार्य करायचे आहे आणि ती दिव्य ऊर्जा सर्व मानवजातीमध्ये वितरित करायची आहे. तिच्या प्रकाशाने मानवजात रोमांचित होत, प्रकाशमान होईल अशा रीतीने ती वितरित करायची आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही एखादा जिथे कोठे उभा असेल, त्याच्या अवतीभोवती असणारे शेकडो लोक ‘देवा’च्या प्रकाशाने, त्याच्या शक्तीने भारले जातील, ते ‘देवा’ने परिपूर्ण आणि आनंदाने परिपूर्ण होऊन जातील.

चर्च, परंपरा, धर्मविद्या, तत्त्वज्ञानं मानवजातीला वाचविण्यामध्ये अपयशी ठरली कारण त्यांनी स्वतःला बौद्धिक पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, संस्था यांमध्ये, तसेच आचारशुद्धी, दर्शने यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले, जणू काही यामुळे मानवजातीचे रक्षण होणार होते. हे करत असताना, जी गोष्ट करणे गरजेचे होते, त्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी आत्म्याच्या शक्तीकडे आणि तिच्या शुद्धीकरणाकडे लक्ष पुरविले नाही. आपण त्या आवश्यक गोष्टीकडे परतले पाहिजे. ‘ख्रिस्ता’ची पावित्र्याची आणि मानवजातीच्या परिपूर्णतेची शिकवण, ‘महंमद’च्या (पैगंबर) परिपूर्ण शरणागतीची, आत्मसमर्पणाची आणि ईश्वरसेवेची शिकवण, मानवातील ईश्वराच्या आनंदाची व प्रेमाची ‘चैतन्यां’नी (महाप्रभू) दिलेली शिकवण, सर्व धर्मांच्या एकत्वाची आणि मानवातील ‘देवा’च्या दिव्यत्वाची रामकृष्णांनी (परमहंस) दिलेली शिकवण अंगीकारत, या साऱ्या प्रवाहांचे एका मोठ्या नदीमध्ये एकत्रीकरण करत, ‘गंगे’प्रमाणे विशुद्ध करून घेत, त्यांना उद्धारून घेत आपणही, ‘भगीरथा’ने ज्याप्रमाणे ‘गंगे’चे अवतरण करून घेतले आणि आपल्या पूर्वजांच्या अस्थी त्यामध्ये विसर्जित केल्या, त्याप्रमाणे या भौतिकतावादी मानवतेच्या मृतवत झालेल्या जीवनावर, त्याचा वर्षाव करायला हवा. ज्यामुळे, या मानवजातीमधील आत्मतत्त्वाचे पुनरुत्थान होईल आणि पुन्हा एकदा काही काळासाठी या विश्वामध्ये ‘सत्ययुग’ अवतरेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)

विचार शलाका – २७

माझी शिकवण ही आहे की, हे जग एका नवीन प्रगतीसाठी, एका नवीन उत्क्रांतीसाठी स्वतःला तयार करत आहे. जो कोणता देश, जो कोणता वंश या नवीन उत्क्रांतीची दिशा पकडेल आणि त्याची परिपूर्तता करेल तो देश, तो वंश हा मानववंशाचा नेता असणार आहे. या नवीन उत्क्रांतीचा पायाभूत विचार कोणता असणार आहे आणि ही नवीन उत्क्रांती कोणत्या ‘योग’पद्धतीने साध्य होऊ शकेल याचे मला जे दर्शन झाले ते मी ‘आर्य’मध्ये (श्रीअरविंद व श्रीमाताजी ‘आर्य’ नावाचे नियतकालिक प्रकाशित करत असत.) मांडले आहे. …ज्यांना जाणून घ्यावयाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तो संदेश तेथे आहे. वस्तुतः त्याचे तीन भाग आहेत.

०१) प्रत्येक मनुष्याने व्यक्ती म्हणून स्वतःला भविष्यकालीन दिव्य मानवतेच्या प्रकारामध्ये परिवर्तित करावे, उदयाला येण्यासाठी धडपडणाऱ्या नवीन सत्ययुगातील माणूस बनावे.

०२) मानववंशाचे नेतृत्व करू शकतील अशा माणसांचा एक वंश विकसित करावा.

