(दिनांक : १७ सप्टेंबर १९०६)
आपला इतिहास हा इतर लोकांच्या इतिहासापेक्षा अनेक बाबतीत भिन्न राहिलेला आहे. भारतीय लोकांची जडणघडण ही जगामध्ये एकमेवाद्वितीय अशी आहे. विविध जातीजमातींची लोकं एकत्रित आल्यामुळे, त्यांच्यामध्ये अभिवृद्धी होत होत राष्ट्रांचे विकसन होत गेले, ही आधीची प्रक्रिया होती. परंतु, भारत हा केवळ विविध जातीजमातींच्या एकत्र येण्याचे स्थान नसून, तो अशा विकसित राष्ट्रांच्या एकत्र येण्याचे स्थान आहे, की जी राष्ट्र सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या स्वत:च्या वाटांवरून विकसित होत गेली आहेत; त्यांना त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या मूळ जाती आहेत आणि त्यांची त्यांची स्वत:ची अशी खास संस्कृती आहे. त्यामुळे, आगामी भारत राष्ट्राचे चारित्र्य आणि त्याची जडणघडण ही युरोपियन राष्ट्रांपेक्षा भौतिकदृष्ट्या पूर्ण वेगळी असेल; कारण तौलनिकदृष्ट्या विकसनाच्या अगदी अस्पष्ट अशा अवस्थेत असतानाच, अगदी सुरुवातीलाच, या राष्ट्रांच्या एकीकरणाची प्रक्रिया घडून आली होती. आपल्या बुरसटलेल्या विचारसरणीच्या राजकारण्यांना आणि सामाजिक सुधारणावादी लोकांना या वास्तवाचा विचार करण्यासाठी अजून पुरेसा अवधी मिळालेला दिसत नाही आणि अगदी आत्तादेखील, की जेव्हा आम्ही त्याकडे निर्देश केलेला आहे, अगदी शक्य तेवढ्या सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये ती गोष्ट मांडली आहे तरीदेखील, आपल्या बाल्यावस्थेतील राष्ट्रीय जीवनाची ही मूलभूत विशिष्टता ओळखण्यासाठी लागणारा धीर त्यांच्याकडे असेल, अशी आशाच आम्हाला वाटत नाही. ज्याला संघराज्य असे म्हणता येईल अशा दिशेने भारताची राष्ट्रीयत्वाची वाटचाल होत राहील, ती त्याद्वारे मूर्त रूप धारण करेल. ते वेगवेगळे राष्ट्रीयत्व असणाऱ्या, आणि संघटना व आदर्श या दोन्ही बाबतीत स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण घटक जतन करणाऱ्या राष्ट्रांचे एकीकरण असेल. ती राष्ट्रे इतरांमध्ये ज्या विचाराची वा चारित्र्याची उणीव आहे त्यांबाबत त्यांच्याशी संपर्क साधतील आणि सर्व मिळून एकत्रितपणे नागरिक आणि सामाजिक जीवनाच्या दृष्टीने, एकाच वैश्विक साध्याच्या दिशेने प्रगत होतील; ती राष्ट्रं आपापल्या ऐतिहासिक आणि पारंपरिक दिशेने त्याच साध्याप्रत हळूहळू प्रगत होत राहतील. आणि ती अशा रीतीने अनंतपणे आणि त्याचबरोबर तितक्याच अनंतकाळासाठी, एकमेकांच्या जवळजवळ येत असल्याने, जुन्या असो की नव्या, कोणत्याच एकच एक अशा विशिष्ट जीवनरूपामध्ये ती त्यांचे अस्तित्व पूर्णपणे गमावणार नाहीत. महान आणि महाप्रतापी अशा भारत राष्ट्रामध्ये एकत्रित येण्यासाठी भारतातील मुस्लिम, हिंदु, बौद्धधर्मीय, ख्रिश्चन यांनी त्यांचे त्यांचे ‘मुस्लिम’, ‘हिंदु’, ‘बौद्धधर्म’ किंवा ‘ख्रिस्ती’ धर्म सोडून देण्याची आवश्यकता नाही. स्वत:चे आदर्श आणि स्वत:चा समाज यांबद्दलची निष्ठा, तसेच समाजाच्या इतर घटकांच्या आदर्शाबद्दलची व संस्थांबद्दलची सहिष्णुता आणि आदर आणि सर्वांच्या सामायिक नागरीय जीवन व आदर्शाविषयी उत्कट प्रेम व आस्था ह्या गोष्टीच भारताच्या खऱ्या राष्ट्रउभारणीसाठी आता आपण विकसित केल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 168-169)
- साधना, योग आणि रूपांतरण – १२३ - October 5, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १२२ - October 4, 2024
- यशाची अट - October 3, 2024