(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९)

एकेकाळी ‘भारतीय’ एकता आणि सहिष्णुता यांच्याकडे कल असणारी ‘मोगल’ सत्ता पुढे जेव्हा दडपशाही करणारी आणि विघातक अशी बनली तेव्हा ती उलथून टाकणे हे राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट होते आणि तेव्हा म्हणजे ‘शिवाजीमहाराज’ आणि ‘समर्थ रामदास’ यांच्या काळात ‘हिंदु’ राष्ट्रीयत्वाला काही एक अर्थ होता. हे त्याकाळी शक्य होते कारण ‘भारत’ तेव्हा स्वत:च एक जग असल्यासारखा होता आणि ‘महाराष्ट्र’ व ‘राजपुताना’, हे दोन भौगोलिक प्रांत पूर्णत: ‘हिंदु’ होते, त्यांनी याला भक्कम पाया पुरविला होता. ते आवश्यकही होते कारण ‘मोगल साम्राज्यवादी’ घटकांनी त्यांच्या सत्तेचा जो गैरवापर केला होता तो ‘भारता’च्या भवितव्यासाठी घातक होता आणि त्यांना दंडित करून, ‘हिंदु’चे पुनरुत्थान आणि वर्चस्व यांच्या आधारे त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकताच होती. आणि ते आवश्यक होते, शक्यही होते त्यामुळे ते अस्तित्वात आले. परंतु आधुनिक काळातील परिस्थिती विचारात घेता, भारत हा एकसंधपणेच अस्तित्वात राहू शकतो. एखाद्या राष्ट्राचे अस्तित्व हे त्याच्या भौगोलिक सीमांवर आणि भौगोलिक सघनतेवर, एक विशिष्ट, स्वतंत्र राष्ट्र असण्यावर अवलंबून असते. वंश, भाषा, धर्म, इतिहास यांमधील भेद अखेरीस भौगोलिक भिन्नत्वाच्या अस्तित्वामुळे निश्चितच विराम पावतील. ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये असेच झालेले आहे. भारतातदेखील तसेच होईल. परंतु भौगोलिक एकसंधतादेखील आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, देश इतका एकसंध असला पाहिजे की परस्परांतील संवाद आणि केंद्रवर्ती शासनाचे संघटन हे सोपे झाले पाहिजे, किमान ते अवघड तरी होता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 304)

श्रीअरविंद