(दिनांक : १९ जून १९०९)
आमच्या दृष्टीने हिंदुधर्म, सर्वात शंकेखोर आणि सर्वाधिक विश्वासार्ह आहे; तो शंकेखोर आहे असे म्हणण्याचे कारण की त्याने सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याने सर्वाधिक प्रयोग केले आहेत. तो सर्वाधिक विश्वासार्ह आहे असे म्हणण्याचे कारण की, त्याच्याकडे वैविध्यपूर्ण व सकारात्मक आध्यात्मिक ज्ञान आणि सखोल अशी अनुभूती आहे. असा हा विशाल ‘हिंदुधर्म’ म्हणजे केवळ एक मतप्रणाली वा मतप्रणालींचा समुच्चय नव्हे तर तो जीवन जगण्याची प्रणाली आहे. ‘हिंदुधर्म’ ही केवळ सामाजिक चौकट नव्हे तर तो भूतकालीन आणि भावी सामाजिक उत्क्रांतीचा आत्मा आहे. तो कशालाही नकार देत नाही, तर प्रत्येक गोष्टीच्या अनुभवावर व प्रयोग करण्यावर भर देतो; आणि अशा रीतीने एकदा का अनुभवांती व प्रयोगांती ह्या गोष्टींची पारख झाली की तो त्या साऱ्याची आत्मोद्धारासाठी योजना करतो. अशा या ‘हिंदुधर्मा’मध्येच भविष्यकालीन विश्वधर्माचा पाया आम्हास आढळतो. भारताच्या शाश्वत धर्मामध्ये वेद, वेदान्त, गीता, उपनिषदे, दर्शने, पुराणे, तंत्र असे अनेक धर्मग्रंथ येतात; हा धर्म ‘बायबल’ वा ‘कुराण’ यांचाही अव्हेर करीत नाही; पण त्याचा खराखुरा अधिकृत धर्मग्रंथ हा त्याच्या हृदयांत असतो की जेथे ‘ईश्वरा’चा निवास असतो. आमच्या स्वत:च्या आंतरिक आध्यात्मिक अनुभूतीमध्येच आम्ही जगातील ‘धर्मग्रंथां’चा स्रोत आणि त्याचा पुरावा शोधला पाहिजे; तेथेच आम्ही ज्ञानमार्ग, प्रेम व आचार आणि कर्मयोगाची प्रेरणा व पाया या गोष्टी शोधल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 26)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५७ - February 19, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५६ - February 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025