(दिनांक : ११ एप्रिल १९०८)
राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसहाय्यतेच्या तत्त्वाआधारे, आम्ही पुनरुत्थानाच्या ज्या काही योजना आखत आहोत, मग ते औद्योगिक पुनरुत्थान असो, शैक्षणिक पुनरुत्थान असो किंवा ती राजकीय पुनरुत्थानाची योजना असो ह्या सर्व योजना म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी घडून यावयासच हवे अशा एका अधिक गहन पुनरुत्थानाची केवळ दुय्यम अंगे आहेत. ‘भारत माता’ आपल्याकडून कोणत्याही योजनांची, नियोजित आराखड्यांची किंवा कोणत्या पद्धतींची मागणी करत नाहीये. आपण तयार करू शकू त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या योजना, अधिक चांगले आराखडे, अधिक चांगल्या पद्धती ती आम्हाला देऊ करेल. ती आमच्याकडून आमची हृदये, आमची जीवने यांची मागणी करत आहे; याहून काही कमी नाही किंवा काही अधिकही नाही. ‘स्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षण’, ‘स्वराज्या’च्या उभारणीचा प्रयास ह्या सर्व बाबी म्हणजे तिच्याप्रत स्वत:ला समर्पित करण्याच्या केवळ अनेकानेक संधी आहेत. आपण ‘स्वदेशी’साठी किती प्रयत्न केले, आम्ही किती हुशारीने स्वराज्याची आखणी केली, आम्ही शिक्षणाची पुनर्रचना किती यशस्वितेने केली हे ती पाहणार नाही तर; आम्ही तिच्याप्रत स्वत:ला किती समर्पित केले, आम्ही आमच्यातील मूलद्रव्यं किती देऊ केली, आम्ही आमचे कष्ट, आमच्या सोयीसुविधा, आमची सुरक्षितता, आमची जीवने किती प्रमाणात देऊ केली, हे ती पाहणार आहे. पुनरुत्थान हा अक्षरश: पुनर्जन्मच असतो, आणि हा पुनर्जन्म बुद्धिने नाही, केवळ पैशाच्या मुबलकतेने नाही, केवळ धोरणांमुळे, योजनांमुळे, किंवा यंत्रणेमध्ये परिवर्तन घडविल्यानेही होत नाही तर, आम्ही आज जे काही आहोत ते सारेच्या सारे त्यागरूपी अग्निमध्ये भस्मसात करून, एक नवीन हृदय प्राप्त करून घेण्यामधून आणि ‘माते’च्या कुशीतून पुन्हा जन्माला येण्यातून होतो. स्व-परित्यागाची आमच्याकडून मागणी केली जात आहे. माता आम्हाला विचारत आहे, “तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी जगायला तयार आहात? तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी प्राणार्पण करायला तयार आहात?” आणि ती आमच्या उत्तराची वाट पाहात आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1032-1033)
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024
- अतिमानसाची आवश्यकता - September 7, 2024
- अनुभूती आणि साक्षात्कार - September 3, 2024