०३) आणि या पथदर्शक लोकांच्या नेतृत्वाखाली, या निवडक वंशाच्या लोकांच्या नेतृत्वाखाली, या मार्गावरून वाटचाल करावी यासाठी म्हणून समस्त मानवजातीला आवाहन करावे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 225)

विचार शलाका – २६

तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, मठ, तपस्वी आणि संन्यासी तयार करणे हे काही माझे जीवितकार्य नाही; तर बलवान आत्म्यांना ‘कृष्ण’ आणि ‘काली’ यांच्या ‘लीले’मध्ये परत बोलविणे हे माझे कार्य आहे. ही माझी शिकवण आहे, ‘रिव्ह्यू’च्या अंकांमधूनही तुम्हाला ती पाहावयास मिळेल. माझे नाव कधीच मठादी प्रकारांशी किंवा संन्यासवादी आदर्शांशी जोडले जाता कामा नये. बुद्धाच्या काळापासून सुरु झालेल्या संन्यासमार्गाच्या प्रत्येक चळवळीमुळे भारत दुर्बल बनत गेला आहे आणि त्याचे कारण उघड आहे. जीवनाचा परित्याग ही एक गोष्ट आहे आणि खुद्द जीवनच मग ते राष्ट्रीय असो, वैयक्तिक असो, की वैश्विक जीवन असो ते जीवन महान आणि अधिक दिव्य बनविणे ही दुसरी गोष्ट आहे. …अहंकाराचा परित्याग आणि जीवनामध्ये ‘ईश्वरा’चा स्वीकार हा ‘योग’ मी शिकवितो – इतर कोणत्याही परित्यागाची शिकवण मी देत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 222)

विचार शलाका – २५

भावनिक आवेग, भावभावना आणि मानसिक उत्साह यांना मी आता पाया बनवू इच्छित नाही. विशाल आणि मजबूत अशा समतेलाच मी माझ्या योगाचे अधिष्ठान बनवू इच्छितो. समतेवर अधिष्ठित असलेल्या जिवाच्या सर्व तऱ्हेच्या कृतींमध्ये, मला पूर्ण, स्थिर आणि अविचल असे सामर्थ्य हवे आहे आणि या शक्तिसामर्थ्याच्या सागरावर मला ‘ज्ञानसूर्य’ तळपताना हवा आहे आणि त्या तेजोमय विशालतेमध्ये अनंत प्रेमाचा परमानंद आणि आनंद आणि एकत्व सुस्थापित झालेले हवे आहेत.

मला हजारो शिष्यांची आवश्यकता नाही. क्षुद्र अशा अहंकारापासून मुक्त असणारे, ‘ईश्वरा’चे साधन बनलेले असे शंभर जरी शिष्य मला लाभले, तरी ते माझ्यासाठी पुरेसे असतील. नेहमीच्या पद्धतीच्या गुरुबाजीवर माझा विश्वास नाही. मला गुरु बनायचे नाहीये. मला काय हवे आहे तर, कोणीतरी एखादा माझ्या स्पर्शाने किंवा इतर कोणाच्या तरी स्पर्शाने जागृत होईल, त्याच्या सुप्त अशा आंतरिक दिव्यत्वातून तो आविष्कृत होईल आणि दिव्य जीवन प्रत्यक्ष उतरवू पाहील. अशी माणसेच या देशाची उन्नती करतील.

– श्रीअरविंद
(Bengali Writings : 372-373)

विचार शलाका – २४

शरीराकडे ते जणू प्रेत आहे असे समजून पाहाणे, हे संन्यासवाद्यांचे लक्षण आहे. हा निर्वाणाचा मार्ग आहे. ही संकल्पना ऐहिक जीवनाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असला पाहिजे, चैतन्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच तो शरीरामध्येही असला पाहिजे. देह हा चैतन्याने बनलेला असतो, त्यामुळे देह हा देखील ‘ईश्वरा’चेच रूप आहे. मी या विश्वातील सर्व वस्तुमात्रांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहतो. येथील सर्व काही हे ‘ब्रह्म’च आहे, ‘वासुदेव’, ‘ईश्वर’ हाच सर्व काही आहे, (सर्वम् इदम् ब्रह्म, वासुदेवं सर्वमिति) ही दृष्टी वैश्विक आनंद मिळवून देते. आनंदाच्या सघन लहरी अगदी शरीरामधूनही उठत राहतात. या अवस्थेत, आध्यात्मिक भावनेने भरलेले असतानासुद्धा, व्यक्ती हे ऐहिक जीवन, वैवाहिक जीवन जगू शकते. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्तीला दिव्यत्वाचा आनंददायी आत्माविष्कार आढळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 367)

विचार शलाका – २३

समर्पण हे संपूर्ण असले पाहिजे आणि त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचा ताबा घेतला पाहिजे. चैत्य (The psychic) प्रतिसाद देत आहे आणि उच्चतर मानसिक अंग स्वीकार करत आहे किंवा अगदी आंतरिक प्राणिक अंग शरणागत होत आहे आणि आंतरिक शारीरिक चेतनेला प्रभाव जाणवत आहे, फक्त एवढेच पुरेसे नाही. अस्तित्वाचा कोणताही घटक असा असता कामा नये, अगदी अत्यंत बाह्यवर्ती भागसुद्धा असा असता कामा नये की जो स्वतःला अलग राखत आहे, शंका, गोंधळ आणि डावपेच यांच्या मागे काहीतरी दडवून ठेवत आहे, किंवा एखादा भाग बंड करत आहे किंवा नकार देत आहे, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)