(इसवी सन : १८९० ते १९०६)
आपल्याकडे ज्ञानाची कमतरता आहे का? आम्ही भारतीय तर अशा देशात जन्माला आलो आहोत, अशा देशामध्ये आमचे भरणपोषण झाले आहे की, जेथे मानववंशाच्या प्रारंभापासूनचे ज्ञानसंचित आहे, हजारो वर्षांपासून वारशाने मिळालेली संपदा आपल्याकडे आहे. या ज्ञानसंचितामध्ये भर घालण्यासाठी आजही ज्ञानाचे महामेरू आपल्यामधून उदयाला येत आहेत. आपली क्षमता आक्रसलेली नाहीये, आपल्या बुद्धीची धारही बोधट झालेली नाही किंवा कमी झालेली नाहीये, बुद्धिची ग्रहणशीलता आणि लवचीकता यांमध्ये पूर्वीइतकेच वैविध्य आहे. पण हे ज्ञान मृतवत झाले आहे, त्याच्या भाराखाली आम्ही दबून गेलो आहोत; ते ज्ञान आपल्या पायांना आधार देणारे कर्मचारी होण्याऐवजी, आणि ते ज्ञान आपल्या हातांमधील शस्त्र बनण्याऐवजी, आमचा विनाश करणारे विष बनत आहे; कारण सर्वच महान गोष्टींचे स्वरूप हे असेच असते; ते म्हणजे, जर त्या गोष्टी उपयोगात आणल्या गेल्या नाहीत किंवा त्यांचा गैरवापर झाला तर त्या गोष्टी धारण करणाऱ्यावरच उलटतात आणि त्यालाच नष्ट करतात. अशा वेळी, आपले ज्ञान तामसिकतेच्या अति अवजड भाराखाली घुसमटले आहे, नपुंसकत्व आणि जडत्व यांच्या शापाखाली दडपले गेले आहे. आजही आपण कल्पनांमध्ये रमणे पसंत करतो, आपण अशी कल्पना करतो की जर आपण विज्ञान संपादन केले तर, सर्व काही ठीक होईल. पण आपण स्वत:ला आधी हे विचारले पाहिजे की, आपल्याकडे जे ज्ञान आधीपासूनच आहे, त्याचे आपण काय केले? किंवा ज्यांना विज्ञान आधीच प्राप्त झाले आहे, त्यांनी ह्या भारतासाठी काय केले? पुढाकार घेण्यास अक्षम असलेले आणि अनुकरणप्रिय असणारे आपण, आपल्याकडे शक्तिसामर्थ्य नसूनही, इंग्लंडच्या पद्धतींची नक्कल करण्यासाठी धडपडलो आणि आता आपण जपानी लोकांच्या पद्धतींची नक्कल करू पाहणार आहोत, ते तर अधिकच उत्साही लोक आहेत; आपण आता काय त्यांच्यापेक्षाही अधिक यशस्वी होण्याची आशा बाळगत आहोत? ज्ञानाची प्रचंड शक्ती, जी युरोपियन विज्ञानाने दैत्यांच्या हाती शस्त्र म्हणून देऊ केली, ती म्हणजे भीमसेनाच्या हातातील गदा आहे. दुर्बल माणूस तिचे काय करणार, पण ती चालविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च चिरडला तर जाणार नाही नां?
– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 81)
- अतिमानसिक साक्षात्कार - September 10, 2024
- शून्यावस्था आणि अतिमानस - September 9, 2024
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